Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मराठवाडय़ात युतीची लाट - नीलम गोऱ्हे
तुळजापूर, १५ एप्रिल/वार्ताहर

भ्रष्टाचारास खतपाणी घालणाऱ्या व कोटय़वधी रुपयांची लूट करणाऱ्या गुंडप्रवृत्तींना उमेदवारी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदार साथ देणार नाहीत. महाराष्ट्रात युतीचे बहुसंख्य उमेदवार विजयी होणार, असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच मराठवाडय़ात युतीची लाट

 

असल्याचा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, कर्जमाफीचा लाभ मूठभर शेतकऱ्यांना मिळाला असला तरी पुढारी मंडळाच्या भ्रष्टाचारामुळे डबघाईला आलेल्या अनेक बँका भरण्याचे तसेच त्या माध्यमाने संचालक -पदाधिकाऱ्यांना कुरण उपलब्ध केले. मोडीत निघालेल्या बँकेचे गोदाम- कार्यालय का व कसे जळून भस्मसात होते, याची उकल होत नाही. वाममार्गाचा अवलंब करून गैरकारभार व गैरकृत्यांना पाठीशी घालण्याची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या धूर्तपणाची नोंद मतदारांनी घेतली आहे.
राज्यातील शेकडो सहकारी प्रकल्प आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोडीत काढले. सहकारी चळवळ उद्ध्वस्त केली. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नेत्याचे अनेक घोटाळे जनतेला माहीत आहेत. उस्मानाबादला रेल्वे आली. उमरगा-तुळजापूरचे काय, असा प्रश्न विचारून श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, पाटबंधारे खात्याचा कारभार पाहणाऱ्या नेत्यांनी सिंचनाच्या समस्या कायम ठेवल्या. खासदार कल्पना नरहिरे यांनी लोहमार्गासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमाने पाठपुरावा केला. या वेळी अस्मिता गायकवाड (सोलापूर), सुनिती बेहाळकर (नांदेड), संगीता कदम (वाशी), शामल पवार (तुळजापूर), श्याम पवार, सुधीर कदम आदी उपस्थित होते.
बेरोजगारांना जॉबकार्ड देण्यात आघाडी सरकार अपयशी
आपद्ग्रस्त वा शेतकऱ्यांना अर्थसाह्य़ देण्याची प्रसंगपरत्वे घोषणा होताच पंचनामे करणाऱ्या तलाठय़ापासून ते उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी मंडळींपर्यंत अर्थार्जन करण्याची चढाओढ सुरू होते. रोजगाराविना असह्य़ अवस्थेत जीवन जगणाऱ्या तरुणांना जॉब कार्ड देण्याचे औचित्यही काँग्रेस आघाडीच्या सरकारने लक्षात घेतले नाही, असे श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या.