Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

कसाबला दिलेल्या वकिलाची नियुक्ती रद्द
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदार आणि अटक करण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब असे दोघांचे वकीलपत्र स्वीकारून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा तसेच न्यायालयापासून हे सत्य लपवून व्यावसायिक गैरवर्तन केल्याचा ठपका अ‍ॅड. अंजली वाघमारे यांच्यावर ठेवत कसाबच्या वकील म्हणून दिलेल्या त्यांच्या नियुक्ती आदेश आज विशेष न्यायालयाने रद्दबातल ठरवले. यापूर्वी ३० एप्रिल रोजी न्यायालयाने अ‍ॅड. वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती केली होती. कसाब आणि अन्य दोन आरोपींविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी आज पहिल्यांदाच आर्थर रोड येथील विशेष न्यायालयात सुरू झाली.

डॉ. विजया पाटील यांचे अपघाती निधन
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ. विजया पाटील यांचे मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात जागीच निधन झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता जात असताना सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या ईनोव्हा गाडीच्या पुढील चाकांचे टायर फुटल्याने गाडी फरफटत गेली व रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आढळली. दुभाजकावरील लोखंडी सळी डॉ. पाटील यांच्या पोटात घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या ६५ वर्षांंच्या होत्या. उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लखलख चंदेरी दुनियेत मराठी पाऊल पडले पुढे..!
एकाच दिवशी झळकणार पाच मराठी चित्रपट

राजेंद्र जोशी, कोल्हापूर, १५ एप्रिल

राजकारण आणि कमालीचा उन्हाळा यामुळे तापून निघालेल्या महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी एक खूशखबर आहे. महेश मांजरेकर प्रस्तुत ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू असताना येत्या शुक्रवारी एकाचवेळी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून, गेली काही वर्षे अंधाराच्या छायेत गेलेली मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा नव्या तेजाने चमकू लागेल असा, विश्वास चित्रपट वर्तुळातून व्यक्त होत आहे.

बिहार-झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा रॉकेट हल्ला
लतेहार/सासाराम, १५ एप्रिल / पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातच मोठा हिंसाचार घडवण्याच्या इराद्याने माओवादी नक्षलवाद्यांनी आज झारखंड आणि बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यात केंरापोच्या एका जवानासह दोघे ठार आणि सात जखमी झाले. मात्र, केंरापोने दिलेल्या जबर प्रत्युत्तरात पाच नक्षलवादीही मारले गेले. झारखंडमध्ये राजधानी रांचीपासून १२५ किमी अंतरावर असलेल्या लतेहार भागात माओवादी नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राच्या दिशेने जाणाऱ्या बसखाली भूसुरुंगस्फोट घडवला. ही बस पालामौ मतदारसंघात जात होती.

राज्य शासनाच्या अनोख्या कोडय़ाने कर्मचारी हैराण!
नीरज पंडित, मुंबई, १५ एप्रिल

राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सध्या एका कोडय़ात टाकले असून या कोडय़ाचीच चर्चा सध्या मंत्रालयापासून ते गाव पातळीपर्यंत सर्वत्र सुरू आहे. पदोन्नती घ्या आणि कमी निवृत्तीवेतन स्वीकारा किंवा निवृत्त होईपर्यंत आहात त्याच पदावर राहा आणि चांगले निवृत्तीवेतन स्वीकारा असे दोनच पर्याय शासनाने कर्मचाऱ्यांसमोर ठेवले असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी शासनाच्या या निर्णयाला कडवा विरोध दर्शविला आहे. वित्त विभागाच्या ३१ ऑक्टोबर २००५ च्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या (महाराष्ट्र नागरी सेवा, निवृत्तीवेतन नियम १९८२ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना) निवृत्ती वेतन योजनेऐवजी नवीन ‘परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना’ लागू होणार आहे. ही अशंदायी निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाने २२ डिसेंबर २००३ रोजीच्या निर्णयाने केंद्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. याच धरतीवर राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५पासून ही योजना राज्यात लागू केली आहे. या योजनेमध्ये निवृत्तीवेतन कमी मिळणार आहे. या योजनेमध्ये कर्मचाऱ्याला आपल्याच वेतनातील १० टक्के रक्कम शासनाकडे निवृत्तीवेतनापोटी जमा करावी लागणार आहे.

पाकिस्तानी वकील हवा कसाबचा पुन्हा घोशा
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

अ‍ॅड. अंजली वाघमारे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द केल्यानंतर कसाबने आपल्याला पाकिस्तानी वकीलच देण्याची विनंती पुन्हा एकदा न्यायालयाकडे केली. या प्रकरणी पाकिस्तानी दूतावासाकडे नव्याने पत्रव्यवहार करण्याची विनंती न्यायालयाने या वेळी मान्य केली. मात्र त्याचवेळी खटल्याचे स्वरुप आणि गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्याच्यासाठी वकील नियुक्त करणे गरजेचे असल्याचे सांगत उद्याच याप्रकरणी नवीन वकिलाची नियुक्ती करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्याचे मतदान आज
नवी दिल्ली, १५ एप्रिल/ पीटीआय

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद, भारतीय जनता पक्षाचे नेते मुरली मनोहर जोशी आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांचे राजकीय भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. १५ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १२४ मतदारसंघांमध्ये उद्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे.

