Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

राष्ट्रवादीचा मार्ग बिकट
रावेर

जयप्रकाश पवार

रावेर लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक भाजपचे उमेदवार खा. हरिभाऊ जावळे यांना ‘नवा भिडू, नवा डाव’ याप्रमाणे ‘नवा मतदारसंघ, नवा प्रतिस्पर्धी’ अशारितीने लढावी लागत आहे.
नीतिमत्ता, साधनसुचिता व स्वयंशिस्त या त्रिसूत्रीचे आचरण करणाऱ्या भाजपच्या प्रतिमेला बट्टा लावण्याचे काम कुणी केले तर या मतदारसंघातील पक्षाच्याच खासदाराने केले होते. अशी एकूण काळीकुट्ट पाश्र्वभूमी असताना हरिभाऊंनी २००७ च्या पोटनिवडणुकीत जळगावमधून निवडणूक लढविताना राष्ट्रवादी उमेदवारावर मात केली. ‘मराठा विरुद्ध लेवा पाटील’ समीकरणात त्यांनी बाजी मारल्याने यावेळी पुनर्रचित रावेरमधून एक अनुभवी खेळाडू म्हणून पक्षाने त्यांना उभे केले. पण राष्ट्रवादीचे उमेदवार विधीज्ञ रवींद्र पाटील हेही कमी अनुभवी नाहीत. नाही म्हणायला पाटील ज्या काही निवडणुका लढले त्यात त्यांची कधी हार तर कधी जीत झाली.

पडद्याआडील लढतच अधिक चर्चेत
जळगाव
अविनाश पाटील

पोटनिवडणुकीवेळी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन व सध्या शिवसेनेच्या वरच्या पंक्तीत स्थान मिळविलेले नेते सुरेश जैन स्वत: उमेदवार नसतानाही पराकाष्टा करीत असल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात हाच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अ‍ॅड. वसंत मोरे विरूध्द भाजपचे ए. टी. पाटील अशी मुख्य लढत या मतदारसंघात वरवर दिसत असली तरी जैन यांच्या कडवट भूमिकेमुळे मोरे विरूध्द जैन असे स्वरूप या लढतीला प्राप्त झाले आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी भाजपचे एम. के. अण्णा पाटील यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पूर्वाश्रमीच्या एरंडोल मतदारसंघात २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या जैन यांनी मोरे यांच्या पराभवाचा विडा उचलला होता. परंतु सहानुभूतीच्या लाटेवर मोरे विजयी झाले. पुनर्रचनेनंतर आता जळगाव मतदारसंघात जैन यांच्या वर्चस्वाखालील जळगाव तालुक्याचा समावेश करण्यात आल्याने भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील यांचा विजय त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे.

‘ हम तो डुबेंगे सनम, लेकीन तुम्हे लेके डुबेंगे’
जॉर्जनितीने एनडीए हैराण

समर खडस

आणीबाणी मागे घेतल्यानंतर १९७७ साली जॉर्ज फर्नाडिस यांनी पहिल्यांदा मुजफ्फरपूर या मतदारसंघातून निवडणूक लढविली. जॉर्ज यांना आणीबाणीत बडोदा डायनामाईट खटल्यात अटक झाल्याने आणीबाणी संपली तरीही त्यांची तुरुंगातून सुटका झाली नव्हती. तुरुंगातूनच त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यामुळे मतदारसंघात एकही दिवस प्रचार करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यांचे दंडाबेडी घातलेले छायाचित्र असलेले पोस्टर बिहारमधील प्रत्येक मतदारसंघात त्यावेळी लागले होते आणि संपूर्ण बिहारमध्ये एकच घोषणा निनादत होती ‘‘जेल का ताला टुटेगा जॉर्ज फर्नाडिस छुटेगा..’’

उत्तर भारतीयांना पूर्ण संरक्षणाचे राहुल गांधी यांचे आश्वासन
मधुबनी, १५ एप्रिल/ पीटीआय

उत्तर भारतीयांविरोधात कथित द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवून काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मुंबई वा इतरत्र नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना पूर्ण सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन देऊन, राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. भारत एकसंध राष्ट्र आहे. राज ठाकरेंना उत्तर भारत व तेथील जनता वेगळी वाटत असेल आणि ते त्यांचा तिरस्कार करत असतील तर त्यांना तसे खुशाल करू द्या, तुम्ही मात्र त्याकडे कृपा करून दुर्लक्ष करा. मुंबई, दिल्ली, तामिळनाडू, पंजाब वा कोणत्याही राज्यात नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना सुरक्षा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

शरद पवार वगळता स्टार प्रचारक मतदारसंघांतच अडकले !
संतोष प्रधान, मुंबई, १५ एप्रिल

स्वत: किंवा नातेवाईकांच्या विजयासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावावी लागल्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले या राज्यातील प्रमुख नेत्यांना इतरत्र प्रचाराला जाण्याऐवजी आपापल्या मतदारसंघातच जास्त वेळ द्यवा लागला आहे. याला अपवाद ठरला तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा.

मतदानाची सक्ती करणे अयोग्य
मतदानाबाबतची वाढती उदासीनता लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि स्वित्झलँड या देशांसारखे भारतातही मतदान सक्तीचे करण्यात यावे, अशी सूचना मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी नुकतीच केली आहे. बहुतांश राज्यातील शहरी भागात मतदानाचे प्रमाण घटत आहे. मागील निवडणुकीच्या वेळी बिहारमध्ये ४८ टक्के, उत्तर प्रदेशात ५० टक्के तर गुजरातमध्ये ५५ टक्के अशा प्रकारे मतदान झाले होते. अनेक वेळा विधानसभा मतदारसंघात तर हे प्रमाण २७-२८ टक्के इतके कमी असते.

