Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

नांदेड-परभणी-हिंगोलीमध्ये आज मतदान
दोन गावांचा बहिष्कार मागे

नांदेड, १५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात उद्या (गुरुवारी) मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज दिली. नांदेड मतदारसंघात सुमारे १४ लाख ४४ हजार मतदार आहेत. एकूण १ हजार ६९१ मतदानकेंद्रे असून, त्यापैकी ४१ केंद्रे नक्षलग्रस्त व २५ उपद्रवी केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. पंधरा गावांतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्यापैकी दोन गावांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतल्याचे कळवले, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

चिखलातून वर येऊ पाहणारे कमळ!
लक्ष्मण राऊत

मतदानाची तारीख आठवडय़ावर आली आणि आता कुठे जालना मतदारसंघातील प्रचारात रंग भरू लागला आहे. जिल्ह्य़ातील जवळपास पस्तीस-चाळीस टक्के भाग परभणी मतदारसंघात गेलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव चौथे, आमदार सुरेश जेथलिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव टोपे, पालकमंत्री राजेश टोपे आणि अन्य मंडळींचा प्रचारासाठीचा ओढा परभणी मतदारसंघातील घनसावंगी, मंठा, परतूर या तालुक्यांकडेच राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार परभणी मतदारसंघात आहेत, तर भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचे उमेदवार जालन्यात आहेत. त्यामुळेही हा ओढा राहिला.

कृषिसाक्षरता
महात्मा जोतिराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या महत्त्वपूर्ण ग्रंथात केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच चर्चा केली आहे, असे नव्हे तर एकूणच कृषिव्यवस्था आणि कृषकांच्या व्यक्तिमत्त्वाचाही अन्वयार्थ मांडला आहे. कृषीला व्यवसायातून पाहताना, माणूसपणाचाही संदर्भ त्यांना महत्त्वाचा वाटत होता. म्हणूनच या ग्रंथाच्या प्रास्ताविक उपोद्घातात एक विचारसूत्र अतिशय प्रभावीपणे त्यांनी मांडले आहे. ‘शिक्षण’ ही गोष्ट तर त्यांच्या एकूणच कर्तृत्वाचा महत्त्वाचा भाग होता. पण आपण ज्याला रूढ अर्थाने ‘शिक्षण’ म्हणतो, त्यापेक्षा त्यांची शिक्षणाविषयी किती तरी वेगळी कल्पना व्यक्त होताना दिसते.

गाडी-गाडीतला फरक
घ्जालन्यातून निवडणूक लढविणारे उमेदवार हतबल आहेत. काय करावे नि कसे करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले आहे. प्रश्न तर मोठ्ठा आहे. सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारासाठी निघायला काहीशी टाळाटाळ करताना दिसतात. कडक उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात फिरायला अनेक कार्यकर्ते नाखूश दिसतात. एक तर सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रचार करून परतायचे किंवा सायंकाळी पाचनंतर प्रचारासाठी निघायचे असा प्रकार चालू आहे. परवा एका बडय़ा पुढाऱ्याने एका कार्यकर्त्यांस विचारले की, तुम्हाला गाडी मिळाली तरी तुम्ही आमच्यासारखे प्रचारात दिसत नाही! त्यावर हा कार्यकर्ता म्हणाला की, साहेब, तुमची गाडी ए.सी. आहे आमच्या गाडीत उन्हाचा फार त्रास होतो!

--------------------------------------------------------------------------

यंत्रणा निघाली टेम्पोतून.. परभणी मतदारसंघात गुरुवारी मतदान आहे. मतदानाची सर्व सामग्री घेऊन परभणीतून बुधवारी कर्मचारी आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले. अनेकांच्या नशिबी असा टेम्पोचा प्रवास होता.

मतपेटीच्या राजकारणामुळे देशाची सुरक्षा धोक्यात - मोदी
जालना, १५ एप्रिल/वार्ताहर

‘‘देशाला विकास हवा आणि सुरक्षाही हवी. सुरक्षा नसेल तर विकास काय कामाचा? काँग्रेस पक्ष मतपेटीचे राजकारण करीत असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे,’’ असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. जालना मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ श्री. मोदी यांची आज सभा झाली. ते म्हणाले की, पन्नास-पंचावन्न वर्षे देशात एकाच पक्षाचे आणि त्यातही एकाच कुटुंबाची सत्ता अधिक काळ राहिली आहे.

ही माझी कोयता ‘व्होट बँक’- मुंडे
बीड, १५ एप्रिल/वार्ताहर

‘‘ऊसतोडणी मजुराच्या पायात काटा टोचला तर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. आमचे असे मायेचे नाते असल्याने ही माझी ‘कोयता व्होट बँक’ आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर संसदेत जाताना हातात कोयता घेऊन जाईन आणि पहिले भाषणही ऊसतोडणी मजुरांसाठीच करीन. पंचवीस वर्षांच्या राजकारणात ऊसतोडणी मजुरांच्या आशीर्वादावरच यश मिळाले,’’ असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी काढले.

डॉ. पद्मसिंह पाटील यांचा आजवरचा प्रचार चार लाखांचा
गायकवाड यांचे उधारी खाते

उस्मानाबाद, १५ एप्रिल/वार्ताहर

अधिकृत प्रचाराच्या कालावधीतील १८ दिवस संपले. आता आठच शिल्लक आहेत. मागील १४ दिवसांत प्रमुख उमेदवारांपैकी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी रोख चार लाख ११ हजार ३१५ रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळविले आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे प्रा. रवी गायकवाड यांनी एक लाख ४० हजार ८८० रुपये खर्च दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी १२ हजार २०० रुपयांचा रोख खर्च केला. इतर १७ दिवसांत बहुतेक खर्च उधारी खात्यावर असल्याचे खर्चाच्या विवरणात नमूद केले आहे.

मराठवाडय़ातील सर्व उमेदवारांना.
मराठवाडय़ात रेल्वेचा प्रश्न गंभीर आहेत. मनमाड ते नांदेड हा मार्ग दुहेरी करणार का? रेल्वेचे प्रश्न कोणते याचा ‘निकाल’ लावणार का?
मकरंद देशपांडे, औरंगाबाद. सिंचन वगळता मराठवाडय़ाचा अनुशेष मोठय़ा प्रमाणावर आहे. या प्रश्नावर आपल्या सर्वाची भूमिका काय? अर्चना बापट, औरंगाबाद. औरंगाबाद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांना. आर्थिक मंदीत बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी योजना आहेत का? मिलिंद वैजापूरकर, औरंगाबाद.

आमचा जाहीरनामा
प्रश्नांना वाचा फोडावी

लोकसभेच्या निवडणुकांनाही विशेष महत्त्वाचे स्थान आहे. अशा अतिमहत्त्वाच्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधीही त्या तोलामोलाचे असण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रभक्ती, पक्षनिष्ठा, जनसामान्यांत स्वच्छ प्रतिमा असणारा, समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा आणि त्या प्रश्नांना लोकसभेत समर्थपणे वाचा फोडणारा प्रतिनिधी असणे ही काळाची गरज आहे. पण दुर्दैवाने असे म्हणावेसे वाटते की, निवडणुका म्हटले की, भ्रष्टाचार, आर्थिक व्यवहार, जातीची समीकरणे, विषारी टीका-टिप्पणी आणि कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करून साम-दाम-भेद-दंड आदी कूटनीतींचा वापर करून प्रतिनिधी निवडून जातो. त्या प्रतिनिधीचे दर्शन पुन्हा लोकसभेतही होत नाही आणि मतदारसंघातही होत नाही, हा इतिहास आहे.

लातूरकर देशमुख बंधूंची मस्ती उतरवा - तावडे
लातूर, १५ एप्रिल/वार्ताहर

संपूर्ण जिल्हा आंदण घेतल्याच्या अविर्भावात देशमुख बंधूंनी पश्चिम महाराष्ट्राचा उमेदवार लातूरकरांवर लादला आहे. त्यांची मस्ती जिरवण्यासाठी कार्यकर्त्यांनी लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आघाडी देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा, असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटमीस आमदार विनोद तावडे यांनी आज केले. लातूर व शहर ग्रामीण मतदारसंघातील मतदान केंद्रावरील गटप्रमुखांच्या बैठकीत श्री. तावडे बोलत होते. उमेदवार डॉ. सुनील गायकवाड, शिवाजी पाटील कव्हेकर, रमेश कराड, नागनाथ निडवदे, सुनील होनराव, देवीदास काळे, नवनाथ भोसले या वेळी उपस्थित होते. श्री. तावडे म्हणाले, ‘‘काँग्रेसने आपल्या राजवटीत कर्जाचा डोंगर जनतेच्या माथ्यावर उभा केला आहे. देशमुखांनी १ लाख ६० हजार कोटींचे कर्ज केले तर ते २ लाख कोटीपर्यंत नेण्याची तयारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण करीत आहेत. चव्हाणांना ‘नाईट वॉचमन’चा आरोप केल्याचे आवडत नाही. ते स्वत:ला धोनी समजतात. मात्र धोनी जशा गतीने धावा काढतो त्या गतीने राज्यात भ्रष्टाचार चालू आहे.’’ काँग्रेसच्या सरकारने जनतेचे वाटोळे केले आहे. भा. ज. प.चे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन लागू करण्याचे वचन वचननाम्यात दिलेले आहे, असे सांगून श्री. तावडे यांनी भा. ज. प.च्या जाहीरनाम्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर अधिकाधिक मतदान करून घ्यावे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे कोणत्या बूथवर किती मतदान झाले व त्या ठिकाणी पक्षाचा कोणता कार्यकर्ता काम करत होता, हे माहिती होत असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले.

पन्नास हजार मतदारांना ओळखपत्रच नाही
बीड, १५ एप्रिल/वार्ताहर

प्रशासनाच्या आवाहनानुसार मतदारांनी अर्ज दिल्यानंतरही पन्नास हजारांपेक्षा जास्त मतदारांना ओळखपत्र मिळाले नाही. त्यांना तातडीने ओळखपत्रांचे वाटप करावे अशी मागणी नगरसेवक सलीम जहाँगीर यांनी केली आहे. बीड मतदारसंघात मतदारांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. काही कारणांनी ओळखपत्रापासून वंचित राहिलेल्या मतदारांसाठी तहसील कार्यालयात अर्ज करून ओळखपत्र देण्याची तरतूद करण्यात आली. प्रशासनाने प्रसारमाध्यमातून तसे आवाहनही केले. मतदारयादीत नाव असताना छायाचित्र नसल्यामुळे ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी कार्यालयात जाऊन अर्ज दिले. पण वीज नाही, माणसे नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांखाली ओळखपत्रे देण्यात आली नाहीत. निवडणूक आठ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मतदारांना ओळखपत्रच मिळाले नाही, असे श्री. जहाँगीर यांचे म्हणणे आहे.
---------------------------------------------------------------------------

पाटील यांच्या प्रचारासाठी नळदुर्गमध्ये समन्वय समिती
नळदुर्ग, १५ एप्रिल/वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यकर्त्यांमध्ये अखेर मनोमिलन होऊन डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच शहरातून डॉ. पाटील यांना निर्णायक आघाडी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्रचारप्रमुख व उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी- रिपब्लिकन पक्षांच्या मनोमिलन मेळाव्यात मानपानावरून कार्यकर्त्यांनी एकमेकांशी हुज्जत घातल्याने या मेळाव्याचा फज्जा उडाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता- मराठवाडा वृत्तान्त’ने प्रसिद्ध केले होते. याची पक्षाच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक सुरेश देशमुख यांना नळदुर्ग येथे पाठविले. त्यांनी तिन्ही पक्षांच्या नेतेमंडळींशी सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर त्यांच्यात अखेर मनोमिलन झाले.

काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात उमेदवारी - बाबूराव पोटभरे
लोहा, १५ एप्रिल/वार्ताहर

काँग्रेसमधील मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या घराणेशाही विरोधात आपली उमेदवारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आंबेडकरी जनता स्वीकारणार नाही, असा दावा लातूर मतदारसंघातील भारिप-बहुजन मतदारसंघाचे उमेदवार बाबूराव पोटभरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. श्री. पोटभरे यांनी भा. ज. प.च्या उमेदवारासह टी. एम. कांबळे व बहुजन समाज पक्षाचे उमेदवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आंबेडकर चळवळीत काम करणारा आपण भीमसैनिक आहोत. मराठवाडय़ाला पाणी मिळू देणार नाही असे सांगणाऱ्या काँग्रेसने उमेदवारी देऊन घात केला. पोटभरे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची कंधार येथे सभा होणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

