Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
लोकमानस

आरक्षणपीडित म्हणजे कोण रे ऽऽऽ भाऊ?

‘आरक्षण धोरणामुळे अन्याय’ हा डॉ. विजय पेठे यांचा लेख (२९ मार्च) वाचला. एखाद्या विषयाचा अभ्यास न करता परीक्षेला जाणाऱ्या अतिउत्साही विद्यार्थ्यांप्रमाणे पेठे यांनी हा लेख लिहिला. आरक्षण या विषयाचा पुरेसा तर सोडाच, साधा प्राथमिक अभ्यासही त्यांनी केला नसल्याचे या लेखातून स्पष्ट होते. मात्र समाजकारणी, पत्रकार, बुद्धिवंतांपासून राजकारण्यांपर्यंत कुणालाच ‘आरक्षणासारख्या विषयातील काहीच कळत नाही’ अशा थाटात हे लिखाणआहे.
‘आपल्या घटनेत ‘जातिनिष्ठ आरक्षण’ या संकल्पनेचा समावेश केला गेला त्यामुळे भारतात

 

जातीयवाद दृढमूल झाला’ ही लेखाची सुरुवातच त्यांचे घोर अज्ञान दाखवते. चातुर्वण्र्य व्यवस्थेद्वारे संपूर्ण समाजाला हजारो जातीपातींत विभाजित करणे हा जातीयवाद पूर्वीच दृढ नव्हता का? एका मोठय़ा समाजघटकाला कमरेवर झाडू आणि गळ्यात मडके बांधून गावकुसाबाहेर पशुवत जगण्यास भाग पाडणाऱ्या स्वजातीबांधवांच्या जातीयवादी दृढतेचा पेठे यांना सोयीस्करपणे विसर पडला. राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद होण्यापूर्वी शेकडो वर्षे स्वयंघोषित १०० टक्के आरक्षण जातीय श्रेष्ठत्वाच्या मानसिकतेने उपभोगणाऱ्या पेठे यांची ‘आरक्षण पीडित’ असल्याची बतावणी म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबाच.
आरक्षणाची तरतूद करणे वेगळे आणि त्याची अंमलबजावणी होणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आरक्षणाच्या उद्गात्यांनी आरक्षणाची तरतूद केली परंतु त्याची अंमलबजावणी आरक्षणविरोधकांच्या हातात राहिल्याने त्याच्या अपेक्षित परिणामांवर बोळा फिरविला गेला. म्हणूनच आजही मागासवर्गीयांचा लाखोंचा अनुशेष बाकी आहे, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून कसे चालेल? याउलट जातीय श्रेष्ठत्वाच्या आधारावर १०० टक्के आरक्षण उपभोगणारा पेठे यांचा ३.५ टक्के ‘आरक्षणपीडित’ समाज आजही ५० टक्के आरक्षण उपभोगतो आहे, तर उर्वरित ५० टक्के आरक्षण हजारो जातींत विभागले गेले आहे, ही वस्तुस्थिती समजून घ्यायला मानसिकता बदलण्याचीच गरज आहे.
आजही स्वजातीय श्रेष्ठत्वाच्या अहंकारामध्ये तसूभरही बदल झालेला नाही, हे पेठे यांनी आरक्षणपीडितांना सुचविलेल्या अफलातून उपायातून ठळकपणे समोर आले. अशा मानसिकतेला उत्तर द्यायला तुकारामांच्या अभंगाची प्रकर्षांने आठवण होते.
मुखे सांगे ब्रह्मज्ञान। जनलोकांची कापितो मान।।
ज्ञान सांगतो जनांसी। नाही अनुभव आपणासी।।
कथा करितो देवाची। अंतरी आशा बहु लोभाची।।
तुका म्हणे तोची वेडा। त्याचे हाणूनि थोबाड फोडा।।
आततायी उपाय सुचविण्यापूर्वी बहुजन आता संत तुकारामांच्या अभंगांचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत, याचा पेठे यांनी जरूर विचार करावा.
प्रा. प्रवीण देशमुख,
माटुंगा, मुंबई

आरक्षणाचे भूत

शिक्षण-नोकरी यात जातीच्या आधारावर आरक्षण हा सामाजिक गुन्हा आहे, असे मी मानतो. पण त्याचबरोबर आरक्षणाप्रमाणे ‘डोनेशन कोटा’ यालाही विरोध करायला हवा. जातीनंतर आता लिंगभेदावर आधारित आरक्षण सुरू आहे. डॉ. आंबेडकरांनी तर हे नक्कीच सांगितलं नव्हतं. तोंडाने जातीनिर्मूलनाच्या गप्पा करायच्या आणि व्यवहारात आरक्षण देऊन जातीभावना बळकट करायची ही राजकारण्यांची ‘मतपेटी’ आणि ‘खुर्ची’ यासाठीची चाल आहे. दुर्दैवाने लोकशाहीत आरक्षणवादी समाजाची संख्या जास्त आहे. आरक्षणवाद्यांनी इतका बुद्धिभेद केला आहे की ‘आरक्षण असायला हवं’ असं कथित बुद्धिवादीही म्हणतात. ‘गरिबाला आरक्षण द्या’ हा त्यातलाच प्रकार आहे. गरिबांना आर्थिक सवलत व मदत आवश्यक आहे. होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना तशी मदत करणेही सर्वाचे कर्तव्य आहे. जातीधर्म व लिंगभेद न करता!
अशोक केळकर,
माहीम, मुंबई

समाजहितासाठी ब्रह्मचर्याची अट नको

भारतीय कॅथलिक बिशप्स परिषदेचे प्रवक्ते फादर बाबू जोसेफ यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच चिंता व्यक्त केली की, हल्ली धर्मगुरू व नन्स होऊ इच्छिणाऱ्या कॅथलिक तरुण-तरुणींच्या संख्येत ४० टक्के घट झाली आहे. यामुळे भारतात आगामी काळात चर्चच्या सुमारे ३० हजार शैक्षणिक संस्था व इतर सहा हजार रुग्णालये तसेच अनेक धर्मादाय संस्था चालविण्यासाठी अडचण येणार आहे.
धर्मगुरू व नन्स हे आयुष्यभर अविवाहित राहून समाजासाठी कार्य करीत असतात. भारतात अडीच टक्के ख्रिस्ती समाज सुमारे २५ टक्के शैक्षणिक व आरोग्यविषयक संस्था चालवितात, असे म्हटले जाते. याचाच अर्थ उर्वरित ७५ टक्के संस्था या बिगर ख्रिस्ती समाजातर्फे चालविल्या जातात. हे बांधव विवाह करून व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊन उत्कृष्ट प्रकारे कार्य करीत आहेत.
खरे म्हणजे ख्रिस्ती जनतेच्या दानधर्मातून उभ्या राहिलेल्या चर्चच्या शैक्षणिक व आरोग्य संस्था या सध्या चर्चच्या मालकीच्या आहेत आणि त्याद्वारे धर्मगुरू व नन्स मोठा व्यवसाय करीत आहेत. चर्चने या संस्था विवाहित ख्रिस्ती जनतेकडे हस्तांतरित कराव्यात म्हणजे आध्यात्मिक कार्यासाठी धर्मगुरू व नन्सचा तुटवडा भासणार नाही.
विन्सेंट बागूल,
मुंबई

