Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सामाजिक शांततेचा बळी घेणाऱ्या भाजपला धूळ चारा- सोनिया गांधी
राजेंद्र जोशी , चिक्कोडी (बेळगाव), १५ एप्रिल

सर्वसामान्यांच्या भावना भडकवून जातिधर्मामध्ये भांडणे लावत सत्तेसाठी सामाजिक शांततेचा बळी

 

घेणाऱ्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून धूळ चारा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी चिक्कोडी येथील जाहीर सभेत केले.
उत्तर कर्नाटकातील चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ चिक्कोडी येथील आर. डी. महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचे आयोजन केले होते. या सभेला रणरणत्या उन्हात सुमारे एक लाखावर नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या विराट सभेत मार्गदर्शन करताना सोनिया गांधी बोलत होत्या. सभेत सोनिया गांधी यांनी कंदहारप्रश्नी निरपराधित्वाचा देखावा करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी तात्काळ राजीनामा का दिला नाही, अशी विचारणा केली. देशासाठी भाजपप्रणीत आघाडीतील एका तरी नेत्याने बलिदान दिल्याचे उदाहरण दाखवावे, असे थेट आव्हान दिले.
सोनिया गांधी म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील जनतेपुढे दोन पर्याय उभे आहेत. काँग्रेस आघाडीने आपल्या त्यागी परंपरेचे उदाहरण देऊन गेल्या पाच वर्षांत देशात जनहिताचा कारभार केला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशात सर्वसामान्य जनतेच्या कल्याणार्थ अनेक योजनांतून आज देश विकासाच्या मार्गावर झेपावतो आहे. याउलट पाच वर्षांपूर्वीची काळीकुट्ट कारकीर्द घेऊन जातिधर्मात भांडणे लावणारे, भावनेचा आधार घेऊन समाजामध्ये भिंती उभारू पाहणारे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बॅनरखाली मते मागत आहेत. या दोन पर्यायांतून जनतेला देशाचे सरकार ठरवायचे आहे. जर जनतेला सामाजिक शांततेची हमी देणारे आणि समाजाच्या सर्व थरांतील जनतेला उन्नतीच्या मार्गावर न्यावयाचे असेल तर प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत काँग्रेस आघाडीच्या पारडय़ात टाकून सामाजिक शांततेला सुरुंग लावणाऱ्या भाजप आघाडीला पराभूत केले पाहिजे.
पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या भाजप आघाडीच्या कारभाराने हैराण झालेल्या जनतेने देशाची सूत्रे काँग्रेसकडे सोपवल्याचे स्मरण करून देताना त्या म्हणाल्या, भाजपने केंद्रात सत्ता असताना जातीय आणि धार्मिक द्वेष पेटविण्याचे काम केले. जातिजातींतील संवाद बिघडवून टाकण्याचे त्यांचे कार्य आज कर्नाटकातील भाजपचे सरकार करत आहे. येथेही एकेकाळी विकासाच्या मार्गावर असलेला कर्नाटक आज भ्रष्टाचाराने पोखरून निघतो आहे. कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्टच या राज्यात शिल्लक राहिली नाही. दहशतीच्या नावाखाली येथे राज्यकारभार सुरू असल्याची अनुभूती जनता घेत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत ती भाजपला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.
सोनिया गांधींनी आपल्या भाषणात भाजप काँग्रेसवर करीत असलेल्या आतंकवादाच्या आरोपाचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ज्यांच्या कारकीर्दीत आतंकवाद्यांना सन्मानाने देशाच्या बाहेर सोडण्यात आले, अशा भाजपने काँग्रेसवर आतंकवादाचा आरोप करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ ही उत्तर भारतीय म्हण सार्थ ठरविल्याचा प्रकार आहे. ज्या काँग्रेस पक्षाला बलिदानाची परंपरा आहे, अशा काँग्रेसवर त्यांचे आरोप सुरू आहेत. आज अडवाणी कंदहार प्रकरणात आपण निर्णयप्रक्रियेत सहभागी नव्हतो, असा दावा करीत असले तरी तत्कालीन पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या सहमतीने निर्णय झाला आहे अशी बाब स्पष्ट केली आहे. तेव्हा अडवाणी निरपराधित्व सिद्ध करू पाहात असतील तर त्यांनी त्याच वेळी पदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. तो का दिला नाही, त्याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे.