Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

परभणीत आचारसंहिता भंगाचे चार गुन्हे; ५२ केंद्र संवेदनशील
परभणी, १५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या परभणी मतदारसंघात आचारसंहितेच्या भंगाचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच

 

सहा तक्रारी चौकशीअंती निकाली काढण्यात आल्या आहेत.
बोरी येथील मंदिरात निवडणूक सभा घेतल्याबद्दल स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार मानवेंद्र काचोळे यांच्या विरोधात बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार राजश्री जामगे यांनी पूर्णा शहरात विना परवानगी रॅली काढल्यामुळे त्यांच्यासह इतर ७५ जणांच्या विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोविंद धोंडीबा कदम यांनी विना परवानगी वाहनावर पक्षाचा झेंडा लावल्याबद्दल गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नामदेव विश्वनाथ नरवाडे बोडाखा (ता. घनसावंगी) यांनी शिवसेना प्रचारासाठी परवानगीशिवाय वाहन परभणी शहरात आणल्याबद्दल येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
५२ मतदान केंद्र संवेदनशील
पेडगाव, झरी, असोला गावातील सर्वच मतदान केंद्रे संवेदनशील असून या केंद्रांना निवडणूकविषयक गुन्ह्य़ांची पाश्र्वभूमी आहे. मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असण्याचे प्रमाणही अल्प आहे. तसेच निवडणुकीत एकाच उमेदवाराला एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान होते. या पाश्र्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण ५२ मतदानकेंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यात परभणी जिल्ह्य़ातील ४८ आणि जालना जिल्ह्य़ातील ४ मतदानकेंद्रांचा समावेश आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आंबरवाडी येथील ३, कौसडी येथील ४, वाघी येथील ४, वडी येथील १, सायखेडा १, वालूर २, जिंतूर आणि सेलू येथील प्रत्येकी एका केंद्राचा समावेश आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातील असोला व पिंगळी येथील ४, झरी ६, टाकळी बोबडे व परभणी शहर येथील प्रत्येकी २ आणि बलसा तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मरगळवाडी, पांढरगाव, पांगरी व दुसलगाव येथील प्रत्येकी १, वझूर येथील ३ केंद्रांचा समावेश आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघातील पेडगाव येथील ५ केंद्र आणि परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर, उमरीधारा, डोल्हारा येथील प्रत्येकी १ आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील रांजणी येथील एक केंद्र संवेदनशील आहे.
या मतदान केंद्रावर निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मोहन ठोंबरे, जिल्हा पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक पवार, निवडणूक निरीक्षक डी. प्रभाकर रेड्डी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. येथील मतदान प्रक्रियेची पूर्ण चित्रीकरण करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रासाठी निवडणूक आयोगाने खास निरीक्षकही (मायक्रो ऑब्जव्‍‌र्हर) नियुक्त केले आहेत.