Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पहिल्या टप्प्याचे मतदान आज
नवी दिल्ली, १५ एप्रिल/ पीटीआय

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद, भारतीय जनता पक्षाचे नेते मुरली मनोहर जोशी आणि

 

तेलंगणा राष्ट्रीय समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांचे राजकीय भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. १५ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १२४ मतदारसंघांमध्ये उद्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या मतदारसंघात एकूण १४.३१ कोटी मतदार आहेत. बहुतांशी मतदारसंघांत सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर नक्षलग्रस्त भागातील मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. उद्याच्या पहिल्या टप्प्यात नशीब अजमावणाऱ्या काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या रेणुका चौधरी आणि शशी थरुर, अभिनेत्री विजयाशांती, एन. टी. रामाराव यांची कन्या डी. पुरंदेश्वरी आणि माजी केंद्रीय मंत्री बी. दत्तात्रय यांचा समावेश आहे. केरळमधील सर्वच्या सर्व २०, छत्तीसगडमधील ११, तर मेघालयातील दोन मतदारसंघांत उद्याच्या पहिल्याच टप्प्यात मतदान पूर्ण होणार आहे. बिहारमधील ४० पैकी १३, उत्तर प्रदेशातील ८० पैकी १६, महाराष्ट्र १३ (४८), आंध्र प्रदेश २२ (४२), झारखंड ६ (१४), ओरिसा १० (२१), आसाम ३ (१४) अरुणाचल प्रदेश २ (२) मणिपूर १(२) आणि जम्मू-काश्मीर १ (६) एवढय़ा मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. अंदमान-निकोबार , लक्ष्यद्वीप, मिझोराम आणि नागालँड येथील प्रत्येकी एकच असलेल्या मतदारसंघातही उद्या मतदान होणार आहे. मतमोजणी १६ मेपासून सुरू होणार असल्याने उद्या मतदान करणाऱ्या मतदारांना निकालासाठी तब्बल एकमहिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेशमधील १५४ विधानसभा मतदारसंघ आणि ओरिसातील ७० विधानसभा मतदारसंघांमध्येही उद्याच मतदान होत आहे.