Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानी वकील हवा कसाबचा पुन्हा घोशा
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
अ‍ॅड. अंजली वाघमारे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द केल्यानंतर कसाबने आपल्याला पाकिस्तानी

 

वकीलच देण्याची विनंती पुन्हा एकदा न्यायालयाकडे केली. या प्रकरणी पाकिस्तानी दूतावासाकडे नव्याने पत्रव्यवहार करण्याची विनंती न्यायालयाने या वेळी मान्य केली. मात्र त्याचवेळी खटल्याचे स्वरुप आणि गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्याच्यासाठी वकील नियुक्त करणे गरजेचे असल्याचे सांगत उद्याच याप्रकरणी नवीन वकिलाची नियुक्ती करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अ‍ॅड. अंजली वाघमारे यांचे वकीलपत्र रद्द केल्यानंतर न्या. ताहिलियानी यांनी कसाबला त्या संदर्भातील माहिती दिली. तसेच त्यामागील कारणही त्याला समजावून सांगत लवकरच नव्या वकिलाची नियुक्ती करण्यात येईल, असे सांगितले. तसेच तोपर्यंत अ‍ॅड. के. बी. पवार हे त्याच्यावतीने वकील म्हणून काम पाहतील असे स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच कसाबने आपल्याला पाकिस्तानी वकील हवा असल्याची मागणी न्यायालयाकडे केली. मात्र भारतीय कायद्यानुसार परदेशी वकील नियुक्त करता येऊ शकत नाही असे सांगत न्यायालयाने कसाबची विनंती फेटाळून लावली. मात्र त्यानंतरही कसाबने पाकिस्तानी वकिलाचा हेका सोडला नाही. त्यावर न्यायालयाने त्याला वकिलाबाबत त्याने पाकिस्तानी दूतावासाला लिहिलेल्या पत्रावर अद्याप काहीही प्रतिसाद आला नसल्याची माहिती दिली. त्या वेळी कसाबने आपल्याला नव्याने वकिलाबाबत पाकिस्तान दूतावसाला पत्रव्यवहार करायचे असल्याचे न्यायालयाला सांगितले व न्यायालयानेही त्याची विनंती मान्य केली. तसेच पाकिस्तानतर्फे जर त्याच्यासाठी वकील नियुक्त करीत असेल तर त्याबद्दल आपल्याला काहीच हरकत नसल्याचेही न्या. ताहिलियानी यांनी यावेळी स्पष्ट केले.