Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. विजया पाटील यांचे अपघाती निधन
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ. विजया पाटील यांचे मुंबई-पुणे द्रूतगती

 

महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात जागीच निधन झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता जात असताना सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या ईनोव्हा गाडीच्या पुढील चाकांचे टायर फुटल्याने गाडी फरफटत गेली व रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आढळली. दुभाजकावरील लोखंडी सळी डॉ. पाटील यांच्या पोटात घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या ६५ वर्षांंच्या होत्या. उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हातकणंगले मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार निवेदिता माने यांच्या प्रचाराकरिता आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. विजया पाटील तेथे जात होत्या. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीचा चालक राजेश शुक्ला हा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचे वृत्त समजताच वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील व राष्ट्रवादीच्या प्रचार समितीचे प्रमुख गोविंदराव आदिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. डॉ. पाटील यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी, तीन भावंडे व तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले लंडनमध्ये आहेत. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केलेल्या डॉ. पाटील यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभागाच्या सल्लागार असलेल्या डॉ. पाटील या पुण्यातील संरक्षण दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर उच्च शिक्षण लंडनमध्ये घेतले होते. स्त्रीरोगाबाबत त्यांनी लिहिलेले प्रबंध आंतराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. पाटील यांचे मुंबईतील परळ भागात रुग्णालय असून, शहरातील नामवंत रुग्णालयांमध्ये अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नेहमीच बोलाविले जात असे. लंडनच्या रॉयल कॉलेजमध्ये स्त्रीरोग विभागाच्या त्या समन्वयक होत्या. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार करण्याकरिता त्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये धाव घेतली होती. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या होत्या. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त असताना त्यांनी मंदिरात देणगीरुपाने जमा होणाऱ्या निधीची जास्तीत जास्त वापर शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात व्हावा म्हणून पुढाकार घेतला होता.