Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उद्धव ठाकरे अज्ञानी - राणे
औरंगाबाद, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी

शिवसेनेच्या जाहीरनाम्याकडे पाहिले तर उद्धव ठाकरेचे अज्ञान लक्षात येईल, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काल रात्री जाहीर सभेत केला. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा

 

उल्लेख एकेरी केला.
सिडको एन-५ मधील राजीव गांधी स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत नारायण राणे बोलत होते. नारायण राणे यांनी आपल्या भाषणात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. काँग्रेस म्हातारी झाली आहे असे मोदी आपल्या भाषणात सांगतात. नरेंद्र मोदीची दाढी पांढरी झालेली नाही? तेही म्हतारे झालेले नाही? हे भाजपवाले सत्तेमध्ये होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अयोध्येमध्ये राममंदिरासाठी एक वीट तरी ठेवली का? निवडणुका आल्या की यांना राम आठवतो. देव आठवतो. यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.
नारायण राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना हा राजकीय पक्षच नाही. ठाकरे अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड असे या पक्षाचे नाव आहे. मी तिकडे ३९ वर्षे होतो. आता काँग्रेसमध्ये आल्यामुळे वाचलो. चल्लो दिल्ली असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. २२ पैकी ५ जागा निवडून येतील. दिल्लीत सरकार बनवायला २७२ खासदार लागतात. हे यांना माहीत नसावे असेही नारायण राणे म्हणाले. नोकऱ्यांमध्ये ८० टक्के जागा भूमिपुत्रांना देऊत याचा जी. आर. आहे आणि हा राज्याचा विषय आहे. जी. आर. जरा वाचून बघा, असेही ते उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. लाल्या रोग कापसावर पडतो की उसावर पडतो हे याला माहीत नाही आणि हा म्हणतो की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार. कसा करणार? असा सवालही त्यांनी केला.
मला दगड आणून द्या मी काँग्रेसच्या डोक्यात घालीन असे यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाला. निवडणुका लोकसभेच्या आणि याची भाषा पहा अशी टीका नारायण राणे यांनी केली. भावनिक प्रश्न निर्माण करून समाजासमाजात भांडणे लावणे हाच शिवसेनेचा धंदा आहे, असेही त्यांनी सांगितले.