Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वेळ मिळाला तर कलमाडींच्या प्रचारासाठी पुण्यात जाईन - अजित पवार
पिपरी, १५ एप्रिल / प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरावे लागत असल्यामुळे अजून बारामती मतदारसंघातच जाण्यास

 

वेळ मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित कालावधीत वेळ मिळालाच तर पुण्यात खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारासाठी जाईन, असे विधान पालकमंत्री अजित पवार यांनी आज िपपरीत पत्रकारांशी बोलताना केले.
महाराष्ट्रात चांगले चित्र असले, तरी अनेक मतदारसंघात नाराजी, बंडखोरी झालेली आहे. काही ठिकाणी अंग झटकून कामे होताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेक ठिकाणी कुरबुरी आहेत. या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याबरोबरच प्रचारासाठी महाराष्ट्रात सगळीकडे फिरावे लागते. मावळ, शिरूरची जबाबदारी आपल्यावर आहे. बारामती मतदारसंघात अजून जाऊ शकलो नाही. हातात अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे वेळ मिळाला तर पुण्यात कलमाडींच्या प्रचारासाठी जाईन, असे अजित पवार म्हणाले. पवारसाहेबांनी पुण्यात सभा घेतल्या, प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुण्यात जाऊन आले. पुण्याच्या महापौर तसेच पक्षाचे पदाधिकारी, आमदार त्यांच्याच प्रचाराचे काम करीत आहेत, असे सांगत आपली तेथे गरज नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले. कलमाडी यांच्याविरोधात पुणे पॅटर्नचा उमेदवार आहे का, अशी विचारणा केली असता लोकसभा निवडणुकीत तसे काही होत नाही, असे सांगत त्यांनी पुण्याविषयीच्या प्रश्नांना बगल दिली. पेपरवाल्यांच्या बातम्यांचा खेळ आहे, प्रत्यक्षात तसे काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.