Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘शिवाजीमहाराज छत्रपती घराण्याची मक्तेदारी नाही’
सातारा, १५ एप्रिल/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेण्याचा अधिकार सर्वाना आहे. छत्रपतींच्या घराण्याची ती

 

मक्तेदारी नाही. मावळेच खऱ्या अर्थाने शिवरायांचे वंशज आहेत. त्यामुळे उदयनराजे तुम्हीसुद्धा पगडी काढा. जनतेला नतमस्तक होणारा रात्री- अपरात्री भेटणारा खासदार हवा आहे. राजे महाराजे गोरगरिबांना फवसतात, त्यांना न भुलता शिवसेनेच्या खरोखरच पुरुषोत्तम असलेल्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले. सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ येथील तालीम संघाच्या मैदानावर ऐन उन्हात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. मंगळवारी रात्री साताऱ्यात झालेल्या युवा मेळाव्यात उदयनराजे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका करताना छत्रपतींच्या नावाचा वापर बंद करून शिवसेनेने ठाकरे सेना या नावाने काम करावे. त्या वेळी त्यांच्याबरोबर ठाकरे घराण्याशिवाय कोणीही राहणार नाही, असे जाहीर सभेत सांगितले होते. त्याचा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला. कोण कुठे जन्माला येतो हे महत्त्वाचे नाही तर त्याचे कर्तृत्व महत्त्वाचे असते. दडपशाही, गुंडागर्दी राष्ट्रवादीत चालते. शिवसेनेत नाही. छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे हे जनताच ठरवेल. कन्याकुमारी ते काश्मीपर्यंत कुठेही जा हिंदुहृदयसम्राट एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे आहेत. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना त्यांनी संसदेच्या प्रांगणात शिवरायांचा पुतळा उभा केला. युतीच्या काळातच मुंबई विमानतळाला शिवरायांचे नाव दिले गेले. त्या वेळी छत्रपतींचे वंशज कुठे गेले होते. मावळाच छत्रपतींचा खरा वंशज आहे. छत्रपतींच्या वंशजांनी राजे म्हणवून घेण्याचे सोडले तर त्यांना कुणी विचारणार नाही. जिल्हा सुजलाम् सुफलाम् करायचा असेल तर स्वाभिमानी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करा. आमचा उमेदवार दारू पित नाही. २४ तास त्याचे घर जनतेसाठी खुले असेल. शिवसेना- भाजप जातीयवादी असल्याचे शरद पवार सगळीकडे सांगत आहेत. राष्ट्रवादी- शिवसेना छुपी मैत्री झाल्याची चर्चा करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, वार समोरून करायचा तर मैत्री खुलेपणाने करण्याची ठाकरे घराण्याची परंपरा आहे. अशा चर्चामध्ये काही अर्थ नाही. देशात निवडणुकीत कोण लोहपुरुष लायक, नालायक अशीच चर्चा सुरू आहे. मनमोहनसिंगांना देशात वीज, पाणी नाही तरी दगडाला पाझर फुटेल, पण यांच्या डोळ्यात अश्रू येत नाही. त्यामुळे तेच पाषाणपुरुष आहेत.