Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कृषिसाक्षरता
महात्मा जोतिराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या महत्त्वपूर्ण ग्रंथात केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच चर्चा केली आहे, असे नव्हे तर एकूणच कृषिव्यवस्था आणि कृषकांच्या व्यक्तिमत्त्वाचाही अन्वयार्थ मांडला आहे. कृषीला व्यवसायातून पाहताना, माणूसपणाचाही संदर्भ त्यांना महत्त्वाचा वाटत होता. म्हणूनच या ग्रंथाच्या प्रास्ताविक उपोद्घातात एक विचारसूत्र अतिशय प्रभावीपणे त्यांनी मांडले आहे. ‘शिक्षण’ ही गोष्ट तर त्यांच्या एकूणच कर्तृत्वाचा महत्त्वाचा भाग होता. पण आपण ज्याला रूढ अर्थाने ‘शिक्षण’ म्हणतो, त्यापेक्षा त्यांची शिक्षणाविषयी किती तरी वेगळी कल्पना व्यक्त होताना दिसते. ‘शेती’ आणि

 

‘शिक्षण’ या दोन्ही संकल्पना आधुनिक पद्धतीने त्यांच्या ग्रंथातून उद्गारीत होतात.
संपूर्ण ग्रंथ शेतीविषयी, मग ग्रंथाचा उपोद्घात शिक्षणविषयक कसा? असा प्रश्न समजावून घेताना महात्मा जोतिबांच्या मनातील विचार हा व्यापक अर्थाने ‘कृषिसाक्षरते’च्या नव्या संकल्पनाशी निश्चित झालेला असावा. ‘शेती’ या विचाराकडे ‘शिक्षण’ या धारणेतूनच बघितले पाहिजे, ही भूमिका मला महत्त्वाची वाटते. ‘विद्या’ हा व्यापक संदर्भ घेऊन ‘मती’शी, बुद्धिवादाशी संवाद करू पाहतात. विद्यवानतेकडून बुद्धिवादाकडेआणि बुद्धिवादाकडून नैतिकतेशी ते संबंध जोडू पाहातात. कोणताही पुस्तकी बुद्धिवाद नैतिकतेच्या कृतिशील अधिष्ठानाशिवाय वास्तवात येऊ शकत नाही, ही वस्तुस्थितीही ध्यानी घेतली पाहिजे आणि अशी कृतिशील बुद्धिजन्य वस्तुस्थिती प्रागतिकतेला कारण ठरू शकते, गतिमान बनवू शकते. हे सूत्र ते मांडू पाहतात. कोणतीही विधायक आणि व्यापक प्रगती अर्थकारणालाही कारण ठरत असते. किंबहुना प्रगती म्हणत असताना, ती बहुत करून अर्थलक्ष, वित्तलक्षीच असते. माणसाच्या उद्यमशीलतेला कारण ठरत असते. प्रगतीची परिमाणे मानवी उदयातच अधोरेखित होत असतात.
आम्ही कृषिप्रधान देशातील नागरिक असल्यामुळे आमची प्रगती ही शेतीच्या प्रागतिकतेशी निगडीत असावी. शेती आणि शेतीव्यवसाय हा आमच्या शिक्षणाचा गाभा असला पाहिजे. शेती ही वित्तलक्षी, अर्थकारणाशी म्हणजे ‘व्यापार’ व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असली पाहिजे. याच क्रमाक्रमाने आमच्या शिक्षणाची बांधणी झाली पाहिजे. माणूसपणाचे सारे आयाम आणि प्रश्न सोडविण्याची क्षमता आमच्या शेती-मातीत असल्याचे महात्मा जोतिरावांचे म्हणणे होते. ‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ पूर्णत: शेती, शेतकरी आणि शेती संस्कृतीशी संबंधित असूनही अशा ग्रंथाचे उपोद्घाती सूत्र मात्र शैक्षणिक संदर्भातील का असावे? ‘विद्येविना मती गेली’ असे म्हणत असताना विद्येचा ‘शेतीविद्ये’शी संबंधही त्यांना अपेक्षित असावा. केवळ ‘पाठय़पुस्तकी’ शिक्षण त्यांच्या ‘विद्या’ या शब्दांत अपेक्षित नसावे, तर त्यांना ‘विद्या’ हा संदर्भ शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनविषयक साक्षरतेशी असावा असे वाटते. कारण ‘एवढे सारे अनर्थ’ केवळ त्यांना अपेक्षित विद्या नसल्यामुळे निर्माण झाले, असे त्यांचे मत होते. यातील सारे अनर्थाचे संदर्भ शेतीचा ‘व्यवसाय’ त्याला न करता आल्यामुळेच निर्माण झालेले आहेत, अशी त्यांची धारणा होती. शेतीविषयक ‘व्यवसाय शिक्षण’ त्यांना ‘विद्या’ या संदर्भातही अपेक्षित असावे.
महात्मा जोतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या लुटमारीचा सारा इतिहास अतिशय विस्तृतपणाने कथन केला आहे. हा सारा शोषणाचा इतिहास मांडताना सनातन धर्माने शेतकऱ्यांच्या लुटमारीला कसा हातभार लावला आहे, हे ते संदर्भासह मांडून जातात. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शेतकऱ्यांची कशी पीछेहाट झालेली आहे यात शिक्षण आणि जीवनविषयक, कृषिविषयक साक्षरतेचा अभाव हेही प्रमुख कारण म्हणून त्यांनी मांडलेले आहे. आजही त्यांनी उपस्थित केलेले सारे प्रश्न हयात आहेत. कृषिविषयक संशोधनात पुष्कळ वाव असूनही आमची संशोधने ‘अधिक धान्य पिकवा!’ याच एका ध्यासाने पछाडलेली दिसतात. पण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल? त्याला त्याच्या उत्पादन खर्चानुसार ‘भाव’ परवडतात का? या संबंधीची संशोधने का होत नाहीत. कृषिशाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातून होणारी संशोधने ही ‘शेतकरीलक्षी’ असली पाहिजेत. त्यासाठी त्यांची ‘साक्षरता’ व्हायला पाहिजे. महात्मा फुले यांच्या या ग्रंथातून त्यांनी कृषिविषयक साक्षरतेचा आग्रह धरला होता. आज याच साक्षरतेचा अभाव दिसतो आहे. ‘कृषिसाक्षरता’ ही संकल्पनाच अजून पुरतेपणाने आपल्या समाजात स्थिरावलेली नाही आणि म्हणूनच महात्मा जोतिरावांच्या या ग्रंथाच्या शिरोभागातील उपोद्घातात मांडलेल्या सूत्रांचा नीट अभ्यास झाला पाहिजे. आपण ‘साक्षरता’ हा व्यापक अर्थाने शब्दप्रयोग करतो आहोत. ‘साक्षर’ म्हणजे केवळ लिहिता-वाचता येणे नव्हे, तर त्या त्या व्यवस्थेची संपूर्णत: ओळख होणे आणि त्यानुसार बदलास तयार होणे महत्त्वाचे असते. काळानुरूप त्यातील शब्दांचा अर्थविस्तारही ध्यानी घेतला पाहिजे. ‘विद्या’ आणि ‘अविद्या’ या शब्दांचे अर्थ विस्तारून घेतले पाहिजेत. ‘विद्या’ हा आजच्या तंत्रज्ञानाच्या संगणकीय माहितीच्या ज्ञानस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर समजावून घेतला पाहिजे. पारंपरिक घोकंपट्टीच्या तथाकथित साक्षरतेच्या संदर्भातून नव्हे. म्हणून ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना दरिद्र आले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले.’