Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लखलख चंदेरी दुनियेत मराठी पाऊल पडले पुढे..!
एकाच दिवशी झळकणार पाच मराठी चित्रपट
राजेंद्र जोशी, कोल्हापूर, १५ एप्रिल

राजकारण आणि कमालीचा उन्हाळा यामुळे तापून निघालेल्या महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी एक

 

खूशखबर आहे. महेश मांजरेकर प्रस्तुत ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू असताना येत्या शुक्रवारी एकाचवेळी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून, गेली काही वर्षे अंधाराच्या छायेत गेलेली मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा नव्या तेजाने चमकू लागेल असा, विश्वास चित्रपट वर्तुळातून व्यक्त होत आहे.
महेश मांजरेकरांचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा सध्या दोनशेहून अधिक चित्रपटगृहांमध्ये गर्दीचे उच्चांक नोंदवत आहे. जाहिरातीसह साडेतीन कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ातच अडीच कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करून मराठी चित्रपट व्यवसायाला एक नवे परिमाण जोडले. दुसऱ्या सप्ताहाच्या अखेरीस चित्रपटनिर्मितीचा उरला सुरला खर्च संपवून मांजरेकरांच्या बॅनरची नफ्याकडे वाटचाल सुरू होईल. तोवरच संजय नार्वेकर व मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेला ‘नऊ महिने नऊ दिवस’, अलका कुबल यांचा ‘नातं मामा भाचीचं’, भरत जाधव यांचा ‘भागम भाग’, दिलीप प्रभावळकर आणि मधुराणी गोखले यांचा ‘सुंदर माझे घर’ हा भावस्पर्शी चित्रपट आणि दिलीप प्रभावळकरांच्या कथेवर बेतलेला ‘बोक्या सातबंडे’ असे पाच चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट उत्तम निर्मितीमूल्याचे म्हणून त्यांच्याकडे मोठय़ा आशेने बघितले जाते आहे. याखेरीज मृगाचा पाऊस पडण्यापूर्वी पुढील प्रत्येक आठवडय़ात दोन वा तीन चित्रपट प्रदर्शनासाठी पाइपलाइनमध्ये सज्ज आहेत. या चित्रपटांचे आगमन मराठी चित्रपट व्यवसायाला आपल्या पंक्तीत बसवून न घेणाऱ्या हिंदूी चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का असेल, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
मर्यादित बजेट, यामुळे निर्मितीमूल्यांवर आलेल्या मर्यादा आणि पारंपरिक प्रसिध्दीतंत्र यामुळे गेल्या कांही वर्षांत मराठी चित्रपट दृष्टचक्रात सापडला होता. उत्तम कथानकाचा अभाव आणि टुकार निर्मितीमूल्य यामुळे मराठी चित्रपटांवर ‘दरिद्रीपणा’चा शिक्का बसला. साहजिकच या व्यवसायाचा कणा असलेल्या मराठी प्रेक्षकाने आपली पाठ फिरवली याचे परिणाम किती खोलवर रुजावेत ? चित्रपट प्रदर्शित करण्यास थिएटर मिळत नाही आणि चांगले चित्रपट काढूनही पैसा वसूल होत नाही म्हणून अवघे महामंडळ राज्य सरकारच्या दारात भिकेचा कटोरा घेवून उभे राहिले. गेल्या दोन एक वर्षांत मात्र ही परिस्थिती झपाटय़ाने बदलते आहे. २००७ सालात चित्रपटनिर्मितीची शंभरी गाठणाऱ्या मराठी चित्रपटव्यवसायाने गतवर्षी ११४ चित्रपट प्रदर्शित केले आणि त्यातील हिट चित्रपटांची संख्याही लक्षणीय ठरली. उत्तम निर्मितीमूल्ये, उत्तम कथानक आणि बदललेल्या प्रसिध्दितंत्राच्या जोरावर सुमारे १५ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एक ते दोन कोटी रुपयांच्या घरात व्यवसाय केला. तीन चित्रपट दोन कोटींच्यावर गल्ला गोळा करून गेले आणि आता ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ दुसऱ्या आठवडय़ात पाच कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून दर्जेदार निर्मितीची गंगा अशीच वाहती राहिली तर चित्रपटगृहांच्या आरक्षणासाठी व प्रेक्षकांसाठी शासनाच्या दारात उभारण्याची वेळ येणार नाही अशी सकारात्मक प्रतिक्रिया आहे.