Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबला दिलेल्या वकिलाची नियुक्ती रद्द
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदार आणि अटक करण्यात आलेला दहशतवादी अजमल

 

कसाब असे दोघांचे वकीलपत्र स्वीकारून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा तसेच न्यायालयापासून हे सत्य लपवून व्यावसायिक गैरवर्तन केल्याचा ठपका अ‍ॅड. अंजली वाघमारे यांच्यावर ठेवत कसाबच्या वकील म्हणून दिलेल्या त्यांच्या नियुक्ती आदेश आज विशेष न्यायालयाने रद्दबातल ठरवले. यापूर्वी ३० एप्रिल रोजी न्यायालयाने अ‍ॅड. वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती केली होती. कसाब आणि अन्य दोन आरोपींविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी आज पहिल्यांदाच आर्थर रोड येथील विशेष न्यायालयात सुरू झाली. त्या वेळी न्यायालयाने अ‍ॅड. वाघमारे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या वकिली आचारसंहितेप्रकरणीच्या अर्जावर निर्णय देत अ‍ॅड. वाघमारे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द केले. न्यायालयाने नियुक्ती करण्याआधीच अ‍ॅड. वाघमारे यांनी याच प्रकरणातील पीडित आणि साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्यावतीने वकीलपत्र स्वीकारले होते व नुकसानभरपाईसाठी दावाही केला होता. मात्र खटल्यातील साक्षीदार आणि त्याच खटल्यातील आरोपीचे वकीलपत्रही स्वीकारणाऱ्या अ‍ॅड. वाघमारेंनी ही बाब न्यायालयापासून लपवून ठेवत वकिली आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अ‍ॅड. के. बी. एन. लाम यांनी विशेष न्यायालयासमोर केली होती. या अर्जावर अ‍ॅड. वाघमारे यांनी आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या की, श्रीवर्धनकरसोबत आपण नुकसानभरपाईच्या दाव्याविषयी चर्चा केली होती. मात्र त्यांचे वकीलपत्र स्वीकारले नव्हते. तसेच कसाबची वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी माझ्या निर्णयावर ठाम नसल्याने श्रीवर्धनकरबाबत न्यायालयाला सांगितले नाही. ई-मेलद्वारे श्रीवर्धनकर यांना नुकसानभरपाईच्या खटल्याविषयी पाठविलेली कागदपत्रे अ‍ॅड. वाघमारे यांनी यावेळी न्यायालयात सादर केली. अ‍ॅड. वाघमारे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या. ताहिलयानी यांनी अ‍ॅड. वाघमारे यांनी सत्य लपवून न्यायालयाची दिशाभूल करत व्यावसायिक गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्दबातल ठरवले.