Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

परळीत फुलचंद कराड गटात अस्वस्थता
बीड, १५ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचार सभांतून पक्षाचे नेते विधानसभेच्या परळी मतदारसंघातून सुदामती गुट्टे यांचे नाव पुढे करीत आहेत. परिणामी प्रदेश सरचिटणीस फुलचंद

 

कराड यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना विरोध करत बहुतांशी नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयाला जातात. पाच वर्षांपूर्वी मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी जिल्हा परिषद सदस्य, वैद्यनाथ कारखान्याच्या उपाध्यक्षपदाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. विधानसभेच्या निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून ५५ हजार मते घेतली. तर मागील पाच वर्षांत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत भा. ज. प.च्या विरोधात लढा दिला. पक्षाने मात्र राज्यात सत्ता असतानाही कराड यांची कायम उपेक्षा केली. सत्तेचे कोणतेही पद न देता केवळ लढत रहा एवढीच अपेक्षा केली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील एका नेत्याने उद्योगपती रत्नाकर गुट्टे व सुदामती गुट्टे यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे जुन्या परंपरेनुसार पक्षाने या वेळी पुनर्रचित परळी मतदारसंघात कराड यांना गुट्टे यांचा पर्याय निर्माण केला असल्याचे मानले जाते. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये नेते विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुदामती गुट्टे यांचेच नाव पुढे करीत असल्याचे दिसते. परळीतील प्रचाराच्या प्रारंभाच्या कार्यक्रमापासून बीड, बनसारोळा येथे झालेल्या जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या सभेतही गुट्टे यांच्या भाषणाची आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न झाला. परळी तालुक्यातील प्रचार यंत्रणा गुट्टे यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेने शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करताना केवळ मनी पॉवरमुळे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांना राजकीय बळ मिळणार असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम तरी कसे करायचे, असा प्रश्न कराड गटाचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.