Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ही माझी कोयता ‘व्होट बँक’- मुंडे
बीड, १५ एप्रिल/वार्ताहर

‘‘ऊसतोडणी मजुराच्या पायात काटा टोचला तर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. आमचे असे मायेचे नाते असल्याने ही माझी ‘कोयता व्होट बँक’ आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर संसदेत जाताना हातात कोयता घेऊन जाईन आणि पहिले भाषणही ऊसतोडणी मजुरांसाठीच करीन. पंचवीस वर्षांच्या राजकारणात ऊसतोडणी मजुरांच्या आशीर्वादावरच यश मिळाले,’’ असे उद्गार भारतीय जनता

 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी काढले.
श्री. मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी काल सायंकाळी मांजरसुंबा येथे ऊसतोड कामगारांचा महामेळावा झाला. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या ऊसतोडणी मजुरांनी मुंडे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी खासदार जयसिंगराव गायकवाड व रूपाताई निलंगेकर, आमदार पाशा पटेल, अमरसिंह पंडित, केशव आंधळे व सुनील धांडे, माजी आमदार दगडू पाटील बडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नारायण शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीलाच मुंडे यांच्या हस्ते कोयत्याचे पूजन करण्यात आले. हातात कोयता घेऊन मुंडे म्हणाले, ‘‘तुमची आणि माझी नाळ एकच आहे. निवडणुकीसाठी मी युतीचा उमेदवार असलो तरी ऊसतोड मजुरांचा प्रतिनिधी आहे. मागील पंचवीस वर्षांंच्या राजकारणात ऊसतोडणी मजुरांच्या भक्कम पाठिंब्यावरच मी राजकारणात यश मिळवले. अनेक संप, मोर्चे, संघर्ष केला. उपमुख्यमंत्री असताना राज्यात संप सुरू झाला, तेव्हा पदाची पर्वा न करता कामगार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजीनाम्याची तयारी केली होती.
ऊसतोडणी कामगार माझ्या जीवनभराची साथ असून कामगार दिसायला भोळा आणि प्रेम लावणारा आहे. आजपर्यंत मी सांगितले त्याप्रमाणे कामगार वागले, याचा अभिमान आहे. कामगारांच्या शक्तीमुळे कोणतीही ताकद मला अडवू शकत नाही. हातात कोयता घेतला तरच राज्यातील कारखाने चालू शकतात. कोयता बंद ठेवला तर बारामतीचा कारखानाही चालू शकत नाही.’’
रेल्वेच्या प्रश्नावर श्री. मुंडे म्हणाले की, आगामी पाच वर्षांत ऊसतोड कामगारांना रेल्वेत बसवून दिल्लीला घेऊन जाईल, यासाठी प्रेमाची कवचकुंडले उभी करा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर टीका करताना श्री. गायकवाड म्हणाले की, जिल्ह्य़ाचा ढाण्या वाघ मुंडे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी सज्ज व्हा. संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब बांगर यांनी प्रास्ताविक केले.