Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चिखलातून वर येऊ पाहणारे कमळ!
लक्ष्मण राऊत

मतदानाची तारीख आठवडय़ावर आली आणि आता कुठे जालना मतदारसंघातील प्रचारात रंग भरू लागला आहे. जिल्ह्य़ातील जवळपास पस्तीस-चाळीस टक्के भाग परभणी मतदारसंघात गेलेला

 

आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव चौथे, आमदार सुरेश जेथलिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव टोपे, पालकमंत्री राजेश टोपे आणि अन्य मंडळींचा प्रचारासाठीचा ओढा परभणी मतदारसंघातील घनसावंगी, मंठा, परतूर या तालुक्यांकडेच राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार परभणी मतदारसंघात आहेत, तर भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचे उमेदवार जालन्यात आहेत. त्यामुळेही हा ओढा राहिला. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना मतदारसंघात दौरे केले; परंतु त्याच वेळी परभणी मतदारसंघातही ते फिरत होती. राजेश टोपे यांचा पुनर्रचित घनसावंगी विधानसभा मतदारसंघ परभणी मतदारसंघात आहे. त्यामुळे टोपे पिता-पुत्रांनी लोकसभेची निवडणूक म्हणजे घनसावंगी मतदारसंघाची रंगीत तालीम समजूनच प्रचाराची रणधुमाळी उठविली. परभणीचे मतदान उद्या (गुरुवारी) झाले की, तिकडे गेलेले नेते जालन्याकडे वळतील.
भा. ज. प.चे उमेदवार रावसाहेब दानवे यांची उमेदवारी काँग्रेसच्या बरीच आधी जाहीर झाली खरी; परंतु शिवसेनेतील काही मंडळींकडून प्रतिसादच मिळत नसल्याने त्यांची कळी काही खुलत नव्हती! काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचे नाव उशिरा जाहीर झाले, तरी त्यांच्या विजयाचे गणित मांडणारे हितचिंतक मतदारसंघात सशाच्या गतीने धावत होते. आताही धावत आहेत. या धावपळीत उडालेल्या धुराळ्यात डॉ. काळे यांच्यावर नाराज असलेल्या जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे काहीसे झाकोळले आहेत! परंतु दुसरा पर्यायच नसल्याने यापैकी काही पदाधिकारी हळूहळू प्रचारात उतरत आहेत.
खासदार दानवे यांची कळी खुलण्यास तीन-चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ही कळी अद्यापि पूर्णपणे खुलली नसली तरी येत्या दोन दिवसांत ती शक्यता स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होतेच; परंतु नंतर त्यांच्यासह माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, भा. ज. प.चे नगरसेवक विलास नाईक, किशोर अग्रवाल, सुनील किनगावकर आदींनी शिवसेना आणि रावसाहेब दानवे यांच्यात जो काही दुरावा निर्माण झाला होता तो संपविण्याचा प्रयत्न केला. रावसाहेब एकदा निवडून आले की कुणाला जुमानत नाहीत, असा शिवसेनेतील काही मंडळींच्या तक्रारीचा सूर होता. ‘या वेळेस निवडून आल्यावर त्यांना कसे वागायचे तसे वागू द्या आणि त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता कामाला लागा. कारण आपल्याला दुसरा पर्यायच नाही,’ असे म्हणत नाराज शिवसैनिकांपैकी अनेकांनी प्रचारात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. या घटनांमुळे दानवे सुरुवातीच्या काळात नाही म्हटले तरी काहीसे काळजीत पडल्यासारखे दिसत होते. नाराज शिवसैनिकांचा अनुकूल प्रतिसाद दिसू लागताच त्यांची देहबोलीच बदलली असून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे. मध्यंतरीच्या काळात काहीशी आलेली मरगळ आता झटकू लागली आहे.
डॉ. काळे यांच्या प्रचाराची गती जेवढी आहे; त्यापेक्षा अधिक गती त्यांच्या प्रचाराच्या चर्चेची आहे! प्रचारफेऱ्या निघत आहेत. जालन्यात माजी आमदार कैलास गोरंटय़ाल प्रचारयंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. मंत्री राजेश टोपे यांच्यावरची परभणीची जबाबदारी आता संपल्याने ते आता संपूर्ण वेळ जालन्यासाठी देतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे बदनापूरचे आमदार अरविंद चव्हाण उमेदवारांकडून निमंत्रण येण्याची वाट न पाहताच प्रचारात उतरले आहेत.
निवडणूक लढविण्याच्या बाबतीत श्री. दानवे अनुभवी खेळाडू आहेत. विधानसभेच्या तीन निवडणुका ते लढले आणि त्यापैकी दोन वेळेस विजयी झाले तर एकदा काठावर हरले. लोकसभेच्या दोन निवडणुका यापूर्वी त्यांनी जिंकल्या असून आता ते पाचव्यांदा उभे आहेत. भोकरदन मतदारसंघाने १९८९पासून आजपर्यंतच्या सहाही लोकसभा निवडणुकीत भा. ज. प.ला मताधिक्य दिले आहे. ‘माझा मुलगा मानधन घेईन, घाणधन घेणार नाही’ असे आश्वासन देणारे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे यांना मतदारांनी भोकरदनमध्ये निवडून दिले. परंतु विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांना विजयी करणारांनी लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत मात्र भा. ज. प.च्या रावसाहेब दानवे यांच्या पदरात मताधिक्य टाकले होते.
जालना मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्य़ातील असून यापैकी पैठण आणि फुलंब्री (पूर्वीचा औरंगाबाद पूर्व) या मतदारसंघात यापूर्वीच्या पाचही लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भा. ज. प. युतीस मताधिक्य होते. या वेळेस या दोन्ही ठिकाणी वर्चस्वाचा दावा डॉ. काळे समर्थक करीत असले तरी भा. ज. प.मध्ये मात्र त्याची फारशी चिंता केली जात नाही. प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आता कुठे सुरू होत आहे.
उमेदवाराविषयीच्या नाराजीच्या चिखलातून कमळ आता वर येत असून ते पूर्ण फुलल्यावर प्रचाराची गती आणखी वाढेल. डॉ. काळे यांच्या समर्थकांनी विजयाची स्वप्ने तर उमेदवारी जाहीर होताच पाहिलेली आहेत. या मतदारसंघाचा सलग चार वेळेस विजयी होणाऱ्या भा. ज. प.ची कसोटी या वेळेस लागणार आहे. कारण काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्कम पाठिंब्याचा आहे.
या वेळी काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत जे तीन उमेदवार होते त्यापैकी दोन जालना जिल्ह्य़ातील होते आणि त्या दोघांनाही जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांचा विरोध होता. जिल्हा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी वगळता जवळपास अन्य सर्व काँग्रेसजनांचा डॉ. काळे यांना विरोध नव्हता. त्यामुळे प्रारंभीच डॉ. काळे यांच्याभोवती ‘गुड-गुड’ वातावरणाची निर्मिती झाली तर मित्रपक्षातील काही मंडळीमुळे श्री. दानवे यांच्यासमोर सुरुवातीपासून ‘बॅड-बॅड’ वातावरणाचे ढग जमू लागले होते. परंतु एका अनुभवी शिवसेना पदाधिकाऱ्याने काही नाराज शिवसैनिकांना सांगितले की, ‘कशाला दानवेंना विरोध करता. अनोळखी देवदूतापेक्षा ओळखीचा राक्षस कधीही परवडतो. आधी निवडून येऊ द्या मग पुन्हा दानवे यांच्याशी भांडत बसू!’