Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लाजू नका, मागा की!
प्रदीप नणंदकर, लातूर, १५ एप्रिल

निवडणूक म्हटले की दिवाळी असते. दिवाळीची पोस्त खुशीने दिली जाते. निवडणुकीत मात्र समोरचा खूष होईल याकडे लक्ष द्यावे लागते. कार्यकर्त्यांतील प्रचाराची वर्गवारी प्रत्येक पक्षात केली जाते. गट-तट, निष्ठावान, निसटावान, प्रामाणिक, नि:स्पृह, स्वार्थी, आपमतलबी, बोलघेवडा, स्वाभिमान घालून काम करणारा, प्रभावी, प्रभावहीन, बुद्धिवान, बेअक्कल, बेजबाबदार, बेभरवशाचा.. ही यादी मोठी आहे. पण कोणाला नाराज करून चालत नाही. सर्वाना बरोबर घेऊन

 

जाण्याचे कौशल्य पणाला लावले जाते.
काहीही करून निवडून आले पाहिजे तरच लोक तुम्हाला विचारतात. आपली आहे ती फौज ताजीतवानी ठेवण्यासाठी खटाटोप करावा लागतो. त्यातली बरीच खोगीरभरती आहे हे माहीत असूनही चेहऱ्यावर तसे भाव दाखवायचे नसतात. आचारसंहितेत खर्चाचे बंधन असल्यामुळे नियम वाकवून (नियम तोडणे गुन्हा ठरतो!) कायद्यात बसवून प्रचारयंत्रणा राबवली जाते. ‘भेटायचं आहे, थोडं बोलायचं आहे,’ ‘काम होतं’, ‘बोलणंच होईना झालंय’, ‘नजरेलाच पडना झालाव’, अशी वाक्ये समोरून आली की चाणाक्ष संघटक त्याला काय म्हणायचे हे ओळखतो आणि व्यवस्था करतो.
काही कार्यकर्ते मात्र भिडस्त असतात. ते जवळपास घुटमळतात, बोलत मात्र नाहीत. पक्षाने त्यांना पद दिलेले असते. छोटय़ा मोठय़ा निवडणुकीत ते निवडून आलेले असतात, तेव्हा पुन्हा निवडणुकीत पैशाचे कसे बोलावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशा कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे की, ‘लाजू नका, बोला. आम्हाला जाणीव आहे, तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहात. गावातील मतदान अधिकाधिक आपल्या पक्षाला व्हावे यासाठी काय केले पाहिजे? ते सांगा. गरजा तुमच्या नाहीत, समोरच्याच्या आहेत. त्या तुम्ही स्वत: भागवू शकत नाहीत, तेव्हा स्पष्ट बोला, लाजू नका. मतदानाचा निकाल लागल्यानंतर ‘अमूक करायला पाहिजे होतं, ते राहून गेलं, त्यांनी मॅनेज केलं’ अशा चर्चाना अर्थ उरत नाही. तेव्हा ज्या बाबी अत्यावश्यक आहेत त्या करा. पैशांच्या अडचणी असतात. त्याची कमी-अधिक व्यवस्था करता येईल. मात्र तुम्ही काळजी करून सर्वाची अडचण करू नका.’ शिवाय ‘आता झालं ना मनासारखं, मतपेटीत तुमचं कर्तृत्व दिसून येणार आहे. तो आरसा आहे. त्याचे रेकॉर्ड नोंदवून ठेवले जाणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे झालं’ असे निरोपाचे चार शब्द सांगून मतदान होईपर्यंत गावात राहा, निरोप दिल्यानंतरच या, उगीच बातम्या घेत फिरू नका म्हणजे झालं. या मग, भेटू नंतर, नमस्कार. असा संवाद कमी-अधिक प्रमाणात होतो आहे.
गुप्त व उघड
मतदानाचे गुप्त असते व आवाजीही. लोकशाहीत या दोन्ही प्रकारांचा वापर होतो. तीच पद्धत निवडणुकीत मागणाऱ्यांची असते गुप्त व आवाजी. अर्थात दोघांच्याही मागण्या पूर्ण करण्याला पर्याय नसतो.