Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पवारांची फिल्डिंग.. पण मुंडे निर्धास्त!
रवींद्र पांचाळ, बीड, १५ एप्रिल

मराठा विरुद्ध वंजारा, असा जाती-पातीचा विषारी प्रचार माझ्याविरोधात करण्यात येत असला तरी साऱ्या समाज घटकांचे समर्थन मिळवून आपणच जिंकणार, असा आत्मविश्वास बीड लोकसभा

 

मतदारसंघात लढवत असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. राष्ट्रीय पातळीवर जाणार असल्याने आता राज्याच्या राजकारणात मागे येणार नाही. शिवसेना-भाजपचे राज्य राज्यात येणार असून, आपल्याला उपमुख्यमंत्रीपदात रस नाही. त्या पदावर नितीन गडकरी, एकनाथ खडसे वा पांडुरंग फुंडकर कुणीही बसू शकतील, असा शेराही त्यांनी वर्तविला.
बीडसह राज्यभरात युतीच्या प्रचारासाठी सुमारे १०५ सभा घेणारे मुंडे बीडमधील आपल्या विजयाबाबत एवढे नि:शंक आहेत, की २३ एप्रिलला मतदान असताना ते १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बीडमध्ये पहिल्यांदा आले. जिल्हा परिषदेपासून ते पतपेढय़ांपर्यंत बीडच्या राजकीय, आर्थिक नाडय़ा हातात ठेवणाऱ्या मुंडे यांना एक बाब मात्र सतावते आहे ती जातीय प्रचाराची. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे रमेश आडसकर यांच्या रूपाने मराठा उमेदवार दिला असून, मुंडे यांच्या प्रचारासाठी क्षेत्ररचना केली आहे. खुद्द शरद पवार यांच्यापासून अजित पवारांपर्यंत सारे जण येथे प्रत्येकी दोनदा सभा घेऊन गेले असून, बबनराव पाचपुते तर जवळजवळ तळ ठोकून आहेत. नाशिकमध्ये समीर भुजबळ यांना एस. एम. एस.द्वारे डिवचण्याचा जसा प्रयत्न केला गेला तसाच एक एस. एम. एस. बीडमध्ये मुंडे यांच्या विरोधात फिरविला जात आहे. ‘वाजवा तुतारी, करा तयारी, जात असेल प्यारी.. तर हाकला वंजारी..’ असा हा एस. एम. एस. आहे. या एस. एम. एस.मागे बीडमध्ये ३३ टक्के असलेला मराठा समाज आपल्या बाजूने वळावा हा हेतू आहे. मात्र मुंडे निर्धास्त आहेत. याचे कारण वर्षांनुवर्षे मुंडे यांना त्यांच्या वंजारा समाजाची मते एकगठ्ठा पडतात. त्यात फूट पडावी म्हणून आमदार उषाताई दराडे यांना राष्ट्रवादीने प्रचारात आघाडीवर आणले आहे; पण त्यांचा विशेष प्रभाव पडणार नाही, असे स्थानिक जाणकारांचे म्हणणे आहे. बीडमध्ये वंजारा समाज सुमारे २७ टक्के आहे. या निवडणुकीत मुंडेंनी बेरजेचे राजकारण करीत पवारांच्या क्षेत्ररचनेला छेद दिला आहे. जिल्ह्यातील भाजपचे सुरेश धस आणि माजलगावचे प्रकाश सोळंके यांना आपल्या गळाला लावण्यात पवार यशस्वी ठरले असले तरी मुंडे यांनी त्यांचे कट्टर विरोधक बनलेले ‘मराठा’ खासदार, जयसिंहराव गायकवाड यांच्या खांद्यावर आपल्या जुन्या मैत्रीचा हात टाकला आहे. ही पकड मुंडेंनी इतकी मजबूत आणि बेमालूम बसविली आहे, की ‘आपण भाजप व मुंडेंची नस्न् नस जाणतो’, असं शिवसेना प्रवेशाच्या वेळी म्हणणारे गायकवाड आता मुंडेंच्या मैत्रीत पार विरघळले आहेत आणि त्यांच्या जिभेवर आता केवळ मुंडे यांच्या स्तुतीची खडीसाखर आहे.. तसे पाहिले तर बीडमध्ये मुंडे यांचा अर्ज भरताना नितीन गडकरी येऊन गेल्यानंतर भाजपचा राज्य वा राष्ट्रीय स्तरावरील एकही बडा नेता बीडमध्ये फिरकलेला नाही. अपवाद ठरणार आहे तो १७ एप्रिलच्या लालकृष्ण अडवाणी यांच्या अंबेजोगाईतील सभेचा. मात्र निवडणूक जिंकण्याची सारी तंत्रे अवगत असलेले मुंडे तरीही कुल आहेत. १४ एप्रिल रोजी ऊसतोड मजुरांची प्रचंड सभा व काही मेळावे घेणाऱ्या मुंडे यांनी १५ एप्रिल रोजी बीडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि निवडणूक व्यवस्थापनाला वेळ दिला. १६ एप्रिल रोजी मुंडे पुन्हा एकदा राज्यात एक दिवस प्रचारसभा घेणार असून, माढा मतदारसंघात शरद पवार तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचा ‘समाचार’ घेणार आहेत. मुंडे असे बीडबाहेर प्रचार करीत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांची कन्या पंकजा पालवे, पुतणे धनंजय मुंडे, पाशा पटेल आदी वाहत आहेत. लोकसभा निवडणूक मत अंदाजावर भाष्य करताना हे अंदाज ‘मॅनेज’ केले जातात, अशी टीका मुंडे यांनी केली, तसेच शरद पवारांच्या पक्षाला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळणार असताना त्यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्नही पाहू नये, असा सल्ला दिला. आगामी विधानसभेत भाजप-शिवसेना युती अभेद्य राहणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला, तसेच मनमोहनसिंग म्हणजे ‘पी. एम.’ नसून, सोनिया यांच्या इटालियन कंपनीचे जी. एम. आहेत, असा टोलाही लगावला.