Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आमचा जाहीरनामा
प्रश्नांना वाचा फोडावी

लोकसभेच्या निवडणुकांनाही विशेष महत्त्वाचे स्थान आहे. अशा अतिमहत्त्वाच्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधीही त्या तोलामोलाचे असण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रभक्ती, पक्षनिष्ठा, जनसामान्यांत स्वच्छ प्रतिमा असणारा, समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा आणि त्या प्रश्नांना लोकसभेत समर्थपणे वाचा फोडणारा प्रतिनिधी असणे ही काळाची

 

गरज आहे.
पण दुर्दैवाने असे म्हणावेसे वाटते की, निवडणुका म्हटले की, भ्रष्टाचार, आर्थिक व्यवहार, जातीची समीकरणे, विषारी टीका-टिप्पणी आणि कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करून साम-दाम-भेद-दंड आदी कूटनीतींचा वापर करून प्रतिनिधी निवडून जातो. त्या प्रतिनिधीचे दर्शन पुन्हा लोकसभेतही होत नाही आणि मतदारसंघातही होत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे विश्वासार्हता राहिली नाही आणि म्हणून आगामी काळात या मूल्यांना जपणारा, जागणारा लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे. त्याच्या विश्वासार्हतेस तडा जात असेल तर घटनेत बदल करून त्या प्रतिनिधीस परत बोलावण्याची तरतूद करावी, असे वाटते. म्हणजे थोडा तरी धाक लोकप्रतिनिधीला बसेल आणि ती राष्ट्रभक्ती, समाजऋण, पक्षनिष्ठा आदींना महत्त्वाचे स्थान देऊन मतदारसंघ, राज्य, देशाचे नाव कीर्तीच्या यशोशिखरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करील.
अपर्णा अविनाश जोशी, अंबाजोगाई
समाजहित जोपासणारा खासदार हवा
आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी निवडून गेले; परंतु समाजहित जोपासणारा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही. निवडणुकीच्या काळापुरती जनतेचे प्रश्न सोडवू, मतदारसंघाचा कायापालट करू, अशी भाषा बोलली जाते. मात्र प्रत्यक्षात एकदा निवडून गेले की कसला मतदारसंघ आणि कसली जनता प्रत्यक्ष भेटसुद्धा दुर्मीळ होते. त्यासाठी लोकप्रतिनिधीने आपल्याला जनतेने निवडून दिले आहे याचे भान ठेवले पाहिजे. भ्रष्टाचार, स्वार्थी, गुंड प्रवृत्ती यापासून लोकप्रतिनिधीने दूर रहावे. जनहितासाठी वेळ आल्यास तुरुंगात जाण्याची तयारी ठेवणे, प्रश्न विचारण्यासाठी लाच न घेणे व लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणारा लोकप्रतिनिधीच असावा.
संदिपान थोरात, धारूर.
असा हवा आमचा खासदार
चारित्र्यसंपन्न, उच्चशिक्षित वृत्ती जोपासणारा, भ्रष्टाचारी व गुन्हेगारी प्रवृत्तीस धारा न देणारा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्याची जाणीव असणारा, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा दहशतवादाला विरोध करणारा लोकप्रतिनिधी निवडून आला पाहिजे. पाणी, आरोग्य, रस्ते या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणारा खासदार असावा. त्यासाठी कल्याणकारी राज्य अस्तित्वात येण्यासाठी आजच्या एकविसाव्या शतकातील संसदेला बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या सर्व जाती-धर्माच्या विविध घटकांना प्रतिनिधित्व देऊन जनतेच्या कल्याणासाठी वैचारिक मंथन करणारा खासदार हवा.
शिल्पा मन्मथ गताटे, निलंगा
महिलांना राखीव जागा हव्यातच!
सर्वच राजकीय पक्षांनी आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. मात्र सर्वच क्षेत्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे. या संदर्भात कुठल्याच राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. केवळ पुढारी मंडळी निवडणुकीपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात बोलतात. ज्या वेळी संसदेत हे विधायक मांडायचे असते, त्या वेळी मात्र सर्व जण विरोध करतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करावी.
रूपाली सचिन वाघमारे, गवळी गल्ली, नळदुर्ग.
स्वच्छ चारित्र्याचा, उच्चशिक्षित प्रतिनिधी हवा
लोकशाहीमध्ये सरकार व मतदारांचा दुवा म्हणजे खासदार. यामुळे उमेदवार सामान्यांना व त्यांच्या समस्यांना न्याय देणारा असावा. निवडणुकीत अनेक कार्यकर्ते उमेदवाराच्या मागे खाण्यापिण्यासाठी जमा होत असतात. सामान्यांना कोरडी आश्वासने देऊन मतांची अपेक्षा ठेवतात. निवडणुका झाल्यावर सर्व काही विसरून जातात. सध्या सामान्य नागरिकांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. वीज, पाणी, रस्ते यांना प्राधान्याने सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावा. सामान्य लोकांमध्ये जीवन जगणारा उमेदवार असावा. लोकप्रतिनिधीचा समाजावर प्रभाव असतो. त्याचे अनुकरणे नागरिक करीत असतात. त्यामुळे त्याचे चारित्र्य स्वच्छ असावे. तो उच्चशिक्षित असावा. गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा नसावा. सामाजिक बांधिलकी जपणारा असावा. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव त्याला असावी. गोरगरिबांच्या अडीअडचणीत, सुख-दु:खात सहभागी होणारा असावा.
