Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. पद्मसिंह पाटील यांचा आजवरचा प्रचार चार लाखांचा
गायकवाड यांचे उधारी खाते
उस्मानाबाद, १५ एप्रिल/वार्ताहर

अधिकृत प्रचाराच्या कालावधीतील १८ दिवस संपले. आता आठच शिल्लक आहेत. मागील १४ दिवसांत प्रमुख उमेदवारांपैकी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी रोख चार लाख ११ हजार ३१५ रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळविले आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे प्रा. रवी गायकवाड यांनी एक लाख ४० हजार ८८० रुपये खर्च दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी १२ हजार २०० रुपयांचा रोख खर्च केला. इतर १७ दिवसांत बहुतेक खर्च उधारी खात्यावर

 

असल्याचे खर्चाच्या विवरणात नमूद केले आहे.
प्रा. रवी गायकवाड यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची प्रतिमा लावून एका टेम्पोला व्यासपीठाचा आकार दिला आहे. त्याचे ‘विजय रथ’ असे नामकरण केले आहे. हा रथ ते ज्या गावात प्रचारासाठी जातात तेथे पाठविला जातो. बहुतांशी खर्च या रथाच्या प्रवासासाठीच दाखविण्यात आला आहे. एका किलोमीटरसाठी १३ रुपयेया प्रमाणे त्याला पैसे देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याची रक्कम अद्याप दिलेली नाही. प्रचारासाठी लागणाऱ्या इतर गाडय़ा, कार्यकर्त्यांसाठी चहापान, बार्शी येथील मुक्कामाची व्यवस्था यासाठीही काही रक्कम खर्ची पडल्याचे विवरणात नमूद करण्यात आले आहे. तथापि रोख स्वरूपात त्यांनी खर्च केलेला दिसून येत नाही.
डॉ. पद्मसिंह पाटील यांनी प्रत्येक तालुकाध्यक्षांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात रक्कम दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या गाडय़ा, प्रचारासाठीच्या इतर गाडय़ांवर खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. जाहीर सभांच्या खर्चाचा या १४ दिवसांत खर्च दिसून येत नाही. गावोगावी प्रचारसभा, गृहभेटीवरच पद्मसिंह पाटील यांचा जोर आहे.
लोकसभेच्या उस्मानाबाद निवडणुकीसाठी तब्बल २५ जणांची उमेदवारी आहे. बहुजन समाज पक्षाचे दिवाकर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना अनामत रकमेसह काही खर्चाचे उल्लेख दर्शविले आहेत. त्यांचा आतापर्यंतचा एकूण खर्च १९ हजार १२० रुपये आहे. जनता दलाचे रेवण भोसले यांनी ३६ हजार ४० रुपये खर्च केले आहेत. गुंडेराव बनसोडे या राष्ट्रीय समाज पक्ष, हरिदास माणिकराव पवार या दोन उमेदवारांनी अनामत रक्कम भरण्यापलीकडे रुपयाही खर्च केलेला नाही. त्यांच्या समर्थकांना चहापानसुद्धा नाही. भारिप - बहुजन महासंघाच्या भगवान दादाराव जगताप यांनी अनामत रकमेसह चहा, जेवण या खर्चासह १३ हजार ८१२ रुपये खर्च केले आहेत. इतर उमेदवारांची खर्चाची ताकदही अनामत रकमेशिवाय दोन-तीन हजारांपलीकडे नाही. काहींनी तर चार चाकी गाडीसुद्धा वापरली नाही. पद्मसिंह मुंडे नावाच्या उमेदवाराने एस.टी.च्या प्रवासाची तिकिटे निवडणूक खर्चात सादर केलेली आहेत.
सर्व उमेदवारांना खर्चाचे विवरण देण्यासाठी ११ व १२ एप्रिल अशी अंतिम मुदत देण्यात आली होती. निवडणूक कालावधीत उमेदवाराने तीन वेळा प्रचार खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्याच्या सूचना आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात झालेला हा वैध खर्च प्रचाराची दिशा दाखविणारा आहे.