ते मंतरलेले दिवस

गजाननराव वाटवे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आज साठीच्या आसपास असलेल्या मराठी रसिकांची मने भूतकाळातल्या त्या मंतरलेल्या दिवसांत हमखास शिरली असणार! त्या काळी दादरला राम मारुती रोडजवळ गणेशोत्सवात व त्यापाठोपाठ दादर सार्वजनिक नवरात्रोत्सवात गजाननरावांचा सुश्राव्य भावगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असे. त्या कार्यक्रमाला दोन्ही ठिकाणी तरुण- तरुणींच्या झुंडी, सागरी लाटांप्रमाणे येऊन धडकत. शिवाय त्यांना पाहण्यासाठी चाळींच्या गॅलऱ्या तसेच खिडक्या आबालवृद्ध रसिकांनी तुडुंब भरून जात.
गजाननराव वाटवे प्रत्येक गाण्यागणिक श्रोत्यांच्या हृदयाचा अधिकाधिक ठाव घेत असत. कार्यक्रमाचा कळस म्हणजे समारोपाचे गीत, ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधु आई.. बोलावू तूज आता मी कोणत्या उपाये’! त्यांच्या आवाजातील हे गाणे मन हेलावून टाकीत असे. हे गीत गाण्याआधी ते आवाहन करीत की, गाणे चालू असताना त्यातील भावनांचा आदर राखण्यासाठी कुणीही मध्येच उठून जाऊ नये. अर्थातच त्याला प्रेक्षकांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभे. भावगीत विश्वातील अनभिषिक्त मराठी सम्राटाच्या पवित्र स्मृतीला माझे कोटी कोटी प्रणाम!
विनायक वढावकर, अंधेरी, मुंबई ते मंतरलेले दिवस
ल्ल गजाननराव वाटवे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आज साठीच्या आसपास असलेल्या मराठी रसिकांची मने भूतकाळातल्या त्या मंतरलेल्या दिवसांत हमखास शिरली असणार! त्या काळी दादरला राम मारुती रोडजवळ गणेशोत्सवात व त्यापाठोपाठ दादर सार्वजनिक नवरात्रोत्सवात गजाननरावांचा सुश्राव्य भावगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असे. त्या कार्यक्रमाला दोन्ही ठिकाणी तरुण- तरुणींच्या झुंडी, सागरी लाटांप्रमाणे येऊन धडकत. शिवाय त्यांना पाहण्यासाठी चाळींच्या गॅलऱ्या तसेच खिडक्या आबालवृद्ध रसिकांनी तुडुंब भरून जात.
गजाननराव वाटवे प्रत्येक गाण्यागणिक श्रोत्यांच्या हृदयाचा अधिकाधिक ठाव घेत असत. कार्यक्रमाचा कळस म्हणजे समारोपाचे गीत, ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधु आई.. बोलावू तूज आता मी कोणत्या उपाये’! त्यांच्या आवाजातील हे गाणे मन हेलावून टाकीत असे. हे गीत गाण्याआधी ते आवाहन करीत की, गाणे चालू असताना त्यातील भावनांचा आदर राखण्यासाठी कुणीही मध्येच उठून जाऊ नये. अर्थातच त्याला प्रेक्षकांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभे. भावगीत विश्वातील अनभिषिक्त मराठी सम्राटाच्या पवित्र स्मृतीला माझे कोटी कोटी प्रणाम!
विनायक वढावकर,
अंधेरी, मुंबई

रेती कशी असते..?

काही दिवसांपूर्वी अलिबागला जाण्याचा योग आला. विशेषत: किहीम, आवास व सासवण्याचा समुद्रकिनारा पाहिला आणि चाटच पडलो. तेथे अनेक टेंपो राजरोसपणे रेतीची वाहतूक करीत होते.
सागरी किनारा अती संवेदनशील आहे हे २६ नोव्हेंबरच्या उदाहरणाने जगाला दाखवून दिले आहे. तरी किनारा रक्षक दल असूनही अशी अवैध वाहतूक होते कशी? आपण आपल्या पुढील पिढीचे किती नुकसान करीत आहोत याची या अधिकाऱ्यांना पगार घेताना जाणीव होत नाही का? दुर्दैवी अलिबागकरा, त्या रेतीचे फोटो काढून ठेव. म्हणजे पुढील पिढीला समुद्रातील रेती कशी असते ते तरी कळेल.
रमेश भोसले,
मुलुंड, मुंबई

शिक्षक उदासीन का?

१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीेक्षेतील चुका दाखविणारी तीन पत्रे वाचली. मात्र या महत्त्वाच्या परीक्षेतील या समस्यांबद्दल एकाही शिक्षकाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्याची कारणे खालीलप्रमाणे असावीत-
१) शिक्षकांची विद्यार्थ्यांबद्दलची उदासीनता. शिकवल्याबद्दल पगार मिळाला, बस्स झाले. आपली जबाबदारी संपली.
२) आपण विरोधी लिहिले तर वरिष्ठ रागावतील व आपल्या नोकरीत अडचणी निर्माण होतील, ही भीती.
विद्यार्थ्यांना घडवणे ही ज्यांची आद्य जबाबदारी त्या शिक्षकवर्गानेच उदासीन राहून कसे चालेल?
प्रशांत राणे,
लालबाग, मुंबई