सुधाकर लोहारे, चाकूर
कार्यक्षम प्रतिनिधीची गरज
बीड जिल्हा सर्वार्थाने अविकसित असलेला जिल्हा आहे. जिल्ह्य़ाच्या विकासाला न्याय देईल असा खासदार दुर्दैवाने लाभला नाही. परिणामी प्रश्न कमी होण्याऐवजी वाढत गेले. ही स्थिती समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी बीडला अनुभवी व कार्यक्षम खासदाराची गरज आहे. रेल्वेचा प्रश्न बीडच्या जिव्हाळ्याचा असून मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत रेल्वेचे आश्वासन देऊनही कोणत्याही पक्षाच्या खासदाराने हा प्रश्न मार्गी लावला नाही. या प्रश्नावर राजकारण न करता सर्व सहमतीने हा प्रश्न सोडवू शकेल असा खासदार असावा असे मला वाटते. जनतेची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेविषयी आत्मीयता आज नेत्यांमध्ये दिसत नाही. विकासाच्या नावाखाली स्वत:चे व आपल्या समर्थकांची घरे भरण्याचा उद्योग सध्या राजकीय नेते करताना दिसत आहेत. अशा स्थितीत मतदारांनी अधिक सक्रिय होऊन वरील मुद्दय़ावर उमेदवारांना आपली भूमिका सर्वासमोर वारंवार मांडण्यास भाग पाडले पाहिजे.
संजय तांदळे, गेवराई.
विकासप्रश्नांसाठी लढा देण्याचा प्रयत्न व्हावा
लोकसभेच्या निवडणुकीतील प्रत्येक पक्षाचे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिष दाखवून पोकळ आश्वासन देत असताना दिसत आहे. एकदा निवडून आले की पाच वर्षांंनंतर मतांचा जोगवा मागण्यासाठी घरोघरी हिंडत आहेत. वास्तविक लोकशाही देशात कोणी कसे वागावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. देशातील सर्वात मोठे सभागृह संसदेचे आहे. नको त्या मुद्यावर संसदेत हंगामा करतात; परंतु मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नावर कोणी हंगामा करताना दिसत नाही. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. त्याकडे मात्र पक्ष दुर्लक्ष करतात. निवडणुकीत मतदारांना निवडून येण्यासाठी आश्वासन दिली जातात त्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वाढत्या स्पर्धेमुळे व्यावसायिक शिक्षणाबरोबरच शेती उद्योग याकडे दूरदृष्टी देऊन पाहण्याची आवश्यकता आहे. जनतेचे प्रश्नांची उकल करण्यासाठी त्याची प्रभावीपणे मांडणी संसदेत करण्याची गरज आहे. ज्या अपेक्षेने मतदारांनी विकासाच्या अपेक्षा ठेवून मतदान केले आहे, त्या दृष्टीने खासदारांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. विकासप्रश्नांसाठी लढा देण्यासाठी प्रयत्न व्हावा हीच अपेक्षा.
डॉ. एन. जी. मिर्झा, चाकूर.
मतदारसंघाचा कायापालट करणारा असावा
लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल सरकारी पातळीवरून वाजला तसा माझ्यासारखा सर्वसामान्य मतदार राजकारणात नाममात्र खेचला गेला. भारतीय लोकशाहीत मतदान करणे एवढेच आमच्यासारख्यांच्या वाटय़ाला येते. खासदारकीचा उमेदवार कसा असावा हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला आहेच कुठे..? जो साम, दाम, दंड व जात यांनी वजनदार त्यालाच राजकीय पक्ष उमेदवारी देतात. म्हणजे आम्ही फक्त ‘बटना’चे धनी! तरीही स्वप्नातील खासदार कसा असावा हे सांगायला काही हरकत नाही. आमचा लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या संपर्कात असावा. दलालांची फौज निर्माण करणारा नसावा. मतदारसंघातील आर्थिक आणि सामाजिक विकासाबाबत पाच वर्षांत कायमस्वरूपी पावले उचलणारा असावा. जेणेकरून त्या भागातील सर्वसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल व म्हातारपण सुरक्षित राहील. अधिवेशनाच्या काळात सभागृहात पूर्ण दिवस उपस्थित राहणारा आणि प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा असावा. स्वत:चे किंवा आप्तांचे वाढदिवस सरकारी यंत्रणा राबवून साजरे करणारा नसावा तर सरकारी यंत्रणेचा वापर डोळसरित्या करणारा, कामाचे मूल्यमापन जनतेकडून करून घेण्याचे धाडस दाखविणारा असावा. लोकप्रतिनिधी कोणत्याही अवैध कार्याने गुंतलेला नसावा आणि स्वच्छ प्रतिमा असलेला असावा. स्वत:च्या सांपत्तिक परिस्थितीत लक्षणीय बदल न घडवता मतदारसंघाचा कायापालट करणारा असावा.
प्रा. अरुंधती पाटील, अस्तित्व महिला व्यासपीठ, औरंगाबाद.