Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

मतदाते ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

विदर्भातील लोकसभेच्या दहाही जागांसाठी उद्या, गुरुवारी मतदान होणार असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी खलबते सुरू असून त्याकरिता रणनीतीदेखील आखण्यात येत आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी खास दक्षता घेण्यात आली आहे. यवतमाळ-वाशीममध्ये सर्वाधिक २८ तर नागपुरात २७ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोली-चिमूर आणि अकोला मतदारसंघात सर्वात कमी प्रत्येकी ११ उमेदवार आहेत.

उठा, मतदान करा
प्रवीण बर्दापूरकर

हा मजकूर आपण वाचत असाल तेव्हा १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालेले असेल. एव्हाना काहीजण मतदानाला बाहेर पडले असतील, काही बाहेर पडायच्या तयारीत असतील तर, काहींनी दिवसाच्या उत्तरार्धात मतदान करण्यासाठी नियोजन केलेले असेल. मात्र, काहीजण मतदानासाठी मिळालेली सुटी एन्जॉय करण्याच्या किंवा काहीजण कंटाळा म्हणून किंवा काहीजण आपल्याला काय देणे-घेणे आहे मतदानाशी, असा टिपिकल मध्यमवर्गीय पांढरपेशा विचार करून किंवा काहीजण राजकारणाची नफरत म्हणून किंवा काहीजण काहीही कारण नसतानाही किंवा उल्लेख केलेल्यांपैकी काहीतरी वेगळे कारण म्हणून मतदानाला बाहेर पडणार नसतील, अशा सर्व मतदानाला बाहेर न पडण्याचा विचार असणाऱ्यांसाठी हे आवाहन आहे. - कृपया उठा आणि मतदान करा.

आज मतदान.. फायनल कॉमेन्ट्स
उपराजधानीत बसप निर्णायक

नागपूर, १५ एप्रिल

काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, भाजपचे बनवारीलाल पुरोहित आणि बसपचे माणिकराव वैद्य या तीन उमेदवारांमध्ये होणारी लढत, ज्येष्ठ साहित्यिक आणि भारिप-बमसंचे उमेदवार डॉ. यशवंत मनोहर यांच्यामुळे लक्षवेधी ठरली आहे. मात्र, यावेळी काँग्रेसला मतविभाजनाच्या धोक्यामुळे चुरशीच्या लढतीला तोंड द्यावे लागणार आहे.

विविध संघटना, संस्था आणि पक्षातर्फे डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली; मिरवणुका व शिबिरे
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त विविध संघटना, संस्था, पक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अशोक धवड व राकाँचे पदाधिकारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक धवड यांनी आरबीआय चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उपस्थित प्रशांत बनसोड, अजय बहादुरे व डॉक्टर.
रमाई स्मारक बौद्ध मंडळ रमाई स्मारक बौद्ध विहारच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विठ्ठलराव डांगरे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मतदानासाठी काय हवे?
मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्रासह अन्य १४ ओळखपत्रे गाह्य़ धरली जाणार आहेत. त्यात १. पारपत्र (पासपोर्ट), २. वाहन परवाना, ३. पॅन कार्ड, ४. कार्यालयीन ओळखपत्र, ५. बँक पास बूक/पोस्टाचे पासबूक/किसान पास बूक फोटोसह, ६. मालमत्ता पत्रके जसे पट्टा, नोंदणीकृत विक्रीपत्र फोटोसह, ७. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जाती प्रमाणपत्र, ८. पेन्शनची कागदपत्रे/माजी सैनिक यांचे पेन्शन बूक/ पेन्शन पेमेंट ऑर्डर/ माजी सैनिक विधवा प्रमाणपत्र, ९. स्वातंत्र्य संग्राम सैनिक ओळखपत्र, १०. शस्त्र परवाना, ११. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र, १२. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कार्ड, १३. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, आणि १४. २६ फेब्रुवारीपूर्वी तयार केलेले रेशन कार्ड.

