Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

सातारा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारसभेत बुधवारी सातारा येथे बोलताना सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे. व्यावपीठावर पुरुषोत्त्म जाधव, गजाभाऊ कुलकर्णी, आमदार शंभूराज देसाई, आमदार दगडू सपकाळ, दीपक पवार.

सांगली, पंढरपूरमध्ये रविवारी राहुल गांधी यांच्या सभा
सांगली, १५ एप्रिल / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचारासाठी युवा नेते खासदार राहुल गांधी हे रविवार दि. १९ एप्रिल रोजी येत आहेत. सांगली व पंढरपूर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत. सांगलीच्या या त्यांच्या पहिल्याच दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे.

शिवाजीमहाराज छत्रपती घराण्याची मक्तेदारी नाही - उद्धव ठाकरे
सातारा, १५ एप्रिल/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेण्याचा अधिकार सर्वाना आहे. छत्रपतींच्या घराण्याची ती मक्तेदारी नाही. मावळेच खऱ्या अर्थाने शिवरायांचे वंशज आहेत. त्यामुळे उदयनराजे तुम्हीसुद्धा पगडी काढा. जनतेला नतमस्तक होणारा रात्री- अपरात्री भेटणारा खासदार हवा आहे. राजे महाराजे गोरगरिबांना फवसतात, त्यांना न भुलता शिवसेनेच्या खरोखरच पुरुषोत्तम असलेल्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धवला महागात पडेल- उदयनराजे
सातारा, १५ एप्रिल/प्रतिनिधी
मी छत्रपतींची पगडी घालून रोज फिरतो काय? राजेशाही गेली, लोकशाही आली म्हणून राजघराण्याची मानाची पगडी घालण्याची परंपरा सोडून देऊ का? ठाकरे घराण्याने पाश्चिमात्य संस्कृती पत्करली असावी त्यामुळेच ते भारतीय रुढी- परंपरा संस्काराला तिलांजली द्यायला सांगत आहेत. छत्रपतींचे नाव वापरण्याचे त्यांनी बंद करावे, हाच मुद्दा घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्यांना ते महागात पडेल, असा इशारा छत्रपतींचे थेट १३ वे वंशज राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पवार, शिंदेंमुळे सोलापूर जिल्ह्य़ाचा नूर बदलणार!
सोलापूर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

माढय़ातून शरद पवार आणि सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे या राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेत्यांमुळे सोलापूर जिल्ह्य़ाची लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ाचा नूर बदलणार असल्याचे राजकीय वातावरण दिसून येत असल्याचे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब शेळके यांनी सांगितले.

कोल्हापूरचा पवारांचा तीनदा दौरा हा नैतिक पराभव- मंडलिक
कोल्हापूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी
पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असणारे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना कोल्हापूर जिल्ह्य़ात सलग तीनवेळा प्रचार दौरा करावा लागतो. यातच त्यांचा नैतिक पराभव असून कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळेच निकालानंतर शिमगा कोण करणार ? हे राष्ट्रीय नेत्यांना त्या वेळी कळून चुकेल असा इशारा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे डावी लोकशाही आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी करवीर दक्षिण भागातील आपल्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी बोलताना दिला. त्यांच्यासोबत माजी आमदार संपतराव पवार पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते.

चांगल्या समाजनिर्मितीसाठी उमेदवारी - पोळ
फलटण, १५ एप्रिल/वार्ताहर
माझी उमेदवारी कोणाविरुद्ध नाही. माझी उमेदवारी समाजातील अपप्रवृत्तींविरुद्ध असून, लोकशाहीतील हा समाज मला भयमुक्त करून विकासाच्या प्रक्रियेत आणायचाय. चांगली समाजनिर्मितीसाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. माधवराव पोळ यांनी केले. डॉ. पोळ यांनी स्वतच्या प्रचारार्थ वैद्यकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. चांगल्या लोकांनी राजकारणात उतरून लोकांची सेवा करावी, अशी साद माझ्या गुरुंनी घालत मला निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. त्यामुळे माझी उमेदवारी जाहीर झाली असून, चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीचा हा संघर्ष आहे. माझ्या उमेदवारीमुळे एक वेगळा संदेश या देशात जाणार आहे.

