Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महागायिका कार्तिकी गायकवाडचा भावपूर्ण सत्कार
अंबड, १५ एप्रिल/वार्ताहर

झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची महागायिका कार्तिकी गायकवाड हिचे जन्मगाव

 

असलेल्या बारसवाडा, ता. अंबड येथे मंगळवारी ग्रामस्थांच्या वतीने गुढय़ा, तोरणे, सडारांगोळ्यांच्या थाटात, पुष्पहार, कौतुकांचा वर्षांव करीत गावातून वाद्यवृंद आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी तिचा जयजयकारही करण्यात येत होता. त्यानंतर पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्तिकी, तिची आई सुनीता व वडील कल्याणजी गायकवाड यांचा एकत्रित अलंकार व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. धर्मराज जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिवाजीराव चोथे, लक्ष्मणमहाराज मिठे, सरपंच अंकुशराव मिठे, उपसरपंच आबासाहेब गटकळ समीर खडकीकर, बाबुराव शिंदे, देवीदास खटके आदी उपस्थित होते.
या प्रसंगी कार्तिकी गायकवाड म्हणाली की, ज्ञानेश्वरमाउलीच्या आशीर्वादाने, आई-वडिलांच्या पुण्याईने आपण महाविजेती झाल्यावर आपल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून सत्कार व कौतुकाचा वर्षांव झाला, पण जन्मगावी झालेला कौतुक व सत्कार अविस्मरणीय आहे. हा सत्कार व मायेची थाप सतत आपल्यासाठी प्रेरणादायी राहील. या माझ्या गावात झालेला कौतुक सोहळ्याने मी भारावून गेले आहे.
याप्रसंगी तिने ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ व ‘खंडेरायाच्या लग्नाला’ ही गाणी साजरी केली, तर तिने गायलेले अंतिम फेरीतील गीत ‘मनसुद्ध तुझे पृथ्वी मोलाची’ या गाण्यानंतर एका महिलेने चक्क व्यासपीठावर जाऊन कार्तिकीस मिठी मारली.
कार्तिकीचे वडील भजनसम्राट कल्याणजी गायकवाड म्हणाले की, महागायिका कार्तिकेच्या यशाचे मूळ हे माझ्यावर झालेले जन्मगावाचे संस्कार व गावकऱ्यांनी केलेले प्रेम आहे. बारसवाडा येथे झालेल्या संस्कारामुळेच आपण व कार्तिकी गायकीच्या क्षेत्रात यश मिळवू शकलो.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मोरे हिने केले. आभार बाजीराव भेंगडे यांनी मानले.
शिवसेनाप्रमुखांची भेट अविस्मरणीय प्रसंग
कार्तिकी गायकवाड पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना म्हणाली की, गायकीबरोबरच आपले शिक्षण व बालपण जोपासण्यावर माझा व घरच्यांचा प्रयत्न आहे. महाविजेती झाल्यानंतर व अगोदर गायकी क्षेत्रातील व इतर अनेक मोठय़ा व्यक्तींच्या भेटीचा योग आला. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवरील भेट अविस्मरणीय प्रसंग होता.