पारा ४४ अंशावर
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

विदर्भात सर्वत्र उन्हाची तीव्रता अनुभवाला येत असून बुधवारचे नागपूरचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस होते. या उन्हामुळे उद्याच्या मतदानावर विपरित परिणाम होईल की काय, या शंकेने सर्वच पक्षांचे उमेदवार धास्तावलेले आहेत. विदर्भात आज सर्वात जास्त तापमान नागपुरात ४४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येथील किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस होते. इतर ठिकाणचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे- (कंसातील आकडे किमान तापमानाचे): अकोला ४४.२ (२४.४), ब्रम्हपुरी ४३.७ (२४.९), वर्धा ४२.४ (१९.४), यवतमाळ ४२.२ (२४.४), अमरावती ४२ (२२.८), गोंदिया ४१.३ (२३.८), वाशीम ४१ (२३.२) आणि बुलढाणा ३९.४ (२६.८). उद्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उद्या लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यात मतदान होत आहे. मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे असे सर्वाचेच प्रयत्न आहेत. परंतु उन्ह असेच राहिले तर, मतदार घराबाहेर पडतील की, घरात राहून सुटी साजरी करतील, या विचाराने उमेदवार चिंतेत आहेत.

सुमीत अवस्थी यांची एव्हलॉन अकादमीला भेट
नागपूर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सुमीत अवस्थी यांनी नुकतीच नागपुरातील एव्हलॉन एव्हिएशन अकादमीला भेट दिली. त्यांच्यासोबत ‘आज तक’चे मनिष अवस्थी, एव्हलॉन एव्हिएशन अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक उमाकांत अग्निहोत्री तसेच अकादमीचे केंद्र प्रमुख अंशुल गुप्ता होते. सुमीत अवस्थी यांनी एव्हलॉन एव्हिएशन अकादमीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हवाई सुंदरी म्हणूनच नाही तर, व्यक्तिगत जीवनातसुद्धा सकारात्मक विचार बाळगण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. शारीरिक सुंदरतेसोबतच व्यक्तिगत सुंदरतासुद्धा आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन
नागपूर, १५ एप्रिल/ प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले याच्या जयंतीनिमित्त रविवारी विविध संघटनांनी त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. भातीय बौद्ध महासभेतर्फे गौतम पाटील, बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे वंदना भगत, लीला अंबुलकर, सुनंदा रामटेके, महानंदा पाटील, संध्या पाटील, वंदना हिरेखण, शकुंतला पाटील, नागपूर महानगर पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे नंदकिशोर भोवते, मनोहर बोरटकर, वसंत मून, भारतीय बहुजन विकास परिषदेतर्फे महेंद्रसिंग ठाकूर, योगिता भानारकर, भारतीय नागरिक संघर्ष मंचतर्फे ओमप्रकाश सोंमकुंवर, आंबेडकरी विचार मोर्चाचे के.एस. पानतावने, अ‍ॅड. हरिष भेलावे, बाळासाहेब शंभरकर, अरुण नायक, सुभाष बढेल, ओबीसी मुक्ति मोर्चातर्फे नितीन चौधरी, दिवाकर पाटणे, अ‍ॅड.अशोक यावले, प्रभाकर भडके, कृष्णकांत मोहोड, सारंग फाये, नारायण चिंचोणे, महात्मा फुले राष्ट्रीय विचारमंचतर्फे देविदास नंधरधने, डॉ. यशवंत मनोहर यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पंचशील नाईट हायस्कूलमध्येही महात्मा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य प्रल्हाद गजबे उपस्थित होते. संचालन हेमने यांनी तर, आभार डोंगरे यांनी मानले.

