Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राज यांच्या वाढत्या हल्ल्यानंतरही सेना-भाजप गप्प!
संदीप आचार्य, मुंबई, १५ एप्रिल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फारसे महत्व न देण्याची रणनिती शिवसेनेने आखली असतनाच

 

राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांतून शिवसेना-भाजपवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. शिवसेनेवर राज यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला जाहीर सभांमधून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने सेना-भाजपच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र राज यांच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आज तरी एकही सेना-भाजपचे नेते पुढे येताना दिसत नाही.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शिवसेनेन मराठी माणसांच्या घरासाठी भूखंड मागितला होता. त्यासाठी सेनेने लोकांकडून पैसेही गोळा केले होते. मात्र मराठी माणसांसाठी घरे बांधली नाहीत तर त्या पैशावर भवानी सहकारी बँक उभारली. कालांतराने सेनेने मराठी माणसांचे पैसे परत केले असले तरी घरे काही बांधली नाही, असा आरोप राज यांनी केला आहे. १९९५ साली सत्तेवर आल्यानंतरही शिवसेनेन मराठी माणसांसाठ घरे उभारली नाहीत तसेच काहीही ठोस कार्यक्रम राबवले नाहीत. मराठीच्या मुद्दय़ाची काहीजण उचलेगिरी करत असल्याचा आरोप शिवसेनप्रमुखांनी केल्यानंतर मराठीच्या मुद्दय़ाची मी उचलेगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून सेनेनेच १९८७ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदुत्वाच्या मुद्दय़ाची उचलेगिरी केल्याचा प्रतिहल्ला राज यांनी चढवला आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यापासून ते मराठीच्या प्रश्नावर ४२ वर्षे काय केले, या प्रश्नांना उत्तरे देण्याचे सेनानेत्यांकडून टाळण्यात येत आहे. राज यांनी उपस्थित केलेले आक्षेप व आरोपांना जाहीर सभांमधून मिळणारा प्रतिसाद आणि सेनानेत्यांचे गप्प बसणे यामुळे राज ठाकरे हे अधिकाधिक आक्रमक होत प्रत्येक सभेमधून सेना-भाजपवरील टीकेची धार वाढवत नेत आहेत. मुंबई महापालिकेतील सेना-भाजपचा भ्रष्ट कारभार, मुंबई व ठाण्याची झालेली वाताहात याला सेना-भाजपची पालिकेतील सत्ता जबाबदार असून राज्यात व केंद्रात सत्तेत असताना यांना मराठी माणूस व महाराष्ट्राच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेण्यास कोणी रोखले होते असा सवाल राज करत आहेत. केंद्रात एनडीएमध्ये सामील असताना मुंबईतून कररुपाने मिळणाऱ्या ६८ हजार कोटी रुपयांमधील वाटा मागण्यास सेनेला कोणी रोखले होते, याप्रश्नावर आज तरी सेनानेत्यांकडे उत्तर नाही.
मनसेने मराठीसाठी केलेल्या आंदोलनानंतर दिल्लीतील बिहार व उत्तर प्रदेशातील नेत्यांनी एकी दाखवतात मात्र महाराष्ट्र हितासाठी लोकसभेत राज्यातील ४८ खासदारांपैकी एकही आवज उठवत नाही, तेव्हा अशा लोकांना तुम्ही पुन्हा लोकसभेत पाठवणार का, या राज यांच्या प्रश्नाला दाद मिळत असल्याने सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून राज यांना उत्तर दिल्यास त्यांचे महत्व वाढू शकते या भीतीपोटी गप्प बसणेच सध्या त्यांनी पसंत केल्याचे दिसत आहे.