वर्चस्व कायम राखण्याचे शिवसेना-भाजपपुढे आव्हान
मुंबई, १५ एप्रिल / खास प्रतिनिधी

पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. विदर्भात वर्चस्व कायम राखण्याचे शिवसेना-भाजप युतीपुढे आव्हान असतानाच गेल्या वेळी विदर्भात फक्त एक जागा मिळालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने युतीपुढे आव्हान उभे ठाकले आहे. यंदा विदर्भात चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत.

‘सेन्सेक्स’ची ३१८ अंशांनी आगेकूच
मुंबई, १५ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

सकाळच्या सत्रातील मरगळ झटकून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज सलग आठव्या दिवशी तेजीत सातत्य राखत पुन्हा ३१८ अंशांची कमाई केली आणि ११ हजार अंशाच्या पातळीपुढे दमदार आगेकूच केली. सेन्सेक्सने आज गेल्या सहा महिन्यातील ११,२८४.६३ असा उच्चांक गाठला. भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या विद्यमान आर्थिक वर्षांबाबत निराशादायी अंदाजाच्या पाश्र्वभूमीवर, आज बाजाराने मोठय़ा पडझडीने सुरुवात केली. बाजार खुला झाला तेव्हा १०,७१९.१८ अशा नीचांकापर्यंत सेन्सेक्स घसरला होता. म्हणजे बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सने तब्बल ५६५ अंशांनी झेप घेतली. विदेशी वित्तसंस्थांसह, देशी म्युच्युअल फंड आणि वित्तीय संस्था तसेच सामान्य गुंतवणूकदारांचा बाजारात पूर्वीइतका राबता वाढला असून, एकंदर उलाढालीनेही विलक्षण गती पकडली आहे. या गेल्या सहा महिन्यात अपवादाने दिसलेल्या बाबींमुळे सेन्सेक्सच्या आगामी आगेकूचीबाबत उत्साही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. निवडणुकांचे निकाल येईपर्यंत ‘सेन्सेक्स’ ११ हजारांच्या पातळीवरून माघार घेणार नाही, असा आघाडीच्या विश्लेषकांचा कयास आहे.

शेवगावजवळ अपघात; ९ ठार, २५ जखमी
शेवगाव, १५ एप्रिल/वार्ताहर

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली स्कूलबस व एसटी बसच्या भीषण अपघातात नऊजण ठार, तर २५जण जखमी झाले. शेवगाव-गेवराई रस्त्यावरील गर्जेवस्तीजवळ दुपारी दोन वाजता ही घटना घडली. एसटी बसमधील द्वारका किसन बोराडे (वय ५५, गेवराई, जि. बीड), इलियास अकबर लेले (वय ४०, बोधेगाव, ता. शेवगाव) भारती हिरामण साळवे (वय १४, माजलगाव, जि. बीड), किरण सुवालाल पारख (वय ४५, गंगापूर, जि. औरंगाबाद) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. खासगी बसमधील ज्ञानदेव काशिनाथ निर्मळ (वय ६५, निर्मळपिंप्री, ता. राहाता) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर चार मृतांची ओळख पटलेली नाही. राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री येथून बीडकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली तानाजी पाटील म्हस्के एज्युकेशन सोसायटीच्या विद्या विकास पब्लिक स्कूलची बस व वसमतहून भिवंडीकडे चाललेली एसटी बस यांची शेवगाव-गेवराई रस्त्यावर शेवगावजवळील गर्जेवस्तीजवळ आज दुपारी दोन वाजता जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, लक्झरीच्या धडकेने एसटी बस चालकाच्या बाजूने निम्मी फाटली.

डाव्यांशी युतीचे पर्याय खुले, पंतप्रधानांचे संकेत
नवी दिल्ली, १५ एप्रिल /खास प्रतिनिधी

भारत-अमेरिका अणुकरारावरून डाव्या पक्षांची साथ सुटल्याबद्दल खेद व्यक्त करीत लोकसभा निवडणुकांनंतर डाव्या आघाडीशी युतीचे पर्याय खुले असल्याचे संकेत आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एडिटर्स गील्डच्या सदस्यांशी चर्चा करताना दिले. काँग्रेसशी निवडणुकांनंतर युती करण्याची आमचीही तयारी आहे, पण त्यासाठी आधी अणुकरार रद्द करावा लागेल, अशी तिखट प्रतिक्रिया डाव्या आघाडीने दिली. गेल्या वर्षी २२ जुलै रोजी युपीए आणि डाव्या आघाडीची अणुकराराच्या मुद्यावरून ताटातूट झाली होती. डाव्या आघाडीसोबत आमची हातमिळवणी होणार की नाही, हे परिस्थितीवर अवलंबून असेल, असे मनमोहन सिंग म्हणाले.

‘प्रश्नच उद्भवत नाही’
सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केले आहे. तर काँग्रेसने आधी अणुकरारापासून माघार घ्यावी. त्यानंतरच आम्ही त्यांच्याशी निवडणुकांनंतर समझोता करण्याविषयी चर्चा करू, अशी अट माकप पॉलिटब्युरोचे सदस्य एम. के. पंधे यांनी मनमोहन सिंग यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना घातली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी