Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शरद पवार वगळता स्टार प्रचारक मतदारसंघांतच अडकले !
संतोष प्रधान, मुंबई, १५ एप्रिल

स्वत: किंवा नातेवाईकांच्या विजयासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावावी लागल्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार

 

शिंदे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले या राज्यातील प्रमुख नेत्यांना इतरत्र प्रचाराला जाण्याऐवजी आपापल्या मतदारसंघातच जास्त वेळ द्यवा लागला आहे. याला अपवाद ठरला तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा.
राज्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रचार दौऱ्यांवर कटाक्ष टाकल्यास शरद पवारांचा अपवाद वगळल्यास बाकीच्या नेतेमंडळींनी आपापल्या मतदारसंघावर जास्त लक्ष केंदित केले आहे. माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या पवारांनी अर्ज भरण्यासाठी मतदारसंघात आले होते. आता शेवटच्या टप्प्यात ते दोन दिवस प्रचार करणार आहेत. विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन मंत्री पवारांच्या प्रचाराची सारी सूत्रे हलवित आहेत. मुख्यमंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांनी जास्तीत जास्त मतदारसंघात जाणे अपेक्षित आहेत. त्यांच्या नांदेड मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. नांदेडमध्ये आपले मेव्हणे भास्करराव खतगावकर-पाटील यांच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी आठवडाभरात नांदेडचा चार दिवस दौरा केला. प्रचारासाठी चित्रपट अभिनेते व अभिनेत्रींना तेथे पाचारण केले होते. रविवारी चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर होते. सोमवारी पंतप्रधानांच्या मुंबई भेटीच्या वेळी ते शहरात आले होते. पुन्हा सायंकाळी त्यांनी नांदेड गाठले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पवारांपाठोपाठ राज्याच्या अन्य भागात दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. विदर्भापासून सर्वत्र भुजबळांनी दौरे केले. मात्र यातूनही वेळ काढून त्यांना आपले पुतणे समीर यांच्यासाठी नाशिकमध्ये जास्त लक्ष केंद्रित करावे लागले आहे. ‘घार िहडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी’ अशी अवस्था भुजबळांची झाली आहे.
नारायण राणे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक. मात्र आपल्या मुलासाठी म्हणजेच निलेश यांच्या विजयासाठी राणे यांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अलीकडे राणे यांचा जास्त मुक्काम सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये जास्त असतो. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना सातत्याने साथ दिलेल्या कर्नाटकातील कारवारमधून निवडणकू लढविणाऱ्या मार्गारेट अल्वा यांच्या प्रचाराला राणे एक दिवस गेले होते. तसेच विदर्भ व नांदेडचा त्यांनी दौरा केला. दुसऱ्या टप्प्यात राणे हे सांगली, शिर्डी व अन्यत्र प्रचाराला जाणार आहेत. मात्र राणे यांचे जास्त लक्ष सिंधुदुर्ग व रत्नागिरीत आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणजे काँग्रेसचा दलित चेहरा. यामुळेच महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये शिंदे यांना मागणी असते. मध्यंतरी शिंदे हे दोन दिवस उत्तर प्रदेशात जाऊन आले. यापूर्वीच्या निवडणुकींच्या तुलनेत शिंदे सोलापूरमध्ये जास्त वेळ द्यावा लागल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडूनही सांगण्यात येत आहे. गेली सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीत बसलेल्या फटक्याच्या पाश्र्वभूमीवर कोणताही धोका पत्करण्यास शिंदे हे तयार नाहीत.
भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांचे राज्यभर दौरे सुरू असले तरी बीडवर त्यांना जास्त लक्ष केंद्रित करावे लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मुंडे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र आपण राज्याच्या सर्वच भागात फिरत असून, फक्त बीडमध्ये थांबलेलो नसल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे.
शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ रामदास आठवले यांच्यासाठी नवा आहे. त्यातच अ‍ॅट्रसिटी कायद्याच्या गैरवापरावरून आठवले यांच्या विरोधात वातावरण तापविण्यात येत आहे. यामुळे आठवले यांना शिर्डीत गावोगावी प्रचार करावा लागत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून बाहेर पडण्यासाठी वेळ मिळालेला नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे स्वत: किंवा त्यांच्या कुटुंबियातील कोणीच रिंगणात नाही. त्यामुळे विलासरावांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. लातूर मतदारसंघात जयवंत आवळे यांच्या विजयासाठी विलासरावांचे बंधु दिलीप व पूत्र अमित हे तेथे ठाण मांडून बसले आहेत.