Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
प्रादेशिक

खा. राऊत यांच्या अहवालाची डीव्हीडी शिवसेनाप्रमुखांना सादर
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

शिवसेना खासदार आणि द टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे संपादकीय सल्लागार भारतकुमार राऊत यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल असलेली ‘मी शिवसेना खासदार’ ही डीव्हीडी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज सादर केली. राऊत यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याला आज (१५ एप्रिल) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्यांनी शिवसेनाप्रमुखांची त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
‘मी शिवसेना खासदार’ या दोन तासांच्या डीव्हीडीत राऊत यांनी संसदेच्या व्यासपीठावर केलेली १५ वक्तव्ये, दूरदर्शन आणि वृत्तवाहिन्यांमधील विविध कार्यक्रमात घेतलेला सहभाग आणि जाहीर सभा व व्याख्यानमालांमधील भाषणे यांचा समावेश आहे.

‘म्हाडा’ने अर्जविक्रीच्या कमिशनपोटी दिले ४.३८ कोटी रु.
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी

लाखो ग्राहकांना कोरे अर्ज विकून ‘म्हाडा’ला मिळालेल्या एकूण ७.५५ कोटी रुपयांपैकी तब्बल ४.३८ कोटी रुपये ‘एचडीएफसी बँके’ला दलालीपोटी मिळाले असून आणखी १.८१ कोटी रुपये ‘म्हाडा’ या घरविक्रीची जाहिरात करणे व सोडत काढणे यावर खर्च करणार आहे. ‘म्हाडा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. चांदिवली पवई को. ऑप. हौसिंग सोसायटी संघाने केलेल्या जनहित याचिकेच्या उत्तरादाखल हे प्रतिज्ञापत्र केले गेले आहे. ‘म्हाडा’ला केवळ अर्ज विक्रीतून आठ ते दहा कोटी रुपये मिळाले हे पाहता घरांच्या किंमती तेवढय़ा कमी केल्या जायला हव्या होत्या, असे अर्जदारांचे म्हणणे होते.

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या डीएनए अहवालातील सारखेपणा ही छोटी तांत्रिक चूक - पी. चिदम्बरम
मुंबई, १५ एप्रिल / खास प्रतिनिधी

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला आरोपी अजमल अमीर कसाब व मारला गेलेला दहशतवादी मोहमंद इस्माईल या दोघांचा डीएनए चाचणीचा अहवाल सारखाच असल्याचा आक्षेप पाकिस्तान सरकारने घेतला असला तरी ती तांत्रिक चूक असू शकते व ती दुरुस्त करता येईल, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज स्पष्ट केले. पाकिस्तान सरकारच्या आक्षेपावर प्रकाशझोत टाकू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारताच्या प्रगतीसाठी सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांची गरज - कलाम
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर जिज्ञासा, सृजनशीलता, तंत्रज्ञान, उद्योजकाभिमुखता आणि नैतिकता या पाच गुणांचे संस्कार होणे गरजेचे आहे. या पाच गुणांच्या जोरावर विद्यार्थी स्वयंप्रेरक, स्वनियंत्रक तसेच जिज्ञासू होतील. त्यामुळेच ते स्वाभिमानी व देशाचे जबाबदार नागरिक बनतील. देशाचे सक्षम नेतृत्त्व करण्याबरोबरच जागतिक पातळीवरही आपला ठसा उमटवतील, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी केले.

‘मेगासिटी पोलिसिंग’मध्ये मिडियाची भूमिकाही महत्त्वाची
- सुरेश खोपडे
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला गुप्तचर यंत्रणा सक्षम नसल्यामुळे झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. यावर उपाय म्हणजे गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. मात्र त्याआधीच म्हणजे जुलै २००७ पासून उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खोपडे मोहल्ला समितीच्या माध्यमातून ही यंत्रणा राबवीत आहेत आणि त्यात त्यांना यश आले आहे. याच योजनेचा परिपाक असलेले व सुरेश खोपडे यांनी लिहिलेल्या ‘मेगासिटी पोलिसिंग - मुंबई पूर्व प्रादेशिक विभागातील प्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले.

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातील अडचणी न सोडविल्यास निवडणुकांवर बहिष्कार
रहिवाशांनी घेतला पुढाकार; गृहनिर्माण सचिवांना निवेदन
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात म्हाडा प्रशासन आणि गृहनिर्माण विभाग यांनी अनेकविध समस्या निर्माण केल्या असून त्यामुळे हा पुनर्विकासच अडचणीत आल्याबाबत आता रहिवासी एकत्र आले आहेत. म्हाडा अभिन्यास रहिवाशी संघर्ष समिती स्थापन करून त्यांनी आज गृहनिर्माण सचिव सिताराम कुंटे यांची भेट घेऊन विकासकांना शक्य होईल अशा रीतीने पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी दूर न केल्यास ३० एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

