Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्वार्थी जयसिंगरावांपासून सावध राहा - पाचपुते
बीड, १५ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते स्वार्थी असून त्यांच्यापासून सावध राहा, असे सांगत आघाडीचे उमेदवार रमेश आडसकर यांना विजयी करून विकासाला पूरक वातावरण तयार करा, असे आवाहन संपर्कमंत्री बबनराव

 

पाचपुते यांनी केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल गलधर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील युवकांचा मेळावा मंगळवार, १४ एप्रिलला जैन भवन येथे घेण्यात आला. या वेळी संपर्कमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह रमेश आडसकर, आमदार सुरेश नवले, उषा दराडे, जिल्हाध्यक्ष अशोक डक, चंद्रकांत नवले, प्रा. सुनीला मारोळे आदी उपस्थित होते. शहरात प्रथमच युवकांच्या मेळाव्याला मोठय़ा संख्येने गर्दी जमा झाल्याने गलधर यांच्या युवक नेतृत्वाचे सर्वानीच कौतुक केले. या वेळी पाचपुते म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचा उमेदवार तगडा असून युवकांच्या पाठबळामुळे विजयी होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे गायकवाड यांनी पक्षांतर केले.
उमेदवारी दिली असती तर त्यांनी टीकाही केली नसती व पक्षांतरही केले नसते. गायकवाड हे स्वार्थी असून त्यांच्या वक्तव्य व टीकेकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले, तर पश्चिम महाराष्ट्रातील विकास हा त भागातील नेत्यांमुळे झाला.
सतत तीस वर्षे राजकारणात असूनही मुंडे विकास करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूलथापांनाही बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.