Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

महागाईला जोड टंचाईची!
‘कॉमन मॅन’चा अर्थसंकल्प कोलमडला

नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींना टंचाईचीही जोड मिळाल्याने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. घरगुती गॅसची टंचाई, सिमेंटचे दर गगनाला भिडले, शिवाय टंचाई या साऱ्या गोष्टींमुळे ‘कॉमन मॅन’चा मासिक अर्थसंकल्प पूर्णपणे कोलमडला आहे.

रंग प्रचाराचे
कारवॉँ निघाला पुढे..

कैलास ढोले

फटाक्यांची आतषबाजी, शाल-फेटे.. रणरणत्या उन्हातही गावोगावी तरुणांकडून असं स्वागत सुरू असतं. गळ्यात हार-तुरे पडतात. नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे एक एक गाव घेत पुढे सरकतात. नियोजनबद्धपणे त्यांचा प्रचारदौरा सुरू असतो. कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. मात्र, पक्षाचे बॅनर नसल्याने बारीक सारीक गोष्टीतही त्यांना लक्ष घालावे लागते.

आरसा
आरसा म्हटलं की त्याच्या निरनिराळ्या रूपाबरोबर त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टीही आठवतात. प्रसंगी आपला प्राण वाचविण्यासाठी स्वतच्या पिलालाही पायाखाली घेऊन त्यावर उभी राहणाऱ्या माकडिणीची मॉरल स्टोरी आरशाशी डायरेक्टली संबंधित नसली, तरी तिचं नातं आहेच जवळचं आरशाशी. माकडिणीला सर्वात प्यारा आपला जीव हे सत्य तसं बहुंशी सर्वच मानवजातीला लागू व्हावं. पण त्याचबरोबर सर्वात प्यारा आपला जीव असणाऱ्या माणसाला असते सर्वाधिक प्यारी असते आपलीच प्रतिमा. आपल्या प्राणप्रिय छबीला चोवीस तास डोळ्यासमोर ठेवणारा आरसाही त्याला असतो प्यारा. स्वतचं देहभान हरवण्याची वृत्ती असते मानवी स्वभावाशी सुसंगत अशीच. खरंतर ही आंतरिक गरज, भूकच म्हणेनात, दिसते पुरवलेली आरसा नावाच्या आपल्या अनोख्या सोबत्याने आणि अशा प्रकारे न मागताही हा आरसा अद्भुत दिसेल माणसाच्याही नकळत त्याला सतत देताना हवासा, आश्वासक, जिव्हाळ्याचा आसरा.

विखे समर्थकांपैकी काही कर्डिलेंसाठी सक्रिय
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या आजच्या पारनेर तालुक्यातील प्रचारदौऱ्यात खासदार बाळासाहेब विखे यांचे काही समर्थक सक्रिय झाले. पारनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, अळकुटीचे सरपंच नामदेव घोलप, दूध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे आदी विखे समर्थक प्रचारात सहभागी झाले होते.

आम्ही जातीयवादी कसे? - जावडेकर
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

‘रामराज्य’ ही तर महात्मा गांधींची संकल्पना आहे. मग त्यातील रामाच्या मंदिराचा आग्रह धरला, तर आम्ही जातीयवादी कसे ठरतो? असा युक्तिवाद भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी येथे केला. पक्षाचे नगर मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ आलेल्या जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज पक्षाची भूमिका विशद केली. सन १९८४ पासून काँग्रेसची लोकप्रियता ‘घटती’, तर भाजपची ‘चढती’ असून या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच विजयी होणार, असा दावा त्यांनी केला.

पाचपुते-नागवडेसमर्थकांची जगतापांकडून फोडाफोडी!
श्रीगोंदे, १५ एप्रिल/वार्ताहर

कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी भाजपत प्रवेश करताना आता तालुक्यातील दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या वनमंत्री बबनराव पाचपुते व माजी आमदार शिवाजीराव नागवडे गटांनी जगताप यांची राजकीय नाकेबंदी सुरू केली. त्याकरिता आजपर्यंत सुप्त असणाऱ्या जगताप विरोधकांची मदत घेतली जाणार आहे.

गांधींच्या प्रचारार्थ पागोरीमध्ये सभा
पाथर्डी, १५ एप्रिल/वार्ताहर

जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपच्या मागे जायचे की, दहशतवादाच्या मुद्दय़ावर मिळमिळीत भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची पाठराखण करायची, याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन दिलीप गांधी यांनी केले. तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे होते. आपल्याला शेतीतले कळते म्हणणाऱ्यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली. वाजपेयी सरकारने राबविलेल्या लोकोपयोगी योजना काँग्रेस आघाडीने बंद केल्या. रोजगाराअभावी तरुणवर्ग भरकटला. उज्ज्वल भविष्यासाठी व सुरक्षेसाठी केंद्रात भाजप आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे, असेही श्री. गांधी म्हणाले. शिवसेना तालुकाप्रमुख रफिक शेख, अशोक गर्जे, अशोक चोरमले, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल बडे, सोमनाथ खेडकर, अर्बन बँक संचालक विजय मंडलेचा उपस्थित होते.

