Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

‘अल्केमिस्ट’ रंगमंचावर
सुनील डिंगणकर

पाओलो कोएल्होलिखित ‘अल्केमिस्ट’ हे पुस्तक जगभरातील वाचकांच्या पसंतीस उतरले. त्यातील ‘सॅन्टिअ‍ॅगो’ या मेंढपाळाचा खजिन्याच्या शोधासाठी झालेला प्रवास या पुस्तकात सांगण्यात आला आहे. खजिन्याच्या शोधासाठी स्पेनपासून इजिप्तमधील पिरॅमिड्सपर्यंतच्या प्रवासात घडणाऱ्या अद्भुत घटना वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवतात. ही कथा आता नाटय़रुपाने सादर करण्यात येत आहे. इंग्रजीत असलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग रविवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमध्ये सादर करण्यात येणार आहे.

नव्या लोकलमध्ये मोटारमनसाठी एसी केबीन
प्रतिनिधी

एमयूटीपी प्रकल्पांतर्गत शहरात दाखल झालेल्या नव्या रंगसंगतीतील लोकलच्या रंगामध्ये लवकरच किंचितसा बदल होत आहे. नव्या लोकलच्या समोरील बाजूला असलेल्या काळ्या रंगांच्या जागी आता पिवळा रंग देण्यात येत आहे. याखेरीज लोकलच्या मोटरमन केबिनसाठी वातानुकूलन यंत्र म्हणजेच ‘एसी’ बसवून त्या गारेगार करण्यात येणार आहेत. ही दोन्ही कामे प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहेत. एमयूटीपीच्या नव्या लोकलला समोरील बाजूस काळा रंग देण्यात आला आहे. पांढऱ्या-जांभळ्या रंगसंगतीच्या नव्या लोकलवर हा रंग खुलून दिसत असला, तरी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तो त्रासदायक ठरत आहे.

इंटरनेट, एसएमएसवर भर; मात्र मतदारांमध्ये उत्सुकतेचा अभाव
थेट मतदारसंघातून (दक्षिण मुंबई)

प्रसाद रावकर / तुषार खरात

लोकसभा निवडणूक लढविणारे उमेदवार आता निश्चित झाल्यामुळे हळूहळू निवडणुकीचा प्रचार वेग घेऊ लागला आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव, पदाधिकाऱ्यांच्या सभा गतिमान झाल्या असून प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात येण्याच्या तयारीत आहे. काहीशी अशीच परिस्थिती दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये दिसू लागली आहे. या मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना-भाजप युती, मनसे या पक्षांचे कार्यकर्ते आता जोमाने प्रचाराला लागल्याचे चित्र दिसते. मात्र मतदारांमध्ये निवडणुकीबद्दल अद्यापही फारशी उत्सुकता नसल्याचे दिसून येते. प्रचाराचा डामडौल कुठेही दिसत नसला तरीही भेटी-गाठीचे कार्यक्रम मात्र मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात हिरवे शिलेदार
रेश्मा जठार

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीला उभे असलेले ऋषी अगरवाल, वय वर्षे ३४, अर्थशास्त्रात पदवीधर आणि रायगड मतदारसंघातून उभे असलेले प्रा. सुनील नाईक, वय वर्षे ५०, कमर्शिअल आर्टिस्ट.. अशी वेगवेगळी पाश्र्वभूमी व कार्यक्षेत्रे भिन्न असलेल्या दोन उमेदवारांमध्ये एक समान धागा आहे. ‘भ्रष्टाचार’, ‘महागाई’, ‘समानता’ या घासून गुळगुळीत झालेल्या मुद्दय़ांपेक्षा वेगळ्या - ‘पर्यावरणविचारातून विकास’ या मुद्दय़ावर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी हे दोघे पुढे सरसावले आहेत.

‘ग्लोबल वॉर्मिगवर मात करण्यासाठी ‘यंग ब्रिगेड’ सक्रीय होण्याची गरज’
प्रतिनिधी

आज वयाच्या विशीत असणाऱ्या पिढीला ‘ग्लोबल वॉर्मिग’ आणि ‘क्लायमेट चेंज’चे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे याबाबतीत तरूण पिढीने सतर्क राहून पावले उचलणे गरजेचे आहे, असे साऊथम्प्टन येथील नॅशनल ओशनोग्राफी सेंटरमधील प्राध्यापक डॉ. सायमन बोक्साल यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. सध्या ते भारतभेटीवर आहेत. या भेटी दरम्यान हैद्राबाद, गोवा, अहमदाबाद आणि दिल्ली येथील विविध संस्थांमध्ये ते ‘वातावरण बदल’ या विषयावर बोलणार आहेत. ते पुढे म्हणाले की, पर्यावरण या विषयाबाबतही लोकनियुक्त प्रतिनिधींनी जागरूक असण्याची मागणी आजच्या युवा मतदारांनी करणे गरजेचे आहे.

‘चिरेबंदी’ पुलांना खिंडारे
‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ अशी इंग्रजी म्हण आहे. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घ्यावी, अशा अर्थाच्या या म्हणीपासून पालिकेने कोणताच बोध घेतला नसल्याचे शहरातील जुन्या पुलांची अवस्था पाहिल्यानंतर वाटते. शहरातील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचा एकेक चिरा ज्यावेळी ढासळत होता; त्यावेळी पालिकेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आता त्यांना मोठी खिंडारे पडू लागल्यानंतर पालिकेला जाग आली आहे.

तर वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल - सुभाष देसाई
प्रतिनिधी

वृत्तपत्र विक्रेत्यांना ‘फेरीवाला’ न संबोधता त्यांना एक विशिष्ट असा दर्जा देण्यात यावा व वृत्तपत्र विक्रेत्यांना आहे त्या जागेवरती वृत्तपत्र विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी सूचना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ मध्ये केली होती. त्यानुसार अनुज्ञापक अधीक्षकांनी ‘वृत्तपत्र विक्रेत्यांना कोणीही उठवू नये’ या आशयाचे परिपत्रक जारी केले होते. म्हणूनच आजतागायत वृत्तपत्र विक्रेते ताठमानेने आपला व्यवसाय करीत आहेत.

‘महाविद्यालयांनी स्वायत्ततेसाठी पुढे यावे’
प्रतिनिधी

शैक्षणिक स्वायत्तता हे आज जगभरचे वास्वत आहे. स्पर्धेला तोंड देण्यासाठी महाविद्यालयांनी स्वायत्ततेसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी केले आहे. मुलुंड येथील विनायक गणेश वझे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या परिसंवादात राज्यपाल बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. खोले या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. मात्र उच्च शिक्षणाच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महाविद्यालये मागे पडली आहेत. वझे महाविद्यालयाच्या कामगिरीचे राज्यपालांनी कौतुक केले. वैद्यकीय शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त मोतीबेन बी. दळवी इस्पितळाच्या वतीने तोंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अल्प दरात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. ह्युजेस रोड येथील इस्पितळात हे शिबीर होणार आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्पितळाचे मानद सचिव हेमंत श. देसाई यांनी केले आहे.

इतिहासात स्वत:ची नोंद होण्यासाठी चांगले सामाजिक कार्य करा - न्या. शिरपूरकर
प्रतिनिधी

इतिहासाचा न्याय कठोर असतो. इतिहास केवळच त्यांचीच आठवण ठेवतो, ज्यांनी समाजाकरिता किंवा पुढील पिढय़ांसाठी काही तरी केलेले असते. म्हणून ज्यांना इतिहासात आपल्या नावाची नोंद व्हावी असे वाटते त्यांनी नेहमी इतरांच्या भल्यांचे चिंतन, नियोजन व त्यासाठी कृती केली पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांनी नुकतेच केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. विद्यापीठातर्फे दरवर्षी दिला जाणारा बाबूराव बागूल पुरस्कारही त्यांच्या हस्ते लातूरचे कथालेखक अंबादास केदार यांना त्यांच्या ‘येरकर' या कथासंग्रहासाठी देण्यात आला. न्यायाधीश शिरपूरकर यांनी भारतीय राज्यघटनेची अनेक वैशिष्टय़ विशद करताना सांगितले की, घटनासमितीचे अनेक सदस्य बैठकांना नेहमी अनुपस्थित राहात असत यामुळे घटनालेखनाचे बहुतांश काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: करीत. समाजाकडून त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे त्यांच्यात खरे म्हणजे कडवटपणा येऊ शकला असता पण हा महात्मा अशा मानवी मर्यादांपासून फार दूर होता. म्हणूनच त्यांनी समाजातील सर्वच घटकांना, अगदी अल्पसंख्याकानाही, संपूर्ण समता आणि न्याय देणारी घटना लिहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’चे आज प्रकाशन
प्रतिनिधी

लेखक अतिश सुरेश सोसे लिखित आणि सूर्यकांत राऊळ यांनी मालवणी भाषेत अनुवादीत केलेल्या ‘महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात ‘नक्षत्रचक्र’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले भूषविणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कांचन अधिकारी, नितीन देसाई, नितीन सप्रे, श्रद्धा बेलसरे, प्रवीण छेडा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन भारताचार्य सु. ग. शेवडे आणि ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ‘परंपरा’ प्रस्तूत ‘महाराष्ट्र दर्शन’ हा नृत्याचा कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे.