Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेड-परभणी-हिंगोलीमध्ये आज मतदान
दोन गावांचा बहिष्कार मागे
नांदेड, १५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात उद्या (गुरुवारी) मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा

 

सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज दिली.
नांदेड मतदारसंघात सुमारे १४ लाख ४४ हजार मतदार आहेत. एकूण १ हजार ६९१ मतदानकेंद्रे असून, त्यापैकी ४१ केंद्रे नक्षलग्रस्त व २५ उपद्रवी केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. पंधरा गावांतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्यापैकी दोन गावांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतल्याचे कळवले, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.
मतदान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ओळखपत्राच्या पुराव्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना व कर्मचारी विमा योजना ओळखपत्राचा समावेश असेल. परंतु यापूर्वी जाहीर केलेल्या शालेय, महाविद्यालयीन ओळखपत्र ग्राह्य़ धरले जाणार नाहीत, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. मतदानाला येणाऱ्या अपंगांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वानी निर्भयपणे मतदान करावे, कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मतदानाच्या पाश्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी दिली.
उमेदवार - २२.
मतदार - १४,४४,०००.
मतदानकेंद्रे - १,६९१.
परभणीत यंत्रणा सज्ज
परभणी, १५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होत असून एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघातल्या सर्व मतदानकेंद्रांवर मतदानयंत्रासह कर्मचारी आज रवाना झाले.
परभणी मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून परभणी, सेलू, परतूर, जालना हे चार उपविभाग या मतदारसंघात आहेत. आज येथून जिल्ह्य़ातील सर्व मतदानकेंद्रावर कर्मचाऱ्यासह पोलीस रवाना झाले. मतदारयाद्या, मतदानयंत्रे अशा सर्व साहित्यानिशी वेगवेगळ्या वाहनांनी हे कर्मचारी दुपारी येथून निघाले.
एकूण सोळा लाख १३ हजार ४ एवढे मतदार असून त्यात आठ लाख २९ हजार १९८ पुरुष व ७ लाख ८३ हजार ८०६ महिला आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मतदानापूर्वी तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आले. एकूण १ हजार ८५१ मतदानकेंद्राचे २१६ विभाग पाडण्यात आले. त्यासाठी दोनशे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २०३४ मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकाऱ्यांची संख्या ६५५९ एवढी आहे. लोकसभा मतदारसंघात सेनादलातील मतदार ८८३ एवढे असून यात ६२७ पुरुष तर २५६ महिलांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील मतदानकेंद्राची संख्या १ हजार ५२९ एवढी व शहरी भागातील मतदान केंद्रांची संख्या ३२२ आहे. मतदारसंघात एकूण ५२ संवेदनशील मतदानकेंद्रे असून यातील ४८ परभणी जिल्ह्य़ातील तर चार जालना जिल्ह्य़ातील आहेत. परभणी जिल्ह्य़ातील मतदानकेंद्राकडे उपलब्ध असणाऱ्या मतदानयंत्राची संख्या १५५० एवढी आहे. यात परतूर व घनसावंगी या विधानसभा मतदारसंघासाठी लागणाऱ्या मतदानयंत्राचा समावेश नाही. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ४७६ वाहने लागणार असून यात २६२ सरकारी व २०४ खासगी वाहनांचा समावेश आहे.
सर्व यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली असून कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी मोहन ठोंबरे यांनी सांगितले.
उमेदवार - १९.
मतदार - १६,१३,००४.
मतदानकेंद्रे - १,८५१.
उमेदवारांच्या नशिबाचा आज फैसला
हिंगोली, १५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात गेल्या १५ दिवसांपासून रखरखत्या उन्हात निवडणूक प्रचाराने वातावरण अधिकच तापले. काल सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार थांबला. या निवडणुकीतील ११ उमेदवारांचे भवितव्य उद्या (गुरुवारी) ठरणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
हिंगोली मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १३ लाख ७७ हजार २३८ मतदार आहेत. १७६९ मतदानकेंद्रावर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक अधिकारी, तीन कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेणार असून या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी हजर राहणार आहेत. मतदारसंघात सुमारे ५० मतदानकेंद्रे संवेदनशील असून कळमनुरी तालुक्यात नियोजित सापळी धरणाअंतर्गत २० गावांतील वातावरण लक्षात घेऊन याकडे जिल्हा निवडणूक अधिकारी विनिता सिंघल यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघर्ष समितीने जाहीर केला असला तरी तेथील वातावरण निवळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी जवळपास पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत, तर मतदान शांततेत पार पडावे यासाठी एक जिल्हा पोलीस अधीक्षक, एक अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्ह्य़ातील ८०० पोलीस कर्मचारी, ३३ पोलीस अधिकारी, ४ पोलीस उपअधीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या, खास निवडणूक बंदोबस्तासाठी बाहेरून मागविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये १० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस कर्मचारी, ३०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच ३५ नागपूर रेल्वे पोलीस मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातून ३५ असे एकूण १९३ लोकांची कुमक मागविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील व शिवसेनेचे आमदार सुभाष वानखेडे यांच्यात चुरशीची लढत आहे. बहुजन समाज पक्षाचा हत्ती कशी चाल करतो आणि भारिप-बहुजन महासंघाचा पतंग किती गिरक्या घेतो, यावर घडीच्या विजयाचे भवितव्य ठरणार आहे.
निवडणूक प्रचारात श्रीमती पाटील यांनी केलेल्या विकास कामाचा मुद्दा व या मतदारसंघात पंधराशे कोटी रुपयांचा निधी केंद्रातून कसा आणला हे मतदारांना प्रचारसभेतून सांगत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, नारायण राणे, खासदार रामदास आठवले, चंद्रकांत हंडोरे, आमदार भाऊ पाटील गोरेगावकर आदींनी प्रचारसभा घेतल्या.
श्री. वानखेडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे, रामदास कदम, दिवाकर रावते यांच्या प्रचार सभा झाल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भारनियमन, दहशतवाद, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याच्या मुद्यावर भर दिला. भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार माधवराव नाईक यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर, ब. स. प.चे उमेदवार बाबू धनु चव्हाण यांच्यासाठी खासदार वीरसिंग, क्रांती सेनेचे विनायक भिसे यांच्याकरिता आमदार शालिनीताई पाटील, अण्णासाहेब जावळे यांच्या प्रचार सभा झाल्या आहेत.
६उमेदवार - ११.
६मतदार - १३,७७,२३८.
६मतदानकेंद्रे - १,७६९.