सालासर बालाजी सत्संग मंडळाच्या अध्यक्षपदी बजाज
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

श्रीसालासर बालाजी सत्संग मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ बजाज, सचिवपदी ओमप्रकाश मान, तर उपाध्यक्षपदी दिलीप मंत्री यांची निवड करण्यात आली. मंडळाची वार्षिक सभा श्रीपावन हनुमान मंदिर (हातमपुरा) येथे झाली. या वेळी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सुरेंद्रकुमार पारीख यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली. मंडळाचे सल्लागार रामविलास झंवर, विजयकुमार बिहाणी, हरी सोमाणी, राजेंद्र सोनी, मनीष सैनी, विनोद तिवारी, रामप्रसाद हेडा, मुरलीधर पांडिया, राजेंद्रप्रसाद सिकची आदी या वेळी उपस्थित होते.

मोनिका राजळेंची राहुरीमध्ये पदयात्रा
राहुरी, १५ एप्रिल/वार्ताहर

नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ त्यांची पत्नी मोनिका यांच्या नेतृत्वाखाली शहरातून पदयात्रा काढण्यात आली. वनिता आढाव, रंजना शेटे, मीरा डावखर, इलाक्षी मुंडे, वैशाली मुसमाडे, मीरा मोरे, डावखर यांच्यासह महिला यात सहभागी झाल्या होत्या. बाळासाहेब आढाव, किरण कडू हेही सहभागी होते.

जेऊरमध्ये विनापरवाना प्रचारसभा; राजळेंच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी
नगर तालुक्यातील बायजाबाईचे जेऊर येथे गेल्या सोमवारी विनापरवाना प्रचारसभा घेतल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांच्या रावसाहेब मरकड व रवींद्र अर्जुन तोडमल या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंडल निरीक्षक श्रावण आल्हाट यांनी या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्थानिक नेत्यांवरच आठवले अवलंबून
लोकसभेची निवडणूक आठ दिवसांवर आली, तरी प्रचाराला अजून रंग भरला नाही. काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार रामदास आठवले अजून गावागावात पोहोचले नाही. त्यांच्या ‘दर्शना’ची आस मतदार व आघाडीच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. परिणामी आठवले प्रचारात मागे पडले असून, त्यांची मदार आमदार यशवंतराव गडाखांवर आहे. याउलट शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रचारात आघाडी घेतली असून, मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर दिसतो. काँग्रेसचे बंडखोर प्रेमानंद रूपवते हेही तालुक्यात अजून फिरकले नाहीत.

भोसे खिंड, तुकाई चारीसाठी गांधींना संधी द्यावी - खडसे
मिरजगाव, १५ एप्रिल/वार्ताहर

युतीच्या राजवटीतच कर्जतला कुकडीचे पाणी मिळाले. मी पाटपंधारे मंत्री असताना भोसे खिंडीच्या कामाला मंजुरी दिली. तुकाई चारीचे सर्वेक्षणही आमच्या काळात सुरू होते. परंतु आमचे सरकार सत्तेवरून गेले आणि गेली १० वर्षे ही सर्व कामे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंडळींनी रखडवत ठेवली. ती मार्गी लावण्यासाठी भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनाच मते देण्याचे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे आयोजित सभेत केले.

पूजेला बंदी, छबीही नाही..!
मतदान करतानाचे छायाचित्र घेण्यास निवडणूक आयोगाने बंदी केल्याने आता लोकसभा निवडणुकीतील उमेदवार व प्रमुख नेत्यांच्या मतदान करतानाची छबी वृत्तपत्रातून झळकणार नाही आणि छोटय़ा पडद्यावरही उमेदवाराची मतदानाची हास्यमुद्रा दिसणार नाही!

.. जरा विसावू या वळणावर
सदोबाला पुन्हा अल्पकालीन स्मृतिभ्रंशाचा झटका आला. त्यावेळी तो खारेकर्जुने गावात पोहोचला होता. सभेच्या व्यासपीठावरील खेळीमेळीचे वातावरण पाहूनच तो पुन्हा ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस्ड’चा शिकार झाला. ‘उमेदवारा’ने भाषणात प्रामुख्याने ‘पाटलां’चेच गुणगाण गायिले. कारखानाही त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रगतीकडे वाटचाल करीत आहे हे सांगण्यासही ‘उमेदवार’ विसरला नाही.

