Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गंगाखेडमध्ये चुरस मताधिक्याची!
प्रमोद साळवे
गंगाखेड, १५ एप्रिल

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचे मतदारसंघात असलेले संपर्काचे जाळे, गंगाखेड तालुक्याचे जावई तसेच शिवसेनेच्या मतदारांची मदार, तर गंगाखेड तालुक्याच्या उमेदवार म्हणून राजश्री जामगे यांना मिळणारा प्रतिसाद या बाबींवर तालुक्याचे राजकीय चित्र अद्याप अस्पष्ट असले तरी मताधिक्यासाठी चुरस निर्माण करणारी लोकसभा निवडणूक म्हणून उद्याच्या लढतीकडे पाहिले

 

जात आहे.
यंदाच्या निवडणुकीच्या वेळी तालुक्यात म्हणावे तसे राजकीय वातावरण तापले नाही. राजकीय वातावरण ढवळून निघेल, अशी एकही घटना गेल्या दहा ते पंधरा दिवसांत घडलेली नाही. सामान्य मतदारांमध्येही यंदा निवडणुकीबाबत फारशी उत्सुकता जाणवलेली नाही. पण या निवडणुकीत प्रमुख पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच बाजार समिती अशा स्तराच्या छोटय़ा निवडणुकीत ज्या टोकाचे राजकारण या आधी पाहावयास मिळाले ते चित्र लोकसभा निवडणुकीत अजून दिसलेले नाही.
युतीचे मतदारसंघ प्रचारप्रमुख डॉ. मधुसूदन केंद्रे या एकमेव स्थानिक नेत्यामध्ये राजकीय वातावरण ढवळून काढण्याची क्षमता आहे. मात्र शिवसेनेने या वेळी शिवसेना- भा.ज.प. या दोन पक्षांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविल्याने डॉ. केंद्रे यांना अंगावर पडेल एवढीच भूमिका निभावावी लागली. त्यामुळे या घटनेचा परिणाम शिवसेनेच्या मतांवर पडल्यास नवल वाटू नये. दुसरीकडे माजी आमदार सीताराम घनदाट मित्रमंडळाने शिवसेनेस पाठिंबा दिल्याने गणेश दुधगावकरांना याचा फायदा निश्चितच होईल.
सुरेश वरपूडकर यांचे तालुक्यात मोठे संपर्काचे जाळे आहे. तालुक्यातील अनेक सत्ताकेंद्रही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मात्र सत्तास्थानी असलेले नेते व सामान्य जनता यांच्यात मोठे अंतर असले तरी वरपूडकरांसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी मात्र संबंधित नेत्यांकडे असते. गंगाखेड शुगर्सचे रत्नाकर गुट्टे व शेतकरी कामगार पक्षाचे नेते लक्ष्मणराव गोळेगावकर हेही श्री. वरपूडकरांच्या दिमतीला आहेत, ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
बसपच्या राजश्री जामगे यांचे माहेर व सासर दोन्ही या तालुक्यात आहेत, या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. पण त्यांचा हत्ती तालुक्यात किती ‘सोशल इंजिनीयरिंग’ करेल याबाबत साशंकता आहे. भरीसभर त्यांचे पती बाबासाहेब जामगे यांची नसलेली राजकीय पत त्यांना फटका देऊ शकते. मात्र ग्रामीण भागात ब.स.प.चे असलेले केडर त्यांना काही प्रमाणात तारू शकते.
डॉ. मानवेंद्र काचोळे यांच्यासाठीही कार्य करणारी एक फळी तालुक्यात कार्यरत आहे.
अशा परिस्थितीत शिवसेनेसाठी डॉ. केंद्रे यांनी मतदारसंघात ३० हजारांचे मताधिक्य देऊ अशी खात्री दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरेश वरपूडकर २५ हजारांचे मताधिक्य मिळेल अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.