Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गंगाखेड तालुक्यात पाणीटंचाई
गंगाखेड, १५ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी तळाला लागली आहे. परिणामी शहरासह तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. शहरात मासोळीवर आधारित भागात तीन दिवसांआड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या नियोजनाबद्दल

 

प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील अर्धा भाग तसेच शहराचा अर्धा भाग मासोळी मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठय़ावर अवलंबून आहे.सध्याच्या परिस्थितीत मासोळी धरणाचा जिवंत पाणीसाठा संपुष्टात आला आहे. आचल पाणीसाठय़ावर आता पिण्याच्या पाण्यासाठी प्रयोग करावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया मासोळीचे शाखा अभियंता वसंत पाठक यांनी दिली आहे.
तालुक्यातील माखणी, सांगळेवाडी, कोद्री, खादगाव, डोंगरगाव, डोंगरपिंपळा, अंतरवेली, उंडेगाव, अकोली, पोखर्णी (वाळके), कातकरवाडी, पिंपळदरी. बोर्डा, वडवणी, मालेवाडी, इसाद, बोथी, राणी सावरगाव, सिरसम, पांढरगाव, देवकतवाडी, गारमाळ तांडा, गणेशपुरी मठ आदींसह गंगाखेड शहरातील व्यंकटेशनगर, जायकवाडी वसाहत, यज्ञभूमी, संत जनाबाई नगर, प्राध्यापक कॉलनी, बंजारा कॉलनी, गौतमनगर, म. फुलेनगर, नगर परिषद कॉलनी आदी भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मासोळीच्या उपलब्ध मृत साठय़ाचा योग्य वापर करून तीन दिवसांआड होत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.