७० हजार रुपयांची अवैध दारू जप्त
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

शहर पोलिसांनी शहराच्या विविध भागात मंगळवारी छापे टाकून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा दारूचा अवैध साठा जप्त केला. गुन्हे शाखेच्या पथकाने कोराडी मार्गावरील पांजरी येथील ‘गिल पंजाबी’ ढाब्यावर छापा मारून दारूचा अवैध साठा जप्त केला. रॉयल स्ॅटग, बॅगपायपर, डर्बी स्पेशल, डिप्लोमॅट या ब्रँडच्या एकूण २४० बाटल्या (किंमत ४८ हजार रुपये) या ठिकाणी सापडल्या. ढाबा मालक आरोपी परमजितसिंग क्रिपालसिंग जगदेव (रा़ इंदोरा चौक) याला अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी काल रात्री सात वाजताच्या सुमारास देशराज नगरातील दोन घरात छापा मारून मोठय़ा प्रमाणावर दारूचा अवैध साठा जप्त केला. घरी छापा मारून खडर्य़ाच्या १३ खोक्यात भरून ठेवलेल्या देशी दारूच्या एकुण ६२४ बॉटल्या (प्रत्येकी १८० मिलि.) जप्त केल्या आणि आरोपी गोपाल प्रेमबहादुर सुनामी याला अटक केली़ हा माल राजेश पन्नालाल यादव याचा असल्याचे सांगितल्याने त्यालाही अटक करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी इतवारी मटन मार्केटमधील आरोपी प्रमिला घनश्याम वाघमारे हिच्या घरी बुधवारी दुपारी छापा मारून देशी दारूच्या (प्रत्येकी १८० मिलि) ४२ बाटल्या जप्त केल्या. तिला अटक करण्यात आली.

स्वरालीतर्फे शनिवारी ‘चित्रमाऊली सुलोचना’
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

स्वराली संगीत संस्थेतर्फे शनिवारी, १८ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या चित्रपटातील अनमोल गीताचा ‘चित्रमाऊली सुलोचना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. दीपा धर्माधिकारी, रेखा साने, सुचित्रा कातरकर, अंजली देशमुख, अबोली बिडकर, मनिषा अंदुलकर, श्रद्धा जोशी आणि विजय देशपांडे गीते सादर करणार आहेत. अनमोल वडसमुद्रकर, गोविंद गडीकर, सुमेधा वझलवार, सुधीर गोसावी, नंदिनी सहस्त्रबुद्धे, गजानन रानडे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना नंदिनी सहस्त्रबुद्धे यांची आहे. नीता परांजपे कार्यक्रमाचे संचालन करतील. या कार्यक्रमात मराठी पाऊल पुढे, खुलविते मेंदी माझ्या, चाळ माझ्या पायात, राजाच्या रंग महाली इत्यादी जुनी गीते रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रम रसिकांसाठी नि:शुल्क आहे.

दोन ठिकाणी किरकोळ आगी
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

वर्धमान नगरातील आगीशिवाय शहरात बुधवारी दुपारी आणखी दोन आगीच्या किरकोळ घटना घडल्या. सीताबर्डीवर नेताजी मार्केटजवळील महापालिका शाळेच्या एका खोलीला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या शाळेत मतदान केंद्र आहे. आग मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीला लागली. अग्निशामक दलाच्या एका गाडीने आग विझवली. दुसरी आग लकडगंज परिसरातील एका लाकडाच्या गिरणीला लागली. अग्निशामक दलाच्या एका गाडीने आग विझवली. मंगळवारी अग्निशमन दिन होता. नेमकी दुसऱ्या दिवशी शहरात तीन आगीच्या घटना घडल्या.

शिपायाचा मृत्यू
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

कामावर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका शिपायाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. भुवन मखनप्रसाद दुबे (रा़ पांडुरंग नगर) आज सकाळी राज्य राखीव पोलीस दलाच्या (गट ४) िहगणा तळावर शस्त्रागारासमोर तैनात होते. अचानक घेरी येऊन खाली पडल्याने त्यांना तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितल़े एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.