Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भुजबळांच्या प्रचारासाठी मेटे सक्रिय
नाशिक, १५ एप्रिल / प्रतिनिधी

तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे याकरिता राष्ट्रवादीने समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली

 

असून नाशिकच्या सर्वागिण विकासासाठी त्यांना विजयी करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. महत्वाची बाब म्हणजे, बुधवारी सिन्नर येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसंग्राम तथा मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे सहभागी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी मंगळवारी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मेटे हे समीर भुजबळ यांच्या प्रचारसभेत सहभागी झाल्याने त्यास विशेष महत्व प्राप्त झाले.
यावेळी मेटे यांचेही भाषण झाले. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आमचे मतभेद संपुष्टात आल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ यांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ पवार यांची दुपारी अमळनेर येथील सानेगुरूजी विद्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. यावेळी भाजपची त्यांनी खिल्ली उडवली. भाजपवाले नेहमी म्हणतात, आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. ज्या पक्षाचा अध्यक्ष पैसे स्वीकारताना सापडतो, कबूतरबाजीत खासदार सापडतात, खान्देशचे दोन खासदार लाच स्वीकारताना अडकतात, मग खरोखरच भाजपवाले इतरांपेक्षा वेगळेच आहेत, असा टोला त्यांनी लगावला. सत्तेवर आल्यावर राममंदिर बांधू, मात्र सत्ता येताच रामाला वनवासात पाठवणाऱ्यांना निवडणूक येताच रामाची आठवण येते. धर्माच्या नावाने आकसाचे वातावरण निर्माण करून मते मागणाऱ्यांना खडय़ासारखे बाजूला करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. १८ पक्षांचे युपीए सरकार चालविणे ही कसरत असली तरी धोरणे आखताना कधीही मतभेद झाले नाहीत. परिणामी, सरकारला चांगले निर्णय घेता आले. भाजपची सत्ता असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही माफी दिली नाही. आम्ही ७१ हजार कोटीची सवलत दिली. ग्रामीण भागातील माणसाच्या हितासाठी सत्तेचा वापर केला. देश चालविण्यासाठी समाजात एकोपा असणे महत्वाचे आहे. धर्मांधतेमुळे आज पाकिस्तानची प्रगती पूर्णपणे थांबली असल्याचे पवार यांनी सांगितले.