Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतपेटीच्या राजकारणामुळे देशाची सुरक्षा धोक्यात - मोदी
जालना, १५ एप्रिल/वार्ताहर

‘‘देशाला विकास हवा आणि सुरक्षाही हवी. सुरक्षा नसेल तर विकास काय कामाचा? काँग्रेस पक्ष मतपेटीचे राजकारण करीत असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे,’’ असा आरोप

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला.
जालना मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ श्री. मोदी यांची आज सभा झाली. ते म्हणाले की, पन्नास-पंचावन्न वर्षे देशात एकाच पक्षाचे आणि त्यातही एकाच कुटुंबाची सत्ता अधिक काळ राहिली आहे. दिल्लीत सरकार चालविणारे हिशेब द्यायला तयार नाहीत. या निवडणुकीत जनतेने मजबूत नेता पाहिजे की मजबूर नेता पाहिजे याचा विचार केला पाहिजे. मतपेटीचे राजकारण वाळवीसारखे लागले असून त्याने देशाला पोखरून काढले आहे.
पंतप्रधान मनमोहनसिंग बोलतात ती भाषा संवैधानिक भाषा नाही, अशी टीका करून श्री. मोदी म्हणाले, ‘‘हिंदुस्तानाच्या संपत्तीवर पहिला हक्का मुस्लिमांचा आहे, असे पंतप्रधान म्हणतात. परवा मुंबईतील पत्रकार परिषदेतही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. माझे म्हणणे आहे की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार गरिबांचा आहे. भाषा, धर्म, लिंग, जात, शहरी, ग्रामीण कुठलाही गरीब हा गरीब असतो. त्याचा पहिला हक्क संपत्तीवर असला पाहिजे.’’
अणुकराराच्या वेळी अमेरिकेच्या मैत्रीचा कागद काही काळ अडकून पडला तेव्हा पाच वर्षांत सर्वाधिक दु:ख झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात तीन वर्षे दुष्काळ पडला किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अथवा बिहारमध्ये शंभर वर्षांत आला नाही एवढा महापूर आला, त्या वेळी पंतप्रधानांना दु:ख का झाले नाही? मुंबईत रेल्वेत बॉम्बस्फोट झाला, त्या वेळी पंतप्रधानांना सर्वाधिक दु:ख का झाले नाही? ते सोनिया गांधींची सेवा जरूर करू शकतात, परंतु देशाची सेवा मात्र करू शकत नाहीत, असेही श्री. मोदी म्हणाले.
श्री. मोदी म्हणाले की, मुंबईत हल्ला पाकिस्तानने केला आणि आपले गृहमंत्री मात्र अमेरिकेत जाऊन मदतीची भीक मागत आहेत. भा. ज. प.चे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी, उमेदवार रावसाहेब दानवे यांचीही भाषणे झाली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, संदिपान भुमरे व सांडू पाटील लोखंडे, शिवाजीराव चोथे आदी उपस्थित होते. श्री. विलास नाईक यांनी सूत्रसंचालन केले.