Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गाडी-गाडीतला फरक
घ्जालन्यातून निवडणूक लढविणारे उमेदवार हतबल आहेत. काय करावे नि कसे करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले आहे. प्रश्न तर मोठ्ठा आहे. सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारासाठी निघायला काहीशी टाळाटाळ करताना दिसतात. कडक उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात फिरायला अनेक कार्यकर्ते नाखूश दिसतात. एक तर सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रचार करून परतायचे किंवा सायंकाळी पाचनंतर प्रचारासाठी निघायचे

 

असा प्रकार चालू आहे. परवा एका बडय़ा पुढाऱ्याने एका कार्यकर्त्यांस विचारले की, तुम्हाला गाडी मिळाली तरी तुम्ही आमच्यासारखे प्रचारात दिसत नाही! त्यावर हा कार्यकर्ता म्हणाला की, साहेब, तुमची गाडी ए.सी. आहे आमच्या गाडीत उन्हाचा फार त्रास होतो!
‘राष्ट्रवादी’ साहित्य संमेलन
घ्राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील उमेदवार आडसकर यांची गेवराईत सभा झाली. सगळ्याच वक्त्यांनी गोष्टी सांगण्याचा सपाटा लावला. श्रोत्यांना अपेक्षा वेगळीच होती. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा, माजीच उपमुख्यमंत्री गोपीनाथरावांवर कशी टीका करतात, ते त्यांना ऐकायचे होते. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. ऐकणाऱ्यांच्या नशिबी नेत्यांचे कथाकथन आले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी यापूर्वी अनेक वेळा सांगितलेली शंकर पार्वतीची कथा ऐकवून राजकीय संदेश दिला. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी सोन्याचे कपडे ही गोष्ट सांगून भा. ज. प.वाल्यांना लबाड ठरविले. हाच धागा पकडून आबांनी दोन कथा सांगितल्या. एक गाय व मांजराच्या विक्रीची आणि दुसरी अमेरिकेतल्या विधवेची. राजकीय धुळवड ऐकण्यास आलेल्या श्रोत्यांचा पार हिरमोड झाला. त्यांच्या नशिबी ‘राष्ट्रवादी’ साहित्य संमेलन होते!
बोलणारेबी मिळत्यात गा
घ्सध्या किरायाने सर्व काही मिळतं. गाडय़ा, मंडप, स्पीकर. ते सोडा. पण ध्वनिक्षेपकावर बोलणारेही ‘भाडय़ाने’ मिळतात! उमरगा तालुक्यात संगमेश्वर भडोळे फर्डे वक्ते. दोन कविता. चार हिंदीतले शेर आणि पटवून देण्याची क्षमता. असं सगळं काही त्यांच्या भाषणात असतं. गेल्या वर्षी तेरणा कारखान्याच्या निवडणुकीत ते जिल्ह्य़ातल्या ज्या नेत्यांवर जहरी टीका करत होते. ते आता त्यांची स्तुती करत आहेत. त्यांचा हा नूर नक्की कसा पलटला हे समजणे उमरगा तालुक्यातील मंडळींना नवे नाही. ते म्हणतात ‘आमच्याकडं बोलणारेबी मिळत्यात गा!’
वनमंत्री म्हणून पाठविले
घ्चार दशके शिवसेनेत घालवलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे मंगळवारी ‘संभाजीनगरात’.. अर्र.. चुकलं; औरंगाबादेत होते. काम अर्थातच प्रचारसभा. पक्ष बदलला तरी त्यांची बोलण्याची शैली काही बदलली नाही. सगळंच कसं बदलेल? आपले जुने सहकारी, मित्र, कार्यकर्ते असलेल्या उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘‘चंद्रकांत खैरे माणसांच्या लायकीचे नाहीत म्हणून मी मुख्यमंत्री असताना त्यांना वनात पाठविले होते. माझ्या मंत्रिमंडळात त्यांना वनमंत्री केले. नीट नाही राहिला तर मंत्रिपद काढून घेतो असा दमही मी भरला होता. खैरे कधीच आपल्या वाटेला जाणार नाही.’’ त्यांच्या या ‘स्फोटक’ भाषणाला दाद न मिळती तरच नवल!
माझ्या मागे, इथे कोण?
घ्काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ निलंगा येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. नेते अर्थातच ‘मार्गदर्शन’ करण्यासाठी उपस्थित होते. मार्गदर्शन करता करताच वक्त्यांनी कार्यकर्त्यांची गोड गोड स्तुती सुरू केली. त्याचा उल्लेख उमेदवार जयवंत आवळे यांच्याही ‘मार्गदर्शना’त झाला. ते म्हणाले, ‘व्यासपीठासमोर उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्यांमागे एक एक हजार मतदार आहेत, असे ज्येष्ठ नेत्यांनी मला सांगितले आहे. तिथं उपस्थित असलेल्यांपैकी एका कार्यकर्त्यांला त्यातला लक्ष्यार्थ कळलाच नाही. तो बिचारा मागे वळून पाहू लागला आणि अवाक् झाला. ‘माझ्यामागं तर इथं कुणीच नाही,’ असंच त्याला म्हणायचं असणार!
पिकतंय तेच पेरतात
घ्निलंग्यात काँग्रेस आघाडीचा प्रचार एकदम जोरकस सुरू आहे. निटूरला सभा झाली. प्रमुख वक्ते होते क्रीडामंत्री दिलीप देशमुख. ते म्हणाले, ‘आम्हा सत्ताधाऱ्यांना मोर्चे काढण्याचा आणि जोराने बोलण्याचा अनुभव नाही. परंतु विरोधक हे काम चोखपणे करत असल्याचे येथील जनतेला माहीत आहे. ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या रानात कोणते पीक उगवते याचा अंदाज घेऊन पिकतंय तेच पेरतात त्याप्रमाणे निवडणुकीच्या या फडात ज्यांना जे काम जमते तेच काम मतदार सोपवितात.
(लेखन : सुहास सरदेशमुख/उस्मानाबाद, श्रीशैल बिराजदार/निलंगा, लक्ष्मण राऊत/जालना, प्रताप खेडकर/गेवराई व प्रमोद माने/औरंगाबाद.)