Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘व्यापाऱ्याच्या हिताचे निर्णय ‘राष्ट्रवादी’च घेऊ शकते’
अंबाजोगाई, १५ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ातील व्यापारीवर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश आडसकरांनाच प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी शहरातील व परिसरातील व्यापारीवर्गाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री बबनराव पाचपुते यांनी मोंढा येथे झालेल्या बैठकीत केले. या

 

बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला.
जिल्ह्य़ातील परळीसारख्या ठिकाणी व्यापारीवर्गात दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आपला व्यापार सोडून देऊन इतर व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करून प्रसंगी परळी शहरही सोडण्याची नामुष्की येथील व्यापारीवर्गावर आलेली आहे. त्यामुळे परळीतील हा दहशतवाद जिल्ह्य़ात इतरत्र येऊ देऊ नये याची दखल घेऊन शहरातील व परिसरातील व्यापारीवर्गानी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपले मत राष्ट्रवादीच्या घडय़ाळ या चिन्हावर देऊन आडसकरांच्या मागे आपली आशीर्वादरूपी ताकद उभी करावी, असे सांगून बबनराव पाचपुते यांनी जिल्ह्य़ाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तसेच जिल्ह्य़ातील रेल्वेचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला विजयी करण्याचे तसेच जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश आडसकरांची सुप्त लाट असून त्यामुळे राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचे पाचपुते म्हणाले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आडसकर, अशोक डक, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संजय दौंड, दिलीप सांगळे, प्रा. नानासाहेब गाठाळ, प्रकाश सोळंकी, अक्षय मुंदडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.