सांगली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खाडिलकर
सांगली, १५ एप्रिल / प्रतिनिधी
सांगली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक नितीन गंगाधर खाडिलकर, तर उपाध्यक्षपदी जनार्दन भास्कर लिमये यांची निवड करण्यात आली. सांगली शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक येथील मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सांगली शिक्षण संस्था ही ९० वर्षांची जुनी शिक्षण संस्था असून पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा व अध्यापक महाविद्यालय यासह संस्थेच्या ३२ शाखा कार्यरत आहेत. नूतन अध्यक्ष नितीन खाडिलकर व उपाध्यक्ष जनार्दन लिमये हे गेली सात वर्षे संस्थेचे संचालक म्हणून काम पाहात असून, यापूर्वी प्राथमिक व पूर्व प्राथमिक समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

शंकरराव खरात यांचा आटपाडीत स्मृतिदिन
आटपाडी, १५ एप्रिल / वार्ताहर

थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांची पुण्यतिथी गुरूवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सूर्योपासना मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आर. आर. देशमुख यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी डॉ. शंकरराव खरात यांच्या कार्याचा आढावा घेत प्रतिष्ठानकडून अन्य सामाजिक कार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खजिनदार शिवाजीराव पाटील, सचिव विलास खरात, रवींद्र देशपांडे, शाम देशपांडे, सादिक खाटीक, सोपान ऐवळे, अरूण भागवत, राजेंद्र खरात, दगडू सपाटे, रमेश खरात व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

प्रा. वीणा कणबसकर यांना शिक्षणशास्त्राची पीएच. डी
सोलापूर, १५ एप्रिल/ प्रतिनिधी
येथील कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील प्रा. वीणा कणबसकर यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्रातील पीएच. डी प्रदान केली आहे. त्यांनी ‘हरिवंशराय बच्चन का शिक्षा में योगदान-चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. डॉ. के. एम. बोंदार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कणबसकर यांनी हा शोधप्रबंध लिहिला होता.

मुंबईच्या बुध्दिबळ स्पर्धेत सोलापूरचा राठोड अजिंक्य
सोलापूर, १५ एप्रिल/प्रतिनिधी
मुंबईत मुलूंडमध्ये बीएनडब्ल्यू चेस अ‍ॅकॅडमीतर्फे भरविण्यात आलेल्या जलद बुध्दिबळ स्पर्धेत सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त खेळाडू गोपाळ राठोड याने अजिंक्यपद संपादन केले. या स्पर्धेत ७२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात ४० खेळाडू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते.

कराडमधील गूळ वाहतूकदार हमालांचा संप मागे
कराड, १५ एप्रिल/वार्ताहर
कराड गूळ मार्केटमधील हमालांनी हमालीच्या दरवाढीसाठी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशी सामोपचाराने झालेल्या वाटाघाटींनंतर मागे घेतला. संपामुळे ठप्प झालेली गूळमार्केटची २० लाख रुपयांची उलाढाल आज पूर्ववत सुरू होऊन गूळ उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी निश्वास टाकला. शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक, गूळ व्यापारी व आंदोलनकर्ते हमाल यांच्यात आज बैठक झाली. त्यात आचारसंहिता संपल्यानंतर कोल्हापूर गूळ मार्केटप्रमाणे हमाली देण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याने हमालांनी आपला बेमुदत संप मागे घेतला.

इचलकरंजी अर्बन बँकेचे समाशोधन बँकेनेच थांबविले
इचलकरंजी, १५ एप्रिल / वार्ताहर
शहरातील सर्वात जुन्या इचलकरंजी अर्बन सहकारी बँकेचे समाशोधन सोमवारी थांबवले. बँक व्यवस्थापनाने स्वत:हून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. नगरीचे अधिपती नारायणराव घोरपडे यांनी या बँकेचे रोपटे लावले. ७८ वर्षांच्या इतिहासात बँकेचे समाशोधन सोमवारी थांबले. बँक व्यवस्थापनाने आर्थिक कमतरता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असे सांगण्यात आले. बँकेमध्ये दररोज सुमारे १ कोटी रुपयांचे समाशोधन होते. यामुळे धनादेशाद्वारे व्यवहार करणाऱ्या तसेच आर्थिक देवघेव करणाऱ्या ग्राहकांची ऐनवेळी गैरसोय झाली.आठ शाखा असलेल्या बँकेच्या ठेवी १०० कोटी रुपयांच्या आहेत. तर कर्जव्यवहार ७५ कोटी रुपयांचा आहे. बडय़ा कर्जदारांनी कर्ज थकवल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत देताना व्यवस्थापनास कसरत करावी लागत आहे.