Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजेशाही गेली म्हणून पगडीची परंपरा सोडू का?
सातारा, १५ एप्रिल/प्रतिनिधी

मी छत्रपतींची पगडी घालून रोज फिरतो काय? राजेशाही गेली, लोकशाही आली म्हणून

 

राजघराण्याची मानाची पगडी घालण्याची परंपरा सोडून देऊ का? ठाकरे घराण्याने पाश्चिमात्य संस्कृती पत्करली असावी त्यामुळेच ते भारतीय रुढी- परंपरा संस्काराला तिलांजली द्यायला सांगत आहेत. छत्रपतींचे नाव वापरण्याचे त्यांनी बंद करावे, हाच मुद्दा घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्यांना ते महागात पडेल, असा इशारा छत्रपतींचे थेट १३ वे वंशज राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेताना सांगितले की, आपले परममित्र उद्धव ठाकरे यांच्या संकुचित बुद्धीची कीव वाटते. आपण वैयक्तिक पातळीवर कुणावरही टीका केली नव्हती. गतजन्माच्या पुण्याईने आपला राजघराण्यात जन्म झाला. माझ्या ठिकाणी राज, उद्धव तसेच परममित्र अजित पवारही कदाचित जन्माला आले असते तर त्याचा मला सार्थ अभिमान वाटला असता. छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलो म्हणूनच आपण उदयनराजे नाव लावतो पण उदयन म्हणूनच जगतो. राजेपणा वागवला नाही. माझ्या पायाला भेगा पडेपर्यंत लोकांप्रति आदर भाव ठेऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करतोय. राजा असून राजासारखं वागत नाही. मात्र ठाकरे राजे नसून राजासारखे वागत आहेत. मी मात्र सगळ्यांच्या मनाचा राजा आहे. यांना छत्रपती शिवरायांबद्दल आस्था, प्रेम आहे काय? जेम्स लेनबाबत राष्ट्रवादीने आवाज उठवला पण यांनी मात्र लेनचे समर्थन करणाऱ्या जेठमलानी यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यास पाठिंबा देण्याचे काम चालवलेय. उद्धवचे आजोबा वंदनीय प्रबोधनकार ठाकरे दूरदृष्टीच्या महापुरुषाने राजघराण्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या पश्चात कुठलाही उद्योग व्यवसाय न करता करोडोंची माया जमवणारे उद्धव ठाकरे उदयनराजेंना कोणी विचारणार नाही म्हणून आपल्याला कुत्र्यासारखं वागवले. त्यांचे पितळ उघडे पडणार असल्यानेच त्यांना उदयनराजे झोंबले असावेत. शिवरायांचा पुतळा संसदेत बसवला अशी उपकाराची भाषा त्यांनी करू नये. सर्वच महापुरुषाप्रति देशाने ऋण मानले आहेत. २३ तारखेच्या मतदानात शिवसेनेला उद्धवचे विधान किती महागात पडेल हे त्यांना माहीत नाही. सेनेचे लोक किती त्यांच्याबरोबर राहतात तेच मला बघायचे आहे असे उदयनराजे यांनी सांगितले.