राज यांच्या वाढत्या हल्ल्यानंतरही सेना-भाजप गप्प!
संदीप आचार्य, मुंबई, १५ एप्रिल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फारसे महत्व न देण्याची रणनिती शिवसेनेने आखली असतनाच राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांतून शिवसेना-भाजपवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. शिवसेनेवर राज यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला जाहीर सभांमधून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने सेना-भाजपच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र राज यांच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आज तरी एकही सेना-भाजपचे नेते पुढे येताना दिसत नाही.

पवारांची फिल्डिंग.. पण मुंडे निर्धास्त!
रवींद्र पांचाळ, बीड, १५ एप्रिल

मराठा विरुद्ध वंजारा, असा जाती-पातीचा विषारी प्रचार माझ्याविरोधात करण्यात येत असला तरी साऱ्या समाज घटकांचे समर्थन मिळवून आपणच जिंकणार, असा आत्मविश्वास बीड लोकसभा मतदारसंघात लढवत असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. राष्ट्रीय पातळीवर जाणार असल्याने आता राज्याच्या राजकारणात मागे येणार नाही. शिवसेना-भाजपचे राज्य राज्यात येणार असून, आपल्याला उपमुख्यमंत्रीपदात रस नाही. त्या पदावर नितीन गडकरी, एकनाथ खडसे वा पांडुरंग फुंडकर कुणीही बसू शकतील, असा शेराही त्यांनी वर्तविला.

राणे आणि खैरे ‘अरे-तुरे’वर
औरंगाबाद, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद मतदारसंघातील आतापर्यंत थंड चाललेला प्रचार आता वेग धरू लागला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्योगमंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर अनेक आरोप केले. खैरे यांनीही या आरोपांना उत्तर दिले. दोघांनीही एकमेकांचा ‘अरे-तुरे’ने उल्लेख केला. श्री. राणे यांनी प्रचाराची खालची पातळी गाठल्यावर खैरेही त्यांच्या स्पर्धेत उतरले. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांनी केले.

स्थानिक ‘पोलिग एजन्ट’च्या सक्तीस हायकोर्टात आव्हान
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी
ज्यांची नावे त्याच भागातील मतदारयादीत आहेत व जे त्याच भागातील स्थानिक रहिवासी आहेत अशाच व्यक्तींना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांतर्फे मतदान केंद्रांमध्ये ‘पोलिग एजन्ट’ म्हणून नेमता येईल, या निवडणूक आयोगाने काढलेल्या ताज्या आदेशास आव्हान देणारी एक याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.

बहुतांश बँककर्मचारी निवडणूक कामाला जुंपल्याने हायकोर्ट संतप्त
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कल्याण जनता सहकारी बँक आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक या तीन बँकांच्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी अधिग्रहित करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अविवेकी निर्णयावर मुंबई उच्च न्यायालय आज चांगलेच संतापले. या बँकांचे काम ठप्प होणार नाही व निवडणुकीचे कामही होईल अशा प्रकारे किती कर्मचारी घेता येतील हे बँक अधिकारी व निवडणूक अधिकारी यांनी एकत्र बसून ठरविता येत असेल तर उद्या गुरुवापर्यंत ठरवावे अन्यथा कर्मचारी मागण्याच्या या आदेशांना आम्ही पूर्णपणे स्थगिती देऊ. मग निवडणूक झाली नाही तरी हरकत नाही, असेही न्यायालयाने बजावले.

राम नाईक यांचा राज ठाकरे यांना टोला
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे म्हणतील तोच मराठी माणूस होऊ शकत नाही. ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करण्याकरिता मी प्रयत्न केले होते. आता मलाच मराठीचा अभिमान नाही, असे जर ते म्हणणार असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलावे, असा सवाल उत्तर मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राम नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला व राज यांना टोला लगावला.

मतदार ओळखपत्र नसल्यास आणखी काही पर्याय
नवी दिल्ली, १५ एप्रिल / पी.टी.आय.

महाराष्ट्र, छत्तीसगड, आसाम आणि केरळ या चार राज्यातील ज्या मतदारांजवळ मतदार ओळखपत्र नाही त्यांच्यासाठी संबंधित राज्य सरकारने प्रदान केलेल्या काही कागदपत्रांना पर्यायी ‘फोटो आयडेंटिटी’ म्हणून ग्राह्य़ धरण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पासपोर्ट, पॅन कार्डसह तेरा कागदपत्रांना मतदानाच्या वेळी निवडणूक ओळखपत्राला पर्याय म्हणून सादर करण्यास आयोगाने परवानगी दिली होती. या व्यतिरिक्त चार राज्यातील मतदारांना आयोगाने आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रातील मतदारांना, जर त्यांच्याजवळ मतदार ओळखपत्र नसेल तर २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी जारी झालेले रेशनकार्ड दाखवून मतदान करता येईल. ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र किंवा राज्य सरकारचे सव्‍‌र्हिस आयडेंटी कार्ड, सार्वजनिक उपक्रम, खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बँकांचे पासबुक, पोस्ट ऑफिसचे पासबुक किंवा किसान विकास पत्रे, संपत्तीच्या मालकी हक्काची कागदपत्रे, रजिस्टर व्यवहारांची कागदपत्रे, स्वातंत्र्यसैनिकाचे ओळखपत्र, शस्त्र परवाना, अपंग प्रमाणपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड दाखवल्यास निवडणुकीत मतदान करता येईल.