Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बिहार-झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा रॉकेट हल्ला
लतेहार/सासाराम, १५ एप्रिल / पी.टी.आय.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातच मोठा हिंसाचार घडवण्याच्या इराद्याने माओवादी नक्षलवाद्यांनी आज झारखंड आणि बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत केंद्रीय राखीव पोलीस दल

 

आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यात केंरापोच्या एका जवानासह दोघे ठार आणि सात जखमी झाले. मात्र, केंरापोने दिलेल्या जबर प्रत्युत्तरात पाच नक्षलवादीही मारले गेले.
झारखंडमध्ये राजधानी रांचीपासून १२५ किमी अंतरावर असलेल्या लतेहार भागात माओवादी नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राच्या दिशेने जाणाऱ्या बसखाली भूसुरुंगस्फोट घडवला. ही बस पालामौ मतदारसंघात जात होती. यात बसचालक जागीच ठार झाला. या स्फोटाच्या काही वेळानंतर बसच्या मागेच असलेल्या केंरापोच्या ८० जवानांच्या तुकडीने पोझिशन घेऊन नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या चकमकीत शिपाई धर्मेद्र यादव शहीद झाला तर पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एस.एन. प्रधान यांनी दिली. सहा नक्षलवादी यात जखमी झाले. मात्र, त्यांना जखमी अवस्थेत घेऊन जाण्यात त्यांच्या साथीदारांना यश मिळाले. केंरापोच्या सहा जवानांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. बिहारमध्ये पहाटे दीड वाजतानंतर रोहतास जिल्ह्य़ात सुमारे २०० माओवादी नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या शिबिरावर रॉकेटच्या साह्य़ाने हल्ला केला. निवडणूक व्यवस्थेसाठी तैनात ७० जवान या शिबिरात होते. त्यांनी लगेच नक्षलवाद्यांना गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. पाटणा शहरापासून २०० किमी अंतरावर ही चकमक सुमारे साडेतीन तास चालली होती. नक्षलवादी मोठय़ा संख्येने शस्त्रसज्ज होऊन आले होते. मात्र, त्यांचा हल्ला पतवून लावण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश मिळाले. लोकसभा निवडणुकीची व्यवस्था उधळून लावण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. नक्षलवाद्यांनी स्थानिक लोकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. परंतु, लोकांनी त्याला दाद दिलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांनी आता सुरक्षा दलांकडे मोर्चा वळवला आहे.