Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अग्निशामक दलालाही खोटे फोन;पाच जणांविरुद्ध गुन्हे
औरंगाबाद, १५ एप्रिल/प्रतिनिधी

‘आग लागली आहे. लगेच बंब पाठवा’ असा फोन येतो. तातडीने अग्निशमन दलाचे बंब दिलेल्या पत्त्यावर दाखल होतात. तेथे मात्र काहीच असत नाही. असे गेल्या एक वर्षांत पाचवेळा घडले आहे. यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांची नाहक धावपळ होते. नव्या तंत्रज्ञानामुळे फोन करणाऱ्यांचा क्रमांक उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

 

फोन करणाऱ्यांना अद्यापि अटक झालेली नाही.
अग्निशमन सेवा सप्ताहास कालपासून सुरुवात झाली. या निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हे फोन आग लागली असेच सांगणारे होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एक तर त्यानंतर जून महिन्यात दोन वेळा असे फोन आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात अशाच एका फोनमुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली. यापूर्वीचा फोन हा मार्चमध्ये आला होता.
असा फोन करणारी व्यक्ती स्वत:चे नावही खोटेच सांगते. फोन आल्यानंतर बंब लगेच दिलेल्या पत्त्यावर रवाना होतो. खरेच आग लागली आहे काय याची शहानिशा करण्यासाठी वेळही असत नाही आणि त्यासाठी वेळ घालविणे रास्तही वाटत नाही. त्यामुळे फोन आला की लगेच बंब रवाना होतात. गेल्या वर्षांत पाचवेळा फोन आल्याबरोबर दिलेल्या पत्त्यावर बंब रवाना झाले. तेथे पोहोचल्यानंत त्या परिसरात कोठेही आग लागली नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित फोनवर विचारणा केली असता हे क्रमांक बूथवरील असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकाराबद्दल पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले.
खोटे फोन करणारे अद्यापि पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे उद्देश समोर येऊ शकला नाही. खोटे फोन करणे हा गुन्हा आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात येईल, असे झनझन यांनी सांगितले.