Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेड जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक
नांदेड, १५ एप्रिल/वार्ताहर

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ३१ मार्चअखेर समाधानकारक राहिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने लादलेले निर्बंध हटवताच बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू होऊ शकतील. लहान-मोठय़ा ठेवीदारांच्या रकमाही टप्प्या-टप्प्याने परत करता येऊ शकतील, असे बँकेच्या

 

प्रशासनातर्फे काल स्पष्ट करण्यात आले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात बँकेचा प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप चालविले आहेत. विशेषत: भाजप- शिवसेना- जनसुराज्य या पक्षांनी नांदेड बँकेच्या मुद्दय़ावर काँग्रेसला लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न जोरकसपणे केला असला तरी काँग्रेस नेते व विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सतत केलेला पाठपुरावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रयत्न यामुळे बँकेला जीवदान मिळाले असल्याची बाब बँके च्या विविध भागांतील खातेदार व ठेवीदारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे विरोधकांचा प्रचाराचा मुद्दाच निष्प्रभ ठरला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने लागू केलेले ३५ (अ) हे कलम मागे घेऊन नांदेड जिल्हा बँकेवरील निर्बंध हटवावेत, अशी शिफारस नाबार्डने यापूर्वीच केली आहे. त्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने नांदेड जिल्हा बँकेची मार्च २००९ पर्यंतच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी अहवाल मागविला आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडे आज विचारणा केली असता केंद्र सरकारच्या कर्जमाफीच्या ६८ कोटी रुपयांसह अन्य काही माध्यमांतून बँकेच्या तिजोरीत बरीच रक्कम जमा झाली असल्याने २००५-०६ मध्ये जशी गंभीर स्थिती वाटत होती तशी आता राहिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. निर्बंध उठताच ५ हजार रुपयांच्या आत ज्यांची रक्कम अडकून पडली आहे अशा खातेदारांना लगेचच रक्कम दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय पातळीवर रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बँक प्रशासनाने कोणतेही भाष्य केले नाही, पण ही बँक पुन्हा सुरू होण्याच्या अवस्थेत आहे. सर्व प्रकारचे व्यवहार लवकरच सुरळीत होतील, तसेच आगामी खरीप हंगामात बँकेचे कर्जवाटपही सुरू होईल, असे बँक प्रशासनाने ठासून सांगितले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण यांनी जिल्हा बँकेचा एकमेव मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्यांना जाहीरपणे फटकारले आहे. या बँकेला राज्य सरकारकडून आपण १०० कोटी रुपयांचे कर्ज व २० कोटी रुपयांचे भागभांडवल मिळवून दिले असून कै. शंकरराव चव्हाण व पद्मश्री श्यामराव कदम यांच्या काळातले वैभव बँकेला पुन्हा मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. विरोधकांच्या अपप्रचाराला मतदारांनी थारा देऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित
केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेत जिल्हा बँकेला ६७ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाले असून राज्य सरकारच्या सवलत योजनेनुसार आणखी ६१ कोटी रुपये मिळण्याची हमी आहे. त्याशिवाय अन्य मार्गानी २४५.७८ कोटी रुपये मिळाले असल्याने बँक सुस्थितीत आली आहे. कोणत्याही प्रकारच्या ठेवींना धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून आजारपण, शिक्षण व लग्नकार्ये आदी बाबींमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी घेऊन सुमारे २० कोटी रुपये ठेवीदारांना परत करण्यात आले आहेत.