Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘कोल्हापूरचा पवारांचा तीनदा दौरा हा नैतिक पराभव’
कोल्हापूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असणारे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना कोल्हापूर जिल्ह्य़ात सलग तीनवेळा

 

प्रचार दौरा करावा लागतो. यातच त्यांचा नैतिक पराभव असून कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळेच निकालानंतर शिमगा कोण करणार ? हे राष्ट्रीय नेत्यांना त्या वेळी कळून चुकेल असा इशारा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे डावी लोकशाही आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी करवीर दक्षिण भागातील आपल्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी बोलताना दिला. त्यांच्यासोबत माजी आमदार संपतराव पवार पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते.
बनवेगिरीचा अस्सल नमुना असणाऱ्या पवारांच्या अनेक खेळ्या राज्याने आणि देशाने वेळोवेळी पाहिल्या आहेत असे सांगून श्री. मंडलिक पुढे म्हणाले, नेत्यांनी लादलेला उमेदवार स्वीकारायचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. यापुढे जनतेला हवा तोच उमेदवार जनता निवडून देणार यात शंकाच नाही. म्हणूनच कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांने ही निवडणूक लढविणे मला भाग पाडले. जिल्ह्य़ाच्या सर्व भागातून माझ्या उमेदवारीला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्चित आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता या निवडणुकीत वेगळा इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्यात बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील म्हणाले, शरद पवारांची वापरा आणि फेका ही कुटील नीती साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत पक्षांतर्गत त्यांनी घातलेला घोळ कोल्हापूर जिल्ह्य़ातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची व स्वाभिमानी जनतेची कुचेष्टा करणारा होता. साखर निर्यातबंदीबाबतचे त्यांचे धोरण, देशामध्ये गव्हाचे पीक मुबलक व पुरेसे असताना परदेशातून निकृष्ट दर्जाचा लाल गहू आयात का करण्यात आला ?
यांसारखी त्यांची धोरणे शेतकरीहिताविरुद्ध होती आणि आहेत. त्याविरुद्ध मंडलिकसाहेब बोलले म्हणून त्यांच्याविरुद्ध पवारांनी शह-काटशहचे राजकारण केले. हे साऱ्या जनतेला माहीत आहे. म्हणूनच जनतेने मंडलिकांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे, असेही ते म्हणाले.