Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

माणसातील ईश्वरत्व शोधण्याची गरज - जोशी
लातूर, १५ एप्रिल/वार्ताहर

प्रत्येक मनुष्यात ईश्वराचा अंश असतो. त्यातील ईश्वरत्व शोधणारा समाज निर्माण झाला तर समाजातील सर्व प्रश्न आपोआप सुटतील, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय

 

सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
रा. स्व. संघाच्या शहर शाखेने आयोजित बौद्धिक वर्गात श्री. जोशी बोलत होते. क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोकराव कुकडे, शहर संघचालक बालाप्रसाद बाहेती या वेळी उपस्थित होते.
श्री. जोशी म्हणाले, ‘‘मानवता ओळखतो तो धर्म होय. चराचरांत ईश्वर आहे हे मानणारा धर्म म्हणून जगभरात हिंदू धर्माची ओळख आहे. ‘वृक्षवल्ली आम्ही सोयरी वनचरी’ म्हणणारे आम्ही या सोयऱ्यावर करवत लावतो तेव्हा आपण चूक करतो आहोत हे का लक्षात घेत नाही? वायुपुत्र हनुमानाचा उदो उदो करणारे आम्ही वायुप्रदूषण करताना कचरत नाही. वास्तूचे पूजन करणारे आम्ही त्या वास्तुतून होणाऱ्या प्रदूषणाची काळजी घेत नाही. गावातील नदीला गंगा मानून जल घेणारे आम्ही, सर्व तऱ्हेने पाण्याचे प्रदूषण करतो. आपण धार्मिक म्हणजे काय, हे नीट समजून घ्यायला हवे.’’
समाजातील चुकीच्या संकल्पना बदलण्यासाठी जो प्रयत्न करतो तो धार्मिक होय. आपल्या समाजाचा संघर्ष काही वर्षांपूर्वी अस्तित्वासाठी होता, आता तो मूल्य जोपासण्यासाठी आहे. भ्रूणहत्या करून समाजात असमतोलपणा निर्माण होतो आहे हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल उपस्थित करून श्री. जोशी म्हणाले, ‘‘अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणे हा हिंदू धर्माचा इतिहास आहे. संतश्रेष्ठ तुकारामांनी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हटले. त्याचा अर्थच समाजातील चुकीच्या परंपरा, चालीरीती या विषयीचा संघर्ष आहे. बाह्य़ आणि अंतर्गत आक्रमणाविरोधात आपण सज्ज असले पाहिजे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन अन्यायाच्या विरोधात लढण्यात गेले, तोच वसा रा. स्व. संघाने चालू ठेवला आहे.’’