Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

केवळ ओळखपत्र नव्हे, तर मतदार यादीत नावही आवश्यक !
जालना, १५ एप्रिल/वार्ताहर

निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेस मतदारांची ओळख अनिवार्य केली आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत पुरविलेले छायाचित्र ओळखपत्र अथवा आयोगाने ओळख दर्शविण्यासाठी निश्चित केलेली कागदपत्रे चालू शकतात. पण केवळ निवडणूक ओळखपत्र असल्यास मतदान करता येणार नाही, तर मतदारयादीतही मतदाराचे नाव असणे आवश्यक आहे. मतदारयादीत नाव असेल आणि निवडणूक ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या पुराव्यांपैकी किमान एक कागदपत्र आपल्याजवळ असल्यास मतदाराला मतदान करता

 

येऊ शकेल.
पासपोर्ट , वाहन चालवण्याचा परवाना, आयकर विभागाने दिलेले पॅनकार्ड, केंद्र अथवा राज्य सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी अथवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी त्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना रीतसर वितरीत केलेले छायाचित्रांकित ओळखपत्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खातेदारांना दिलेले छायाचित्रांकित पासबुक अथवा पोस्टाने दिलेले छायाचित्रांकित पासबुक अथवा किसान पासबुक (संबंधितांनी २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी खाते उघडलेले असणे अनिवार्य आहे.) पट्टा किंवा नोंदणीकृत छायाचित्रांकित खरेदीखत यांसारखी संपत्तीशी निगडीत कागदपत्रे, २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने रीतसर वितरीत केलेली अनुसूचित जाती-जमाती अथवा इतर मागासवर्गीय जातीची छायाचित्रांकित प्रमाणपत्रे, २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी वितरीत करण्यात आलेली सेवानिवृत्ती वेतनाशी निगडीत छायाचित्रांकित कागदपत्रे (उदा. माजी सैनिकाचे पेन्शनबुक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, माजी सैनिकांवर अवलंबून असलेल्यांना वितरीत करण्यात आलेले प्रमाणपत्र, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आदेशपत्र, माजी सैनिकांच्या विधवेला देण्यात येणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनाचे आदेशपत्र), स्वातंत्र्यसैनिकांना देण्यात आलेले छायाचित्रांकित ओळखपत्र, २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी वितरीत करण्यात आलेला शस्त्र परवाना, २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी वितरीत करण्यात आलेली छायाचित्रांकित अपंग प्रमाणपत्र, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी वितरीत करण्यात आलेले जॉब कार्ड किंवा आरोग्य विमा योजनेसाठी २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी वितरीत करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मतदारांनी छायाचित्रांकित निवडणूक ओळखपत्र अथवा या कागदपत्रांपैकी एक पुरावा घेऊनच मतदानाला यावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
कुटुंबप्रमुखाकडे असलेला वरीलपैकी कोणताही पुरावा त्या कुटुंबातील सर्व मतदारांसाठी ग्राह्य़ मानण्यात येईल. मात्र त्यासाठी कुटुंबातील सर्व मतदारांनी एकावेळी मतदानाला येणे आणि त्यांची ओळख पटविणारा पुरावा असलेल्या कुटुंबप्रमुखाने त्यांच्याबरोबर असणे आवश्यक आहे.
या संदर्भात निवडून आयोगाने ११ एप्रिल २००९ रोजी एक अध्यादेश जारी केला असून त्या नुसार मतदानाच्या वेळी मतदाराची ओळख पटविण्यासाठी २८ फेब्रुवारी २००९ पूर्वी राज्य शासनाने दिलेली शिधापत्रेसुद्धा ग्राह्य़ धरण्याची परवानगी देण्यात आली आहे.