Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राणे आणि खैरे ‘अरे-तुरे’वर
औरंगाबाद, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद मतदारसंघातील आतापर्यंत थंड चाललेला प्रचार आता वेग धरू लागला आहे. आरोप-

 

प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्योगमंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर अनेक आरोप केले. खैरे यांनीही या आरोपांना उत्तर दिले. दोघांनीही एकमेकांचा ‘अरे-तुरे’ने उल्लेख केला. श्री. राणे यांनी प्रचाराची खालची पातळी गाठल्यावर खैरेही त्यांच्या स्पर्धेत उतरले. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांनी केले.
‘सरपंच व्हायचीही त्याची लायकी नाही’
राणे यांनी काल रात्री सिडकोतील राजीव गांधी स्टेडियममध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत ते म्हणाले, ‘‘चंद्रकांत खैरे दर वेळी आमच्याकडून वाचत आहेत. खरे तर त्याची साधा सरपंच होण्याची लायकी नाही. कसे काय त्याला दोन-दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिले जाते? युतीच्या काळात मंत्री असताना पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचार आणि पैसे खाणे सुरू केले. वनखात्यातील अडीचशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा घाट त्याने घातला. बाळासाहेबांकडे बोंबलत गेला. मी बाळासाहेबांना सांगितले की, प्रशासनात असे पैसे खाऊन बदल्या वगैरे प्रकार चालणार नाही. खैरे महाभयंकर आहे. तो स्वत:च्या गुरूलाही सोडू शकत नाही. मग तुमची आमची तर बातच नाही. एक विरंगुळा मंत्री म्हणून आम्ही त्याला बोलून घ्यायचो. कॅबिनेटमंत्री असूनही त्याला विषय माहिती नसायचा. आम्ही त्याची गंमत घ्यायचो. खैरेला या वेळी घरी पाठवा. तो इतकी वर्ष लोकप्रतिनिधी म्हणजे आश्चर्यच!’’ ‘नाऱ्याने नव्हे तर बाळासाहेबांनी मंत्री केले’
खैरे यांनी आज या आरोपांना त्याच भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द शेवटचा असतो. त्यांनीच मला मंत्री केले. मोठे केले. मुख्यमंत्री म्हणून नाऱ्याने मला मंत्री केले नाही. राणे यांनी शिवसेनेत गद्दारी केली; त्या वेळी कोकणात जाऊन त्याची दादागिरी आम्ही सहन केली नाही. त्याच्या दादागिरीला थेट उत्तर दिले. मी मागणी केल्यामुळेच त्यांच्या मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला. हा मुलगा पोलिसांची गाडी घेऊन फिरत होता.’’‘‘माझ्याकडे क्रीडा खाते असताना दोन महिन्यानंतर पुन्हा नारायण राणे यांना वनखाते मला द्यावे लागले. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना आदेश दिला होता. मुख्यमंत्रिपदानंतर नारायण राणे यांच्या मालमत्तेत कशी वाढ झाली याचा खुलासा त्यांनी करावा. मी मंत्री असताना अजिबात भ्रष्टाचार केला नाही. मी धर्माची सेवा केली, लोकांची सेवा केली. माझी मालमत्ता आणि नारायण राणे यांच्या मालमत्तेत जमीन -आस्मानचा फरक आहे. मी जमिनी बळकाविलेल्या नाहीत. मी माझ्या पक्षावर आणि पक्ष नेत्यांवर कधीच टीका करीत नाही. नारायण राणे मात्र पक्षाच्या नेत्यांवर टीका करतात आणि सोनिया गांधी यांच्यासमोर जाऊन गुडघे टेकतात. गुडघे टेकताना या नाऱ्याचा ‘स्वाभिमान’ कुठे गेला?’’, असा सवाल खैरे यांनी केला.