भिंत अंगावर पडून वृद्धेचा मृत्यू
औरंगाबाद, १५ एप्रिल/प्रतिनिधी

घरात झोपलेले असताना भिंत अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रमानगरात घडली. अनुसया सुपडुजी दाभाडे असे या वृद्धेचे नाव आहे.
अनुसयाबाई या पतीसह गल्ली क्रमांक ३ मध्ये पत्र्याच्या घरात राहात होत्या. त्यांना मूलबाळ नाही. सकाळी त्या झोपेतून उठण्यापूर्वीच अंगावर भिंत कोसळून ढिगाराखाली त्या दबल्या गेल्या. त्यांना ढिगारातून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन विभागाच्या पथकाने त्यांना बाहेर काढले आणि तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर करा - किशोर पाटील
औरंगाबाद, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी

जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांच्या प्रचारार्थ देवगाव रंगारी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्ह्य़ाचा विकास खुंटला आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणारे विकासाचा विचार देखील करत नाही, असे प्रा. पाटील यांनी सांगितले. खासदार निधीचा गैरवापर चंद्रकांत खैरे यांनी केला आहे, असा आरोप पवारांनी केला. खासदारांनी जिल्ह्य़ाच्या विकासासाठी आजपर्यंत काय काम केले हे त्यांनी दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी माजी आमदार नितीन पाटील, तालुकाध्यक्ष किसन कोल्हे, डॉ. गजानन सुरासे, जिल्हा परिषद सदस्य भरतसिंह राजपूत, देवीदास जाधव उपस्थित होते.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा युतीला पाठिंबा
औरंगाबाद, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्याला फोडण्याचे पाप काँग्रेसनेच केलेले आहे. अन्याय, अत्याचार, बेकारी, राखीव जागेचा अनुशेष न करण्याच्या निष्क्रीय असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काँग्रेसला काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे धोरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ठरविले आहे. ज्या मतदारसंघात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार उभा नाही अशा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे.
औरंगाबाद मतदारसंघात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार उभा नाही. या मतदारसंघात युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत. त्यांच्या पाठीशी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आवाहन पक्षाचे महामंत्री जे. के. नारायणे यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाने सत्ता उपभोगली ती दलित, मुस्लिम, आदिवासी समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, असे ते म्हणाले.

दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद, १५ एप्रिल/प्रतिनिधी

दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांनी अनुक्रमे झोपेच्या गोळ्या आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आशीष गौतम गवळी (२४, रा. वाघाला, ता. वैजापूर) आणि अरुण उद्धव राऊत (२५, रा. वाळूज) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशीष याने आज सकाळी रागाच्या भरात झोपेच्या गोळ्या घेतल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तर अरुण याने काल रात्री राहत्या घरी विष घेतले होते.

भाजलेल्या बालिकेचा मृत्यू
औरंगाबाद, १५ एप्रिल/प्रतिनिधी

गरम पाणी अंगावर पडल्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचा आज मृत्यू झाला. मोनिका अशोक जाधव (रा. बाकुळी) असे या बालिकेचे नाव आहे. शनिवारी सकाळी १० वाजता ती भाजली होती. तिच्यावर प्रथम खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कालपासून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. दुपारी तीन वाजता तिचा मृत्यू झाला.

पाणी व चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
वसमत, १५ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे तर चाऱ्याच्या प्रश्नानेही उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्यांना आपली लाखमोलाची जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. तरीही प्रशासन गाफील असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. पाऊस न झाल्यामुळे जनावरांच्या वैरणाचा प्रश्न आता ग्रामीण जनतेला सतावत आहे. बाजारात एक चाऱ्याची पेंढी दहा रुपयांना घ्यावी लागत आहे; त्यामुळे जास्तीची जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने बाजारात कवडीमोल भावात विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्यातील चारा परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी मोठी गर्दी करीत असल्यामुळे या चाऱ्याला मोठा भाव आला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लातूरमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे वापरण्यास मान्यता
लातूर, १५ एप्रिल/वार्ताहर

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या १० एप्रिलच्या पत्रानुसार लातूर मतदारसंघात हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडियाकडून राज्य निवडणूक आयोगाने खरेदी केलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. लातूर मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे पहिल्या यंत्रावर १ ते १५ व दुसऱ्या यंत्रावर १६ ते १८ उमेदवारांची नावे आणि चिन्ह असलेली मतपत्रिका व उमेदवारांची यादी (नमुना ७ अ) छापण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी कळविले.

गंगाखेडमधील निवडणूक यंत्रणा सज्ज
गंगाखेड, १५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या परभणी मतदारंसघात उद्या (गुरुवारी) मतदान होत आहे. गंगाखेड मतदारसंघातील ३२८ मतदानकेंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी डॉ. धनराज केंद्रे यांनी आज येथे दिली.
उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात (गंगाखेड, पालम, पूर्णा) एकूण ३२८ मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यासाठी १ हजार १७७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुमारे दहा टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ५९ हजार मतदार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालय, गोदावरी मंगल कार्यालय व समर्थ मंगल कार्यालयात निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही डॉ. केंद्रे यांनी दिली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मरगळवाडी १, पांढरगाव १, वझूर ३, दुसलगाव १, पांगरी १ ही मतदानकेंद्रे निवडणूक आयोगाकडून संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

धारूरमधील प्रचार अद्यापि थंडच
धारूर, १५ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असले तरी धारूर येथे अद्यापपर्यंत एकाही नेत्याची जाहीर सभा झाली नसल्याने येथील वातावरण थंडच आहे. नेत्यांनी शहरात गाठीभेटी व कॉर्नर बैठकांवरच भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासूनच जिल्ह्य़ात वरिष्ठ नेत्यांच्या सभा होत आहेत. मात्र मतदानाची तारीख सात दिवसांवर आली असतानाही धारूर येथे एकाही नेत्याची जाहीर सभा झालेली नाही. भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी एक कोपरा सभा घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांनीही गाठीभेटीवरच भर दिला आहे. आदर्श आचारसंहितेमुळे पक्षाचे झेंडे व स्पीकरचा आवाज नसल्याने निवडणुकीचे वातावरण थंडच आहे. पक्षाच्या कार्यालयातील गर्दी सोडता इतरत्र शांतताच आहे. एखाद्या पक्षाचा नेता शहरात जीपद्वारे आलाच तर त्याच्या गाडीला झेंडा व पोस्टर नसल्याने कोणत्या पक्षाचा नेता आला आणि गेला हेही समजत नाही.

लोह्य़ाचे गटविकास अधिकारी आर. जी. कोल्हेवाड यांचे निधन
लोहा, १५ एप्रिल/वार्ताहर

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. जी. कोल्हेवाड यांचे आज पहाटे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, तीन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. कोल्हेवाड यांच्यावर राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हेवाड यांनी १ एप्रिल २००६ रोजीपासून लोहा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. पाणीटंचाई, स्वच्छता अभियान, पाणंदमुक्ती ग्राम यात त्यांचे मोठे योगदान होते. महिन्यापूर्वी कार्यालयात काम करतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर ते कोमात गेले.

विवाहितेने पेटवून घेतले; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जिंतूर, १५ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील इटोली येथे एका विवाहितेने नणंदेच्या पतीने बलात्कार केल्यानंतर स्वत:ला पेटवून घेतले. त्यात ती ८० टक्के भाजली आहे. तिला परभणीच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी औंढा पंचायत समितीच्या माजी सभापती मंगला कुटे व निलंबित शिक्षक गजानन कुटे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरूवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब तर केलाच; पण पत्रकारांना माहिती देण्यासही नकार दिला. पीडित महिलेचे माहेर गंगाखेड तालुक्यातील असून सासर इटोली येथे आहे. तिची नणंद मंगला कुटे हिचा पती गजानन कुटे औंढा येथे शिक्षक होता. त्याला त्या शाळेतून निलंबित करण्यात आले होते. गजाननने दोन महिन्यांपूर्वी पत्नीच्या भावजईवर बलात्कार केला. तिने पतीला याबाबतीत सांगितल्यावर त्याने गप्प बसण्याचा सल्ला दिला. या महिलेने सासू-सासरे व नणंदेलाही आपल्यावर बलात्कार केल्याची हकीकत सांगितली. परंतु सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला. याला कंटाळून तिने रविवारी राहत्या घरी स्वत:ला जाळून घेतले. तिने काल सकाळी पोलिसांना जबाब दिला. तथापि पोलिसांनी दिवसभर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.