फसवणुकीने घेतलेले २० लाख रु. आ. रमेश चौधरींकडून वसूल
खोटी बिले देणारे डॉक्टर बडतर्फ; लाभ घेणारा आमदार मात्र मोकाट
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी
१६ आजी-माजी आमदारांनी पाच वर्षांत सादर केलेली ५८ लाख रुपयांची वैद्यकीय बिले विधिमंडळाच्या उच्चाधिकार समितीने अमान्य केली असून या बिलांपोटी दिली गेलेली २५ लाख रुपयांची रक्कम तीन आमदारांकडून वसूलही झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील यावलचे कॉँग्रेस आमदार रमेश चौधरी यांचाही समावेश आहे. त्यांनी ४१ बोगस बिले देऊन सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून २० लाख रुपयांची रक्कम वसूल केली गेली आहे.

विदर्भ व मराठवाडयातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
शिवसेना-भाजपपुढे वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान
मुंबई, १५ एप्रिल / खास प्रतिनिधी
पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. विदर्भात वर्चस्व कायम राखण्याचे शिवसेना-भाजप युतीपुढे आव्हान असतानाच गेल्या वेळी विदर्भात फक्त एक जागा मिळालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने युतीपुढे आव्हान उभे ठाकले आहे. यंदा विदर्भात चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत. प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार व सूर्यकांता पाटील हे तीन केंद्रीय राज्यमंत्री तसेच काँग्रेसचे दत्ता मेघे, शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ, राज्याचे कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.

‘ललित’ चोखंदळ वाचकनिवडीसाठी वाचकच उदासीन!
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

‘ललित’ मासिकाकडून मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ या उपक्रमासाठी वाचकांनीच यंदाच्या वर्षी अत्यल्प प्रतिसाद दिला. मासिकातर्फे विविध क्षेत्रातील पाचशे जणांची निवड करून वाचलेल्या पुस्तकांपैकी आपली आवड कळविण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त १७३ जणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. या वाचक निवडीत मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘आर्त’ या पुस्तकाला सर्वाधिक म्हणजे २४ वाचकांनी आपली पसंती कळवली आहे.

‘लंडन बुक फेअर’मध्ये अवघ्या दोन मराठी प्रकाशकांचा सहभाग
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

जगभरातील प्रकाशक आणि साहित्यप्रेमी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘लंडन बुक फेअर’ मध्ये भारतातील सुमारे शंभर प्रकाशन संस्था सहभागी होत असून त्यात मराठीतील अवघ्या दोन प्रकाशकांचा समावेश आहे. येत्या २० ते २२ एप्रिल या कालावधीत लंडन येथे हा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या बुकफेअरमध्ये भारताला विशेष अतिथी देश म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

टाटा इन्स्टिटय़ूटमधील अमेरिकन विद्यार्थिनीवर बलात्कार
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी

देवनार येथील टाटा समाजविज्ञान संस्थेमध्ये (टीस) शिकणाऱ्या एका अमेरिकन विद्याíथनीवर तिच्या सहा मित्रांनी बलात्कार केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे परिमंडळ सहाचे उपायुक्त दीपक सावंत यांनी सांगितले. फरारी संशयितांच्या शोधासाठी बिहार आणि झारखंड येथे पथके पाठविण्यात आल्याचेही सावंत यांनी या वेळी सांगितले.

हा भाजप नेत्यांच्या हत्येला प्रोत्साहन देण्याचा प्रकार - माधव भांडारी
मुंबई, १५ एप्रिल/प्रतिनिधी

भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांना अरबी समुद्रात बुडविण्याची काँग्रेस प्रवक्त्याने केलेली भाषा म्हणजे भाजप नेत्यांच्या हत्येला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
भांडारी म्हणाले की, भाजप नेत्यांना अरबी समुद्रात बुडविण्याची भाषा काँग्रेसने करणे हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेस राजकारणात कोणत्या हीन पातळीला जाऊ शकते त्याचा पुरावा आहे. काँग्रेसचे एक प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी कालच कंदहार प्रकरणात एनडीएच्या काळात अतिरेक्यांना सोडताना मोठी रक्कम दिल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात अशी रक्कम दिल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज मुंबईत मान्य केले. वस्तुस्थिती माहीत नसताना काँग्रेस बेलगाम आरोप करीत आहे, असे ते म्हणाले. सिक्रेट फंडातून हे पैसे दिले असण्याच्या शक्यतेकडे भांडारी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शुक्ला यांनी तसा आरोप करावा मग आम्ही त्याला उत्तर देऊ.

गीता वेळुकर यांचे निधन
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या पत्नी गीता वेळुकर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ४५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती डॉ. राजन व मुलगी जान्हवी असा परिवार आहे. गीता वेळुकर यांनी मुंबई व नागपूर येथे गृहसजावट व वस्त्रकला क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती एस. सी. जमीर यांनी वेळुकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.