Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उभ्या मालमोटारीवर बस आदळून ३ ठार, १३ जखमी
औरंगाबाद, १५ एप्रिल/प्रतिनिधी

रस्त्याच्या कडेल्या उभ्या असलेल्या मालमोटारीवर भरधाव एस. टी. बस (जिंतूर-पुणे) आदळून वाहकासह तीनजण ठार तर १३ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अहमदनगर मार्गावर ढोरेगाव फाटय़ानजीक असलेल्या खुराणा पेट्रोल पंपासमोर घडली. मृतांमध्ये १२ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे. काही जखमींवर शासकीय रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही बस जिंतूर आगाराची

 

(एमएच २०-डी ८९६२) होती.
बस आदळणार असे दिसताच चालकाने बस वळविण्याचा प्रयत्न केला. तरीही बसचा काही भाग मोटारीवर आदळल्याने पत्रा चिरला गेला. जखमी झालेले हे सर्व बसच्या मागील भागात वाहकाच्या बाजुला बसलेले होते.
कैलास देशमुख (वाहक, वय ३५, रा. वस्सा, ता. जिंतूर), विजय देहळकर (६०, दहेळ, जालना) आणि दुर्गेश राजेंद्र सोनवणे (१२, चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत. कैलास अशोक राठोड (२४), कविता अशोक राठोड (२०, दोघेही रा. कुऱ्हाडी, जिंतूर), बालाजी कदम (३५, परभणी), भास्कर राजाराम शेळके (५०), सुवर्णा भास्कर शेळके (२०, दोघेही रा. हतनूर, ता. सेलू), खंडू देवीदास बेंद्रे (६०, आळंदी, पुणे), भागिनाथ बाबुराव मोहिते (५५), तारामती भागिनाथ मोहिते (५०, दोघेही रा. हिवर्डी, जालना) अरुण भगवंतराव कुलकर्णी (६०, चांदज, जिंतूर), अशोक उत्तम देशमुख (५०, सिंदखेड, बुलढाणा), प्रीती गजानन तिरुखे (६०, सिंदखेड), आशीष श्रीराम जगताप (२५) आणि शरद श्रीराम जगताप (१२, दोघेही रा. निवडुंगा, ता. जाफ्राबाद) हे तेराजण जखमी झाले आहेत. जखमींतील पाचजण जिंतूर तालुक्यातील आहेत.
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात बस पुण्याकडे जात होती. वाहकाने चुकीच्या बाजुने समोरील वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अचानक समोर मालमोटार उभी दिसली. त्याने बस बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. समोरील बाजू बाजूला झाली मात्र वाहकाच्या बसण्याच्या जागेपासून मागील भाग मालमोटारीवर आदळला आणि तेथून बसचा पत्रा चिरला गेला. यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून खड्डय़ात कोसळली. अनेकजण बाजूला फेकले गेले. मोठा आवाज झाल्यामुळे आजुबाजूचे नागरिक मदतीला धावले. जखमींचा आक्रोश सुरू होता. घटनास्थळी काटय़ा-कुपाटय़ा असल्यामुळे तेथे लवकर पोहचता येणे शक्य होत नव्हते. शिवाय अंधारही होता. त्यामुळे जखमींना लवकर मदत मिळू शकली नाही.
पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दुर्गेश सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला होता तर वाहक देशमुख आणि देहळकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसचालक स्वत:हून वाळूज पोलीस ठाण्यात हजर झाला.
भेटण्यासाठी आलेल्यांना शोधूनही जखमी सापडत नसल्याची तक्रार काही नातेवाईकांनी केली होती. जखमींतील काहीजण खासगी रुग्णालयात भरती झाल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे नंतर समोर आले.