Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राम नाईक यांचा राज ठाकरे यांना टोला
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे म्हणतील तोच मराठी माणूस होऊ शकत नाही. ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करण्याकरिता मी प्रयत्न केले होते. आता मलाच मराठीचा अभिमान नाही, असे

 

जर ते म्हणणार असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलावे, असा सवाल उत्तर मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राम नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला व राज यांना टोला लगावला.
नाईक म्हणाले की, मला मराठीचा अभिमान नाही, असा प्रचार मनसे करीत आहे. राज ठाकरे म्हणतील तोच मराठी माणूस होऊ शकत नाही. लोकसभा ही देशाची निवडणूक असून उत्तर मुंबईतून जो खासदार जाईल तो देशाला भाजपच्या रुपाने स्थिर सरकार देईल, याची मतदारांना कल्पना आहे. मनसे ज्या मुद्दय़ांना घेऊन निवडणुकीत उतरली आहे तो मराठीचा मुद्दा देशाच्या राजकारणात चालणार नाही. अर्थात माझ्या मराठी प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मनसेला उत्तर मुंबईची निवडणूक गैरमुद्दय़ावर न्यायची आहे. परंतु तसे मी होऊ देणार नाही. अतिरेकी संसदेत घुसायला हवे होते या राज यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता आपण त्या विधानावर बोलू इच्छित नाही, असे ते म्हणाले.
महागाई निर्देशांक ०.४५ इतका खाली आला असल्याचा दावा काँग्रेसचे सरकार करीत असले तरी साखर, तांदूळ, डाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर दररोज वाढत असून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. या विसंगतीचा खुलासा काँग्रेसने करणे गरजेचे आहे.