Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वर्चस्व कायम राखण्याचे शिवसेना-भाजपपुढे आव्हान
मुंबई, १५ एप्रिल / खास प्रतिनिधी
पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. विदर्भात वर्चस्व कायम राखण्याचे शिवसेना-भाजप युतीपुढे आव्हान असतानाच गेल्या वेळी विदर्भात फक्त एक

 

जागा मिळालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने युतीपुढे आव्हान उभे ठाकले आहे. यंदा विदर्भात चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत. प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार व सूर्यकांता पाटील हे तीन केंद्रीय राज्यमंत्री तसेच काँग्रेसचे दत्ता मेघे, शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ, राज्याचे कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांचे भवितव्य उद्या ठरणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड व परभणी या १३ मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये एकूण २४६ उमेदवार रिंगणात आहेत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर केंद्र व राज्य सरकारने दिलेले पॅकेज तसेच ६५ हजार कोटींच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादीने घेतला आहे. तर पॅकेजचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झालेला नसल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. विदर्भातील १० पैकी चार ते पाच जागा आघाडीला मिळतील, असा विश्वास आघाडीचे नेते व्यक्त करीत आहेत.