हेलिकॉप्टरची हौस
नेत्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळणे म्हणजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यासाठी परमभाग्याची गोष्ट. मात्र, त्याचा कधी तरी नको इतका त्रासही होतो. भाजपच्या एका आघाडीच्या प्रमुखाला नुकताच हा अनुभव आला. पक्षातील त्या आघाडीचा राज्याचा प्रमुख असलेला नगरमधील हा पदाधिकारी स्वतच्या गाडीने धुळ्याला प्रदेश पातळीवरील एका नेत्याच्या सभेसाठी गेला. सभा संपल्यावर नेत्याने सहज म्हणून या पदाधिकाऱ्याच्या गळ्यात हात घालत ‘चला माझ्याबरोबर’ म्हटले. पदाधिकारी खूश! साहेबाबरोबर तो हेलिकॉप्टरने औरंगाबादला आला. त्याची गाडी धुळ्याहून थेट नगरला. औरंगाबादला त्या नेत्याने या पदाधिकाऱ्याला सोडले आणि दुसऱ्याच्या गळ्यात हात घालत त्याला पुढे नेले. याला बिचाऱ्याला एसटीने नगरला यावे लागले. घरातल्या लोकांसमोर ‘शायनिंग’ होणे दूरच, पण स्वतची गाडी असून एसटीने प्रवास करावा लागला म्हणून टिंगल मात्र भरपूर झाली.

भीतीपोटीच विविध पक्षांचा आपणास नकार - राजळे
निघोज, १५ एप्रिल/वार्ताहर
राजळे खासदार झाल्यास इतर नेत्यांना नेस्तनाबूत होण्याची भीती वाटते. त्यामुळेच विविध पक्षांनी आपल्या उमेदवारीस नकार दिल्याची टीका नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांनी येथे प्रचारसभेत बोलताना केली.

.. तर आठवलेंनी पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी झटावे - पिचड
राजूर, १५ एप्रिल/वार्ताहर

‘युपीए’ला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी आठवलेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार मधुकरराव पिचड यांनी केले. येथील बाजारपेठेत आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ‘युपीए’चे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचारसभेत श्री. पिचड बोलत होते.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचा कोणत्याच पक्षाला पाठिंबा नाही
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय संभाजी बिग्रेड व मराठा सेवा संघाने घेतला. मराठा सांस्कृतिक भवन येथे काल झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा पतसंस्थेचे अध्यक्ष पोपट काळे होते.

अशोक सावंत समर्थकांची उद्या पिंपळनेर येथे बैठक
निघोज, १५ एप्रिल/वार्ताहर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात अलीकडेच ६ दिवस उपोषण केलेल्या राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी अशोक सावंत यांनी आता लोकसभा निवडणुकीतील भूमिका ठरविण्याबाबत शुक्रवारी (दि. १७) दुपारी ४ वाजता पिंपळनेर येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलविली आहे. सावंत यांच्या फार्महाऊसवर बैठक होणार असल्याची माहिती पिंपळनेरच्या सरपंच सुनंदा रासकर यांनी दिली. बैठकीस परिसरातील २०-२५ गावांमधील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे माजी सरपंच भाऊसाहेब लटांबळे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांची शनिवारी नगरला सभा
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी
भाजपचे पहिल्या क्रमांकाचे स्टार प्रचारक गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा येत्या शनिवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता पुणे रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलानजिकच्या मैदानावर होईल. पक्षाचे नगर मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. मोदी यांची सभा मिळावी, म्हणून खुद्द उमेदवार गांधी व त्यांचे प्रचारप्रमुख जोरदार प्रयत्न करीत होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही सभा मिळाल्याने त्यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणुकीच्या सुरुवातीला याच मैदानात सभा झाली होती. त्यापेक्षा मोठी गर्दी जमवण्याच्या प्रयत्नात भाजपचे कार्यकर्ते आहेत. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल सबलोक यांनी सांगितले की, युतीचे जिल्ह्य़ातील चारही आमदार, सर्व लोकप्रतिनिधी या सभेला उपस्थित असतील.

आठवलेंच्या प्रचारासाठी प्रशांत गडाख यांच्या सभा
नेवासे, १५ एप्रिल/वार्ताहर
मराठा आरक्षणाला सर्वप्रथम पाठिंबा देणारे, तसेच सर्वाधिक क्रियाशील खासदार ठरलेल्या रामदास आठवले यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य द्यावे, असे आवाहन प्रशांत गडाख यांनी केले. गडाख यांनी शिरसगाव, वरखेड, सलाबतपूर गोगलगाव, खडके आदी गावांत दौरा केला. दोन दिवसांत त्यांनी ९ सभा घेतल्या. शिरसगाव येथेही मोठी सभा झाली. अण्णासाहेब पठारे, महेश मापारे, हरिभाऊ दरंदले वैभव नहार आदी प्रचारात सहभागी झाले होते.

मनोहर जोशी यांची आज नेवाशात सभा
नेवासे, १५ एप्रिल/वार्ताहर